गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज
1000470524

अलकानंदा घुगे-आंधळे यांचा 'अर्धा कोयता' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथासंग्रहाचे शीर्षकावरून आपला असा समज होतो की,हा ऊसतोड कामगाराच्या जीवनावर अधारित कथांचा संग्रह असेल पण अगदीच तसा नाही तो.या कथासंग्रहात ग्राम्य जीवनाच्या खडतर संघर्षाच्या चटके देणा-या ही अनेक कथा आहेत.

                                                                      वाटयाला आलेला संघर्ष,खेड्यातील कष्टप्रद खडतर जीवन,दारिद्रय,अज्ञान,मतलबी राजकारण,व्यवस्थेने निर्माण केलेली अनेक आव्हान व त्या आव्हानाला भिडणारी कमालीची जिद्दी माणसं या सा-या गोष्टींनी लेखिकेचे भावविश्व समृध्द झालेले दिसते आहे.जीवनातील खडतरता व अभावाची परिस्थिती व त्या परस्थितीने पिलेली माणसं हीच लेखिकेच्या लेखनाची मूळ प्रेरणा ठरलेली दिसते आहे.

                                                       या कथासंग्रहात ऊसतोड कामगारांच्या जीवनाची परवड व खेडयातील माणसांचा भयाण संघर्ष या कथामधून जाणवतो आहे.ग्रामीण भागातील शेतक-याचे,मजुरांचे जगणे केवळ हलाखीचे नसते तर ते सततच्या संकटामुळे जगण्याचा चंग बांधणा-या माणसाची ती एक लढाईचं असते.हा असंघटित संघर्ष कसा गडद होत जातो याचा वस्तुपाठच या कथांमधून मांडण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

                              'आलिया भोगासी असावे सादर' या तुकोबाच्या उक्ती प्रमाणे आपल्या वाट्याला जे दुःख आले आहे ते भोगावे लागणार आहे.हे जगणं त्यांनी स्वीकारलं आहे.या झुंजार वृत्तीने एक एक पात्र लढत राहते आहे.झुंजत राहते आहे.प्रत्येकाची लढाई वेगळी असते. आपलीच जीवा भावाची माणसं एकमेकांचा संघर्ष कठीण करत असतात हे कटू असलं तरी सत्य लेखिकेन अनेक कथामधून मांडले आहे.

                                    माणसामाणसतील उभे राहणारे संघर्ष,फाटत जाणारी नाती,विस्कटत गेलेली कुटूंब,मतलबी राजकारण,बेगडयासारख्या जपलेल्या अभासी प्रतिमा हे सारं गावातल्या माणसाठी शापच ठरलेले आहे.कुटूंबातील संघर्ष ही माणसाचं जीवन अधिक खडतर करतो.’बगीचाकथेतील जना असेल,’आळकथेतील संपत असेल,’यशोदा’ कथेतील यशोदा असेल,’मंगळसूत्रकथेतील आप्रुगी.’शेवता कथेतील शेंवता असेल.अश्या अनेक स्त्रीयांच्या जगण्याची परवड या कथामधून लेखिका प्रभावीपणे वाचकासमोर मांडत राहते.लेखिकेच्या भवतालचा पट आपल्या समोरून सरकत जातो आणि वाचक कथामध्ये गुंतत जातो.

                                                       कथामधून नायकपेक्षा जास्त कथामधून खंबीर नायिका  त्यांनी रेखाटलेल्या दिसत आहेत.अर्थात त्या मध्यम वर्गीय स्त्रीयां सारख्या स्त्रीवादी चळवळीत अडकलेल्या नाहीत तर त्या आपली जगण्याची लढाई लढत आहेत.स्वत:स्त्री असल्यामुळे अनेक नायिका रंगवण्यात येणे स्वभाविकच आहे. फक्त स्त्रीयांच्या भावविश्वातच  लेखिका गुरफटून गेलेली  नाही तर खेडूतांच्या जीवनांच्या अनेक समस्येला शब्दबध्द करण्याचा प्रयत्न ही तिने  केला आहे.

                             दंश कथेतील शारदा,कौटूंबीक संघर्ष वाटयाला आलेली अफवा कथेतील सुबी,’छेड कथेतील दुर्गा,’विम्याचे पैसे या कथेतील दारूबाज नव-याशी झुंजत संसाराचा गाडा ओढणारी मुक्ती असेल,वृध्दाश्रम जवळ करणारी यशोदा कथेतील यशोदा,’नकोशी कथेतील तुळसा,शेंवता,‘अर्धा कोयता’या कथेतील खंबीर कांता,या सा-या  कथामधून प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे.खंबीरपणे त्या लढत आहेत.सकारात्मक दृष्टीकोन या सा-याच कथामधून आपल्याला दिसेल.हाच लेखिकेचा लेखनाचा हेतू ही असेल असं वाटते आहे.

                        आळकथेतील नायक संपत,खचून जाऊन फडच पेटून देणारा फड कथेतील भीमा,न संपणारा संघर्ष वाटयाला आलेलावळहई कथेतील आप्पा,’अफवेचे पीक’नात्याच्या गुतंत्यात अडकलेला हताश सदा.या सा-या कथाशोंकातिका आहेत पंरतु नकोशी,ईद का चाँद,भेट,या कथामधनू सुखात्मिका ही छान रंगवल्या आहेत.जगण्याची उभारी देणा-या या कथा आहेत.

                            कथेमध्ये माणसचं नुसते नायक नाही तर बगीचा कथेतील बाग,नख-या कथेतील बैल,शिक्षा कथेतील अख्खा गावातील स्त्रीयाच नायक म्हणून पुढे येतात. असे आगळे वेगळे पण नायक लेखिकेन खुबीने उभे केले आहेत.

                               जसे कडवट झुंज देणारे अनेक माणसं असतात,तसेच खलनायक ही बेरकी आहेत.या कथा मधून तुम्हाला प्रत्येकवेळी माणसचं खलनायक म्हणून भेटतील असं नाही.वास्तवातं ही तसं असतं नाही. समाज, व्यवस्था, निसर्ग आणि नशीब ही माणासाच्या आयुष्यात अनेकदा खलनायक  ठरत असतात. या कथामधून ही दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा व समाज व्यवस्था व राजकारण ही खलनायक म्हणून पेश होत राहतात.शिक्षा कथेतील खलनायक अख्ख गावच आहे.सामाजिक विषमताच खलनायक म्हणून पुढे आलेली दिसते.त्यामुळे या कथांना एक सार्वत्रिक सामाजिक परिमाण लाभले आहे.त्यामुळेच अनेक पुरस्कार पदरात पाडून घेताना अलकानंद घुगे-आंधळे यांची कथा आपल्याला दिसते आहे.

                          अलकानंदा घुगे-आंधळे यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सहज आहे.संवाद आणि वर्णने ही ग्रामीण वास्तवाला धरून आहेत.शब्दयोजना सरळ आणि मोजकीच आहे.त्यात एक लय सापडते.ती लयचं माणसाला कथा मध्ये गुंतून ठेवते.वाचकांना कथेत गुंतवून ठेवण्यासाठी निवेदन शैली व शब्दसंयोजन महत्वाचे असते.बोलीभाषाचा वापर सर्रास केलेला आहे.’आता बया..! महा जीव तुमच्यात आन्‍ तुमचाजीव खेटरात,’’आता कहयाला बोलीती ती पांढरी पाल,’ ‘लई मस्ती आली का ग टवळे, नांदयाला आले तशी अजून कोणी नवा जून केला नाही.च्या मायाला झक मारली न कुठून ऊस लावला.अश्या शब्दांची पखरंड पानोपानी दिसते त्यामुळे संवाद प्रभावी झालेले आहेत.

                         सा-याच कथामध्ये तृतीय पुरूषी निवेदन शैली आहे.त्यामुळे कथा एक सारख्या वाटतात.एकजीनशीपणा उतरल्या सारख्या जाणवतात.निवेदनशैलीमध्ये अनेक पर्याय वापरायाला जागा होती पण लेखिकेने तसं काही केले नाही.

                            या कथांमधील पात्रे आपले अस्तित्व शोधत जगतात ती नुसती परिस्थितीला शरण जाणारी नाहीत, तर आपल्या हक्कांसाठी लढणारी आहेत.उरातली आग तशीच ठेवून डोळयात उत्तुंग स्वप्न रंगवणारे ही माणसं आहेत.अर्धा कोयता हा केवळ ऊसतोड मजुरांच्या दुःखाची कहाणी नाही, तर त्यांच्या संघर्षाचा,त्यांच्या जिद्दीचा दस्तऐवज आहे. अरविंद शेलार यांच मुख्यपृष्ठ  कथांच्या आशयाला साजेसं साधलं आहे.परिस प्रकाशनाने ही आपला जीव त्यात ओतला आहे.आघाडीचे लेखक बाबूराव मुसळे,यांची नेमक्या शब्दांतील प्रस्तावना कथासंग्रहाचे ढाचा सांगून जाते.त्यांची पाठराखण ही आहे.नेमक्या शब्दांत संग्रहाचे सार त्यांनी आस्तिक शब्दांत मांडले आहे. चारचौघात जायचं म्हणल्यावर थोडं सावरून आवरून जायचं असतं.,थोडसं नटून थटून ही..!!अगदी तसचं काहीसं इथं घडले आहे. बुकशेल्पवर उठून दिसेल असा हा कथासंग्रह  साधला आहे.

                     हा कथासंग्रह केवळ सहानुभूती जागवत नाही, तर वाचकाला त्यांच्या जगण्याचा विचार करायला लावतो.ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी, श्रमिकांच्या जगण्याचे तपशील अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा.साहित्यात वास्तववादी मराठी लेखनाचा ओघ वाढतो आहे. अर्धा कोयताहा त्याच धारेतील महत्त्वाचा टप्पा आहे. लेखिकेच्या शैलीमुळे या कथा मराठी साहित्यात अधिक गडद आणि परिणामकारक ठरतील.त्या कमालीच्या अश्वासक आहेत.

                                                                                      परिक्षण: परशुराम सोंडगे, बीड

 पुस्तकाचे नाव: अर्धा कोयता (कथासंग्रह)

 लेखिका: अलकानंद घुगे-आंधळे

 प्रकाशन: परिस पब्लिकशन सासवड,पुणे

मंगळवार, २५ मार्च, २०२५

सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड

 'युद्ध पेटले आहे' हा सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड

1000454734
कवी वीरा राठोड भाष्य करताना


बीड – साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर ते समाजाच्या मनातील आंदोलनाची अभिव्यक्ती असते. सामाजिक अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या भावना शब्दरूपात मांडत, कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी रचलेल्या 'युद्ध पेटले आहे' या महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ अनुदान प्राप्त काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच बीड येथे पार पडला.


क्रांतिकारी उद्घोषणांचा सोहळा

हा प्रकाशन सोहळा केवळ साहित्यिक कार्यक्रम नव्हता, तर तो परिवर्तनाच्या निर्धाराचा महोत्सव होता. प्रगतिशील लेखक संघ व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात क्रांतिकारी गीतांनी वातावरण भारावून गेले. शाहीर समाधान इंगळे, शाहीर अमरजीत बाहेती आणि नभा यांच्या स्फूर्तीदायक गीतांनी उपस्थितांची मने जागृत केली.


शहीद दिनाचे औचित्य साधून अभिवादन


कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव तसेच अवतारसिंह ‘पाश’ आणि साळूबाई डोरले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि अभिवादन करून करण्यात आली.


काव्यसंग्रहाचे महत्त्व व त्याचे सामाजिक प्रतिबिंब

1000454829


साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी वीरा राठोड यांनी या काव्यसंग्रहाचे सखोल विश्लेषण करताना नमूद केले की,

"नागरगोजे यांच्या कवितांमध्ये केवळ शोषितांच्या वेदनांची तडफड नाही, तर त्यांच्या हक्कांसाठी एल्गार पुकारणारी गर्जना आहे. ही कविता अन्यायाविरोधात उभी राहण्याची प्रेरणा देते आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्यास भाग पाडते."


कवी बाळासाहेब नागरगोजे यांचे भावनिक मनोगत


"ही कविता केवळ माझी नाही, ती माझ्या मातीची आहे. माझ्या कष्टकरी आई-वडिलांच्या अश्रूंची आहे. भगतसिंहांचे जाज्वल्य विचार हीच माझी काव्यप्रेरणा आहे," असे कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी भावनिक शब्दांत सांगितले.


विद्रोह, आक्रोश आणि परिवर्तनाचा संदेश


आंतरराष्ट्रीय साहित्य अभ्यासक जयपालसिंह शिंदे यांनी नमूद केले की,

"जागतिक साहित्याचा प्रभाव नागरगोजे यांच्या कवितांमध्ये जाणवतो. विद्रोह, आक्रोश आणि परिवर्तनाची आशा ही साहित्याची प्रेरणा राहिलेली आहे आणि तीच भावना त्यांच्या कवितांतून स्पष्टपणे दिसून येते."


काव्याचे शब्दशिल्प आणि सामाजिक जाणीव


प्रा. ललिता गादगे मॅडम म्हणाल्या की,

"या कविता केवळ वेदनांचे प्रकटीकरण नसून, त्या परिवर्तनाची स्फूर्ती देणाऱ्या आहेत." तसेच, प्रा. सुधाकर शेंडगे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की,

"ही कविता समाजशिक्षकाची भूमिका घेत क्रांतीची दिशा दाखवते."


मान्यवरांची उपस्थिती आणि वाचकांचा प्रतिसाद

1000454738



कार्यक्रमास अनंत कराड, डॉ. रामदास नागरगोजे, माजी कॅप्टन प्रल्हाद बांगर, राजकुमार कदम, गोकुळ पवार, ॲड. करूणा टाकसाळ, राजेंद्र गोरे, नवनाथ मिसाळ, संजय सावंत, रमेश बडे, अजित तांदळे, प्रमोद सानप, ॲड. महेश भोसले, प्रकाश घाडगे, वर्षा केंडे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी आणि श्रोते उपस्थित होते.


वाचकांनी कवी बाळासाहेब नागरगोजे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कवितांवरील प्रतिक्रिया मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर समाधान इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन येडेश्वर नागरगोजे यांनी केले.


निष्कर्ष:

"युद्ध पेटले आहे" हा केवळ एक काव्यसंग्रह नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा एक मजबूत आवाज आहे. हा संग्रह वाचकांना अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा देतो आणि क्रांतीसाठी सज्ज होण्याचे आवाहन करतो.


📖 हा लेख तुम्हाला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि हा प्रेरणादायी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा!



शनिवार, २२ मार्च, २०२५

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

1000448305
'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला.
पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे.
होरपळत गेलेली स्वप्न,व्यवस्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व आकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.हीचं हया कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.
               या तप्तव्यवस्थेच्या जाळात होरपळून निघताना मनाला फुटलेल्या उकळीला कुठला ताल सूर आणि लय असू शकतो का? अलंकारिक शब्दाच्या व यमकाच्या मोहात बाळासाहेब नागरगोजे यांच्या कविता गुंतून पडत नाहीत.उकळणं जिथं नैसर्गिक तितकचं या कविता पण अकृत्रिम व स्वभाविकचं आहेत.भावनेच्या कल्लोळात अंतरंगातील शब्द उसळत राहतात.ताला सुराचे साज ती लेतं नाही.हल्लीची मराठी कविता कृत्रिमतेच्या अनेक साच्यात अडकून पडू लागली आहे.बाळासाहेब नागरगोजे यांची कविता तसल्या चौकटीत अडकत नाही तर त्या सा-या चौकटीत उलथून प्रकट होणारी आहे.
                               या कवितात विद्रोह आहे पण ऊरबडवेपाणा नाही.आक्रोश आणि टाहो नाही तर संघर्षाच्या गर्जना त्यात आहेत.आपल्या समोर असलेले प्रत्येक शस्त्र हाती घेऊन पिसाट झालेल्या भणगं माणसाची ही कविता आहे.कवीचे एक एक शब्द शस्त्रप्रमाणे अंगावर कोसळत राहतात.
 ‘युद्ध पेटले आहे’ हे शीर्षक असलेली कवितेतूनच त्याचा प्रत्ययं येतो.
भगतसिंह आभाळातून अवतरत नाहीत.
तो भयाण प्रतिकूलतेतही
फुटणारा अंकुर आहे.
भगतसिंह म्हणजे फक्त शरीर नव्हे
मृत्यूने ओढून नेलेल्या युगाचा अंत नव्हे.
युगानुयुगे चिरंतन असू शकतात अश्या विचारावर ही कविता बेतत जाते.अभावने व अस्वस्थतेने अकाराला आलेल्या भावविश्वात ही कवी जगण्याचा चंग बांधतो.
‘प्रिय डॉमिनिक’ या कवितेत कवी म्हणतो.
तू मेली असतीस तर
मी झोपलो असतो निंवात
पण हाय !
तू जगायचा निर्णय घेतलास.
आपल्या आईच्या वाटयाला आलेलं जगणं व संघर्षाची या जगात कुठे ही नोंद घेतली जाणार नाही.कष्टक-यांच्या घामाचे रक्ताचे इथे मोल नाही.दखल कुणी घेत नाही.याची खंत त्याच्या मनात आहे.उपेक्षित माणसाची व्यथाचं क्रांतीचे बीज पेरत असते ना?
‘खांडसरीत ढोरमेहनतीने तिच्या अंगावरची
कातडी सोलून निघाली होती.
पण या घटनेची कुठे ही नोंद नाही.’
तिसरा डोळा उघडून महादेव तांडव सुरू करतो.जग विनाशाच्या बिंदूवर असते.तेव्हा जग हादरत.युगालाचं आपले युगपुरुष उभे करण्याची अपरिहार्यता असते.ते होणारच असते.ती सृष्टीची ही अपरिहार्यताचं असते.
'या क्रांती मार्गावरचा मुसाफिर म्हणून
मी पहिला नव्हतो
आणि शेवटचा ही नसेल..!!
परिवर्तन ही विश्वाची अटळता आहे तसेच शोषणाची वंशावळ ही युगानुयुगे तशीच चालत आलेली आहे.
हि विषवल्ली आजची नाही रे
युगानुयुगे ती फोफावत आलेली आहे.
ज्यांनी ब्रिटनला,जाॅन ऑफ आर्कला रसरसत्या आगीत लोटले.क्रॉसवर्ड जीससच्या हातावर खिळे ठोकले.सत्य सांगणा-यांच्या डोळ्यांच्या खाचा केल्या....
खिचपत पडणे,पिचून जाणे, तुटणे. वाकणे किंवा मोडणेचं मान्य नसलेला प्रचंड आशावाद पाानोपानी पेरत जाणा-या
 या कविता आहेत.
समग्र क्षेत्रात सुरू झालेला संघर्ष कवी विशद करतो.युध्दाचा शेवट काय असेल याची फिकीर सैनिकाला नसते.जग बुडाले तरी त्याची त्याला पर्वा नसते.
युध्द अटळ असते.ते कुणी लादत नाही.लादून घेत ही नाही.समाजात स्वार्थ पिपासू,सत्ता पिपासू लोक फसवे मुखडे घालून वावरतात.
धर्माच्या जातीच्या गुंगीत ठेऊन माणसाला धूंद बनवतात.ती धूंदी माणसाचा मेंदू बधिर करते.
भकास मराठवाडय़ातील कंगालत्व ते आपल्या प्रखर शब्दातून मांडत राहतात.
चोहीकडून घेरलेले असले तरी कवी हताश होत नाही.तो सर्वांना आव्हान करतो.गस्त जागी ठेवा.
अंधाराच्या उरावर काठी आपटत पहाटेची स्वप्न पाहणारा नायक या कविता मधून तो उभा करत राहतो.
'फक्त
सत्तेच हस्तांतरण
म्हणजे स्वातंत्र्य नव्हे
लढा संपलेला नाही.
स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.'
 कवितामध्ये शब्द संयोजन कवीच्या समृध्द अनुभव विश्वाचं, वाचनाची व व्यासंगाची फलनिष्पती आहे. राजकीय फसवणूक आणि माणसातील माणुसकी हरवत चाललेला काळाच्या पाठीवर ही कविता आपले ओरखडे ओरखडीत पुढे सरकते आहे.
‘पुढच्या युध्दाच्याच
गर्भधारणेचा मोसम असते
इतिहासाचे गाढव
पुन्हा त्याचं चौकात तसेच ओसाड उभे आहे.’
या संग्रहातील कविता शोषण,अन्याय, क्रांती आणि सामाजिक परिवर्तनाच्या धाग्यांभोवती गुंफलेल्या आहेत.कवीच्या लेखणीतून व्यक्त होणारे विचार हे केवळ वेदनांचे वर्णन नसून संघर्षाच्या गर्जना आहेत.परिस्थितीस शरण जाणारी नाहीतर ती या व्यवस्थेविरूध जंग पुकारणारी कविता आहे.हे युध्द शोषकाच्या विरोधात शोषितांनी पुकारलेले आहे.यातून श्रमिकांचे जगणे आणि त्यांच्या दुःखाची खोल समजूत प्रकट होते.कवी आपल्या' चक्रव्यूह' या कवितेत आपल्या मनाची पराकोटीची अस्वस्थता आपल्यापुढे मांडत राहतो.
'माझ्या दारातनू रक्ताचे पाट वाहत असताना
मी मनशंतीसाठी नाही प्रयत्न करू शकत
ते रक्ताचे पाट रूंद होत जातात त्यांची उंची वाढत जाते
आणि ते थेट माझ्या पायाला स्पर्श करतात
तेव्हा मी लेखणी उचलतो
पाझरत राहतात काळजातून
साचलेल्या माझ्या वेदना.
कवी समाजव्यवस्थेतील ढोंगीपणावर घणाघाती टीका करतो.
 
1000449044

 बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेची भाषा ही सरळ, साधी नाही ती गुढ आहे.अंशत: अबोघ आहे.पण अत्यंत प्रभावी आहे.ती कुठेही अलंकारिक शब्दांच्या शोधात गुंतलेली नाही,तर ती अधिकची धारदार होत गेलेली आहे.
मुक्तछंदातील सहजशैली,आक्रोश आणि विद्रोहाचा सूर,बोलीभाषेतील थेट संवाद
संस्कारांची जाणीव,सामाजिक विसंगतीवर तिरकस आणि प्रखर विद्रोह ती करत राहते.
‘तुला माहितीये?
आपल्या आयुष्याचे बांधिल गि-हाईक उरावर घेत
माझ्यातील वेश्या
खंगत चाललीये.’
त्यांची कविता वाचताना जाणवतं की, हे शब्द कुठल्याही लयीत बसवलेले नाहीत, तर ते युद्धात उचललेली शस्त्रं आहेत.ते कुठेही सौंदर्याच्या चौकटीत अडकत नाहीत कारण त्यांचा उद्देश मनोरंजन नाही तर परिवर्तन आहे.
    "युद्ध पेटले आहे" हा संग्रह समकालीन मराठी साहित्याच्या विद्रोही धारेतील एक आहे.पारंपरिक कवितांप्रमाणे ही कविता निसर्ग, प्रेम,भक्ती यांसारख्या विषयांभोवती फिरत नाही तर समाजाच्या गाभ्यातील दुःख आणि संघर्षाच्या खोल तळाशी जाऊन भाष्य करते. माणसाच्या मनात राखेत गुडूप झालेल्या निखा-यावर ती फुंकर घालते.गुलाम या कवितेत कवी म्हणतो.
’खूप प्रिय असतात
त्यांना गुलाम.
गुमान काम ऐकणारे सांगकामे '

कवींच्या कविता जशा तत्कालीन समाजातील दुःख प्रतिबिंबित करतात,तश्याचं मनाच्या गाभा-यात खोल तेवत असणा-या घटना,व्यक्ती व भवना अपोआपच बाहेर येत राहतात.
साळू काकू,सुंदरा अक्का ,आण्णा,तुम्ही गेल्यानंतर आणि रद्दी या सारख्या कविता मनाच्या तळाशी चाललेला कोलाहलचं फक्त प्रकट करत नाहीत तर युक्रेन,इस्त्रायलचे युध्द सारख्या जागतिक घटनावर ही आपल्या संवेदाना प्रकट करत राहतात.त्यामुळेचं कवितेंचा पट विस्तारात जातो.
                                नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही साहित्याची आठवण या कविता वाचतानी येते.काही अंशी नामदेव ढसाळ यांची जी अस्वस्थता कवितेतून जाणवत राहते.एक भणगता ही भाषाशैलीत जाणवत राहते.या कवीच्या कवितेची उग्रता आणि वास्तवदर्शी भाषा प्रभावी वाटते.बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेत आशावाद आणि क्रांतीची भाषा आहे.हा संग्रह केवळ संवेदनशील वाचकांसाठी नाही तर तो संघर्ष करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायी आहे.हे कवितासंग्रह वाचल्यानंतर एक निष्क्रिय वाचकही विचार करायला लागतो, आणि हाच या कवितांचा सर्वात मोठा प्रभाव म्हणता येईल.
1000448891


                              












                              ही कविता केवळ तक्रारीत अडकलेली नाही,तर संघर्षाला प्रवृत्त करणारी आहे.केवळ व्यक्तिगत दुःख मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या वेदनांची साक्ष देणारी आहे पंरतु विद्रोह,अक्रोश व संघर्षानेच या कविता भरावलेल्या आहेत.त्यात मानवी जीवन सुखच्या आशेवरचं पुढे सरक असते.मानवी जीवनातील सुखाचा जो पदर असतो.तो कुठे ठळकपणे पुढे येत नाही.भाषाशैलीत सहजता व सुलभता नाही.कधी कधी आशय फारच गुढ होत जातो व कविता अबोधाच्या चकोरीत फिरत राहते.
 कवीने पहिल्या प्रयत्नातच संघर्षशील,आक्रमक आणि परिवर्तनवादी कविता साकारल्या आहेत. त्यामुळे हा संग्रह मराठी साहित्याच्या विद्रोही परंपरेत एक नवीन आणि मजबूत आवाज म्हणून पुढे येईल यात शंका नाही.
        साहित्या अकादमी पुरस्कार प्राप्त कवी विरा राठोड यांची पाठराखण व कवी अनंत कराड यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे ही या संग्रहासाठी मोठी उपलब्धी आहे.मोजक्या शब्दात त्यांनी कवीच्या भावविश्वाचा व कवितेचा आशय व्यक्त केला आहे. मुखपृष्ठ ही वेगळया धाटणीचं असलं तरी प्रभावी आहे व संग्रहातील कवितांवर ते चपखल बसलं आहे. सुभाष कुदळे,यांनी ते चित्तारले आहे तीची भाषा असली तरी एकदम उचच्तम काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचायलाच हवा असा आहे.
वाचताय ना?
पुस्तकाचे नाव:युध्द पेटले आहे
कवी : बाळासाहेब नागरगोजे
प्रकाशन : अनघा प्रकाशन, ठाणे
                                                                                                           परशुराम सोंडगे,बीड
                                9527460358

रविवार, १६ मार्च, २०२५

श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.


श्रावणी बाळ ,'मला माफ कर
'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.
बीड जिल्ह्यातील  केज तालुक्यातील विनाअनुदानित  शाळेतील शिक्षक  धनजंय नागरगोजे यांनी आपल्या मुली उद्देशून  फेसबुकवर  भाव पोस्ट करत आयुष्य संपवलं.
श्रावणी बाळ,मला माफ कर'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं
दुदैवी-शिक्षक-धनजंय-नागरगोजे
होय,शिक्षक पण आत्महत्या करतात.
काल-बीड-पुन्हा हादरलं.
काल 'पुन्हा बीड हादरलं. एका शिक्षकाने फेसबूक पोस्ट करून आपलं आयुष्ष संपवलं.

मान्य तो खचला.त्यानं त्याच्या खडतर जगण्याच्या या जंग मध्ये 'पराभव पत्करतला. त्याचा इथल्या व्यवस्थेने बळी घेतला.आपत्या डोळ्यातली उरली सुरली स्वप्न कुणी खुडून घेतली. जाळून टाकली की माणूस हताश होतो.खचतो. माणसं मरतात.आत्महत्या करून मरतात? हल्ली आपलं मरणं जाहीर करून लोक मरत आहेत.

 नाही झेपला त्याला हा संघर्ष. तो गेला.भवसागरातील बुडबुडा शांत झाला.
 या आथांग भवसागरातल तो लुप्त झाला. कदाचित त्याच्या आयुष्याचा हा पूर्ण विराम असेल? त्यानं आपण होऊनच आपला जीवनरेषाखंड आखून घेतला. त्याचं हे जाण अनेक प्रश्न उमटून गेले.नुसता माणूस मरत नसतो.
 श्रावणीचा बाप..हिरावला. 
कुण्या सुवासिनीचं कपाळ पांढर झालयं.
कुणाचा पोटचा गोळा गेलाय.
 त्या दुःखाची आपण कल्पना ही करू शकत नाहीत.
 हे झाल आपलं आपल्या शरीरात हदय नावाचा एक अवयव आहे .डोळ्व्यातले आसवं आपण सहज ढाळू शकतो? एवढच करू शकतो ना आपण त्या दुदैवी जीवासाठी?
    या दुःखाच्या जाणिवा संस्था चालकाना नसतात कारण ते लांडग्यांच्या काळजाचे असतात.त्यांना दया मया काही नसते.त्यांच ह्रदय हे दगडाची असतात. पैसा व सत्तेचा एक माज आसतो.तो माज माणसाला असंवेदनशीलशील बनवतो. प्रत्येक जीवाचं जगण्याची आपली काही सुंदर स्वप्न असतात.
 काही आशाचं मूळं मनात खोल रूजत गेलेली असतात. त्या स्वप्राच्या मागे तो धावत राहतो.जीव स्व्नलोलुप असतो.
     मासे कसे पकडतात?गळाला आमिष चिकटवलेले असतं.गळ पाण्यात फिरत राहतो. मासे आमिष पकडण्यासाठी प्राण परात आणि शेपटात आणून तडफडत असतात.गळ नरडीचा लागतो. तडफडत राहतात मासे.सा-या हालचाली निर्थक असतात 
      तशी ही माणसं कायम विनाअनुदानित शाळेत अडकली जातात.जगणंचं मरण होऊन जातं त्यांच. कायम विनाअनुदानित शाळेतील हे शिक्षक शिक्षिका त्या तडफणा-या माश्या सारखी असतात. अर्थिकदृष्टया माणूस कुमकवत होत गेला की तो खचत जातो.आपल्या आशा आकांक्षाला मुरड देत राहतो.तो तडजोडी करतो.त्याला तडजोडीची सवय जडते. त्याला कुणाशी पंगा घ्यायचा नसतो.पाय बांधलेले डुक्कर कुणाशी थोडचं पंगा घेऊ शकत? ते फक्त तडफडू शकतं.बेकू नाही म्हणून तोंडात बोळा कोंबण्याची ही सोय असतेचं की कुणी तरी सांगितलेले.वाचलेले आठवते 
 अंधारा नंतर प्रकाश असतो.प्रत्येक रात्री नंतर हासरी सकाळ असते.असं थोडचं असतं आयुष्यातल्या सा-याचं वाटा फुलांनी सजवलेल्या.हे ही दिवस जातील या आशेवर तो दिवस ढकलत राहतो.
      तो ढकलत नाही.तो त्या चाकोरीत फिरत राहतो. कुणी तरी मातीत बीज होऊन गाड्रून घेतल्याशिवाय झाडं डवरतं नाही.फुलांनी फळांनी सजत नाही. आपल्या आयुष्याची तर माती झाली आहे.किमान आपल्या या त्यागातून आपल्या मुलांच्या आयुष्यात तरी पहाट उगवेल अशी अशा असते, 
त्या पुसाटश्या आशेचा अंकुरचं छाटून घेतला गेला तर? तू फाशी घे. एक जाग रिकामी होईल? आम्हाला ती भरता येईल? अस कुणी तरी सांगत आणि हा माणूस स्वतःला मरून घेतो.
  व्यवस्थे विरूध्दचं बंड विनाशाला अंगावर ओढून घेते निर्ढावलेले गिधाडे हे सोडणार नसतात. त्यांना पण काळ सोकावून च्यायचा नसतो.आपला दरारा संपण म्हणजे आपलं साम्राज्य धोक्यात येणं असतं.
      प्र्येकाला आपलं साग्राज्य प्रिय असतं.त्यासाठी वाटेल ते.कायपण. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते.ती पण अतिशय क्रूरपणे.आपली दहशत हीच तर त्या गिंधाडाची ताकद असते. आपल्याला ही हलाल करून मारतील अशी भिती धनंजय नागरगोजे यांना ही वाटलीं.
     मरण ही कोणत्याचं जीवाला हालहाल करून हवं नसतं.भय काल्पनिक असतं.त्याचा एक भोवरा असतो.त्यात जीव गुरफटत राहतो.भिरभिरत राहतो.त्यातूनच ही आत्महत्या झाली जगण्यासाठी नाही मरण्यासाठी त्यांनी दोर जवळ केला.
      आता ज्याची नावं टाकली. त्यांच्यावर गुन्हें दाखल होतील.अटकपूर्व जामीन ही होईल. केस चालू राहिल, कोर्टाच्या अभिलेख्यावर पण..
. पुन्हा कुणी शिक्षक आत्महत्या करणार नाही. याची ग्वाही कुणी देंणार नाही.
हमी तर नाहीच नाही. ज्यांनी एका माणसाच्या रक्तावर रंगपंचमी केली. त्या नराधमासोबत आपले न्यायाधीश रंग उधळत असतील तर ? न्याय कसा असेल? पळवाटा तर आताच आखून घेतत्या असतील ना? आपण या व्यवस्थेचा धिक्कार तरी करणार आहोत का? का उसळेल्या झुंडीत सामिल होणार आहोत?

गुरुवार, १३ मार्च, २०२५

शिमगा: बोंबलायचा आणि धम्माल करण्याचा सण..!!!

1000434728



शिमगा सण म्हणजे बोंबलायचा सण.शिमग्याला होळी म्हणतात,हे लयीत उशीरा कळलं आम्हाला एक मारकुटे मास्तर होत कुलकर्णी  ते फार शुध्द बोलायचं त्यानं आमच्याकडून होती हा शब्द घोटून घेतला होता पण आम्हाला शिमगा आवडायचा.शिमग्याला बोंबलायचं नि पोळी दुधावर वरपायची हेच माहित होतं.होळी रे होळी नि पुरणाची पोळी.. !!! 

एकाचं एक सण असा होता तो आमच्यावर फुल डिपेंन्ड  असायचा.पोरा नि जर शिमगा लयं सिरीअस  नाही घेतला तर आमच्या भेटू पाटलांकडून लयं टेन्शन यायचं.लाकडं गोव-या कश्या आणणार.लोक लयीत दिलदार असत्यात.त्यांना म्हटलं कुणी लाकड किंवा गोव-या आणा तर कोण आणतोय. सारं हात हालवली येणार.त्यामुळे पाटलांकडून आमची म्हणजे बाप्पाची व परम्याची गँग लागे.तेव्हा  सरकारला नापासाची चिंता नसे.आमचा बाॅस बप्या सलग पाच बा-या नापास झाला होता.त्याच्या बरूबरची पोरं पार दहावीला गेले.हा आमच्याच वर्गात.सा-यात टोंगळा..!! त्याची सरकारला नाही व कधी त्याच्या बापाला ही नापास होतोय म्हणून चिंता वाटली नाही. बप्या तर डेंजरस माणूस होता.

टेन्शन लेने का नही देने का? हा त्याचा मंत्र.

भैरू पाटील देई आम्हाला चिमकून.पाटलाचा पाठींबा भेटला वर आम्हाला कोण आठवीत असतं? तेव्हा कॅलेंडर हा प्रकार नव्हताच.मग शिमगा जवळ आलाय हे कसं कळणार?  गोव-याची कलवड  व लाकडं लोकांनी लपायला सुरू  केले की,आम्हाला क्लिक होणार.शिमगा आ रहा है. करो तय्यारी..!!

  आमच्या गँगचा प्रमुख बप्या त्याला टेन्शन  येणार गोव-या व लाकडं जर नाही चोरली तर शिमगा कसा होणार? मग काय शाळा सुटली की,आमचं हे धाडसत्र सुरू होणार.कुणाच्या परसात शिर, कुणाच्या गोठयात शिर.कुठून कुठून गोव-या सरपण आणलयंच जायचं.जाताना लपून छपून जायचं.येताना मात्र बोबलत यायचं.आम्ही सारी होळीची लेकरं....

1000434730

आडव येईल त्याला मूठ मूठ खापरं. बोलला आता..!! 

कधी हरताळ खेळत जायचं.लाकड घेऊन यायचं.छत्रपती महाराजांचा गनिमी  कावा मास्तर आम्हाला शिकवी.त्याचा उपेग आम्ही शिमग्याच्या सणासाठी वापरतं.गनिमी कावा करूनचं आम्ही हे करत.सुरांची लूट केल्यासारखं आम्हाला ते वाटे.त्यात बाप्या आणि गँग कुणाचा कसूर भी काढत.घराच्या भांडणाचा भी राग निघ.एखादयाचा आख्खा कलवड खल्लास करायचा.बोलायची सोय नाही.होळीचं लेकरं...!!कोण ऐकून घेतेय? गोव-या लाकडं नाही आणलं की होती कशी करणार? आमच गॅग जुळली की अजून एक दोन गँग ही आम्हाला येऊन मिळत.

होळी है बुरा न मानो ही बोंब तर ठरलेलीच असे.

आम्ही  असं चोरून गोव-या वगैरे आणतो हे आमच्या घरी ग-हाणं केलं.कुणी टोमणं मारलं,तर मग मर गया वहो. आमच्याशी वाकडं,म्हंजी परसात नाही लाकड . असा पंगा घेणारं कुणी भेटलं तर त्याच्या मागे आम्ही बोंबलत  चालणार. त्याला पार जेरीस आणणार.

गावात आम्ही असं मेहनत करीत म्हणून होळी पेटवली जायची. गोव-या लाकडं आणण्यचं कोण? भला मोठा डोंगर रचावा तसा लाकड व गोव-याची होळी रचली जाणार.पाटील ती पेटवणारं.तिचा डोंभ झाला की पोरं...नुसते बोंब मारत. त्या भोवती नाचतं.

एक होत पोरी आणी बाया तिकडं फिरकत  नसतं.लयी घाण घाण...शिव्या पोरं देणार. घाण बोलायचं.बोबंलायचं. उड्या मारायचं...!! नुसती मज्जाच मज्जा...!! पोरं शिमग्याची दिवशी लयी भी उंडारू नाहीत म्हणून शाळाला मास्तर सुट्टी  देत नाहीत अस आम्हाला पक्कं वाटत होतं. शाळाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही थोडचं शाळेचं तोंड बघणार असतो.एखादा शाळात गेलाच तर सारे जण त्याला घेरात घेई.त्याला कशाची तलप होणारयं पुन्हा? 

      लाकडं गोव-या चोरी न करता मागून घ्यावीत बोंब मारू नाही असे छान छान सुविचार आमचे  सर सांगत पण आमच्या गावची लोक फार दलिदंर ते सहजा सहजी लाकडं नि गोव-या देत असतेत व्हयं? सरला काय माहितीयं? पाटलांचा भी रेटा असचं की.लाकडं नि गोव-या चोरलची का पण लय भारी मज्जा असते?होळीच्या लेकराला कुणीचं काय म्हणतं नसे.घरी एखादं कलागत व्हायची पण त्याला काय आम्ही जुमानत नसतं.घरी जायचं.पोळी नि दूध वरपायचं? आलेच बाहेर.भारी मज्जा असे.गोकूळया लयं भारी सोंग घेणार. पारध्याचं. झोळी घेणार.. फाटकं तुटक  बंडी घालणार." तुकडा वाढं ग माय म्हणणार. पालख्यांच्या आवाज काढणार. त्याच्या मागे चिगुरखाना असे. नुसती फिदीफिदी हसतं. 

तेव्हं फक्त भज्याची भीक घेणार. दुसरं काहीचं झोपी घेणार नाही.

"आयला,हयो लयीचं माजुरा पारधी दिसतोय लका." असं कुणी म्हणं.तसं गोकुळात फुगत असे.घरोघर फक्त भजं मागत फिरत चांगल  पाचपन्नास  घर घेतली की ते साँग कुठं तरी थांब. त्याला रामदास्या हेल्प करी.भजाचं लयी मोठा स्टाॅक त्याच्याकडे होई पुन्हा आमची गँग त्या भजावर तुटून पडे. गोकुळात आमचा बाॅस असे.अशी बोळीतले सोंग सारे मंदिरापाशी येतं.मग ऐका ऐकाच सोंग साजरं होई.ते सोंग म्हणजे नुसता तमाशाचा असे.स्क्रिप्ट  नाय आणि ब्रिप्टं नाय.लगेच  सुरू.

   एखाद्या वर्षी  जर ह-या ना-याचा तमाशाला आला तर सोंग आटोपते घेतं.तमाशाला रंग चढे.तारी व वैशी या नायकीणी पारं माणसाला येडं करून सोडीत.त्यांच चावट बोलणं.पोर सोरं- पोरी बाकी म्हतारी कोतारी तरणी ताठी  माणसं एन्जॉय  करीत.संस्कार बिस्कारं अश्या भानगडीत कुणी पडतं नसे.तमश्या नाही आला की सोंग रंगत जाई.ना-याचं सोंग ठरलेलं असं.ना-या खर तर सालगडी पण सोंगात मालक होऊन राहयचा.त्याचा लयं रूबाब असे.त्याचे तीन सालगडी असत. गडयाच व मालकाचं  हे सोंग फारच रंगे.मालक गड्याला नुसतं पळी.गडी भी सटकरं  असावी  लागतं. नुसता पळू पळूच घाम  निघे.

माजं घोंगड कुठे रे? मालक जोरात घोंगड फेकून देई. गड्याने घोंगड आणून द्यायचं तेव्हां गडायाचं लंगोट फिटायचंमाझं लंगोट फिट रे.

माजं गठूठं कुठं रे... मालक भिर्र दिशी गुठंठ फेकून द्यायचा. त्या तीन गडयाची हालहाल करून सोडं. लोकांची मात्र हासून हासून पोटं दुःखाची येळं येई. नुसता हशाच हशा..!!! शिमगा असा फुल्ल एन्जॉय करतं.दुस-या दिवशी तर धुळवडचं.कसले रंगबिंग आलेत.चिखूल, रेंदा आणि गटारचं पाणी यानचं माणस एकमेकाला बरबटून घेतं.सिलव्हर कलर फासून कुणी ही कुणाचं माकडं करून टाकत असे.

1000434729


गडी माणस ब-यापैकी चंद्रावर  गेलेली असतं. ते हवेतच चालतं.त्यात छुटूरमुठूर  कलागती भी होतं पण बेवडयाच्या कलागती कोण सिरीअस  घेतयं? माणसाला सारं हवं असे.आता यातलं काहीचं राहिलं नाही.सारं सारं संपून गेले आहे. शहर बदली आहेत तसे गावं ही बदली आहेत. गोव-या लाकडं आता पाहयाला भेटत नाहीत.पर्यावरणाचं पण टेन्शन नव्हतं तव्हा.आता सण आला की पर्यावरणस्नेही  नावाचे प्राणी येतात जगाची चिंता करत बसतात असले चिंतातुर जंतू फार नव्हते. गावची पंग झालेली माणसं जग बुडत म्हणल्यावर कंबर कसून कामाला लागली असती.नाय तरी हे जग कुणाला पायजे असते?

        आता माणसं सोशल  मिडीयावर  होळी साजरी करतात फेसबुक व व्हाटस् अप वरून शुभेच्छांचा धो धो पाऊस पाडतात.होळीच्या शुभेच्छा देतात. दुर्गुणांचा नाश केला जातो. आपण आपले दोष जाळून टाकण्यासाठी होळी पेटवायची असते.असे सारे म्हणतात.होळी तर दरवर्षीच येते.पेटते पण सद्गुणी माणसं कुठचं दिसतं नाहीत. नेमकं होळीत आपण काय जाळत आहोत?

होळी नि संस्कार ? हे नाय बुवा आपल्याला पटतं.

होळी फुल्लं एन्जॉय  करायचा सण..!! उपदेशाचा डोस पिण्याचा नाही.

मस्ती करायचा सण..!!

आता ठरवा.आपुन काय करायचं?

सोमवार, १० मार्च, २०२५

सिनेमाचे पडद्यावरचे पात्र आणि समाजाची भावना: एक वास्तव विचार

1000426329

बरेच माणसं आता मेंदूचा वापर कमी करू लागले आहेत.

ह्रदयचं त्यांच मेंदूचं काम करू लागले आहेतं.

ह्रदयाला काही बुध्दी नसते.तिथं नुसता भावनांचा कल्लोळ असतो.

मेंदूचं कन्फ्यूज झाला आहे.

त्यामुळे बरीचं माणसं विचित्र बोलतात.वागतात.

त्या जुवेकरचचं घे ना?

तो चक्क अक्षय खन्नाला अजून ही बोलत नाही.

का म्हणून काय विचारता ? 

अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केलाय ना? नुसता रोल करेना का?कुणी कुणाचा ही रोल करते पण इतका हुबेहुब रोल करत असतेत का कुठं? 

काय डेंजरस रोल वठवला गड्यांनी? तो खरचं औरंगजेब वाटतोय.

 तो रोल केल्यामुळे भयंकर राग आलाय त्या जुवेकरला त्या अक्षय खन्नाचा.त्याने (म्हणजे औरंगजेबाने अक्षय खन्नाने नव्हे) इतका शंभू महाराजाना त्रास दिला.त्याला कसं बोलायचं? नुसती चीड येते हो त्याची.संताप पण.

आता चित्रपटात माणसं रोल करतात म्हणजे...?? ते खरे थोडेच असतात?जुवेकरला हे मान्य नाही. खरचं तो नाही बोलला त्या अक्षय खन्नाला.अजून पण नाही बोलत तो त्या खन्नाला.

त्या विकी कौशल सोबतचं तो राहयचा? असचं नाही.विकी कौशल म्हणजे साक्षात शंभू राजेच त्याला वाटत असतील.असं नक्की त्याला फिलींग येतचं असणार.अक्षय खन्ना जर त्याला औरंगजेब वाटत असेल तर विकी कौशल शंभू राजेच वाटत असणार ना? आणि रश्मिका त्याला महाराणी येसूबाई वाटत असणार.

असं एकटं जुवेकरलाचं होतं असं नाही अनेकांना होतं आहे.

नाटकातली सिनेमातली पात्र खरी वाटू लागतात तेव्हा त्या नाटकाचं त्या सिनेमाचं.खर तर ते यश असतं.त्या अभिनयाचं यश असतं. पूर्वी ही खलनायक स्टेजवर आले की माणसं ओरडतं,त्याला शिव्या द्यायचे.

अमरीश पुरी हे कायम खलनायकचं असतं.त्यामुळे त्याला ही लोक खलनायकचं समजतं. वास्तविक जीवनात त फार हवे होते. तेच शक्तिकपूरचं झालं होतं.अनेक मुली महिला त्याला घाबरतं.तो कायमचं बलात्कार करी.शक्तीकपूर चित्रपटात,असला की एक बलात्कार पाहावासा लागे .रम्मा रेडी नावाचा एक साऊथचं खलनायक होता. त्याचा प्रतिबंध चित्रपटातील नाना स्पॉट हा डायलॉग खूप गाजला होता.तो नुसता पडद्यावर दिसला तरी माणसं थरकाप असतं. रस्त्यावर चालताना लोक त्याच्या गाडी पाहिली की बाजूला होतं. त्या गडयाचा दरबाराची तसा होता.

प्रभू रामचंद्र चंद्राची पात्र करणारा त्रिवेदी असो की द्रौपदी साकारणारा रूपा गांगुली असो कि रामायणातील सीता करणारी दीपिका असू लोक यांची पूजा करतात. नितीश भारद्वाज लोक कृष्ण समजून बसले आहेत.

 आमच्या गावाची त-हा विचारूच नका.आमच्या शाळेत सैराट चित्रपटावर एक मुलांनी आणि एका मुलींनी डान्स केला. पोरं झक्कास नाचली.

पंचाईत ही झाली की ती पोरं शाळेत आली की मोठी गंमतच होई. सारं जगाचं त्यांच्या मागे लागे.

पोट्टी नुसती ओरडतं. अर्चीन परश्या...अर्चीन परश्या..!! ते रडकुंडीला येतं.हसावं का रडावं हेच कळत नव्हतं.

नाटकाचा आणि सिनेमाचा आपल्या भारतीय समाजावर फार होतो. सहसा युवा वर्ग सिनेमातल्या हिरोला फॉलो करतात.आज ही मालिकेतल्या कपड्याचे दागिन्यांचे डिझाईन्स महिला फॉलो करतात. तात्पुरतं नाटकाच्या सिनेमाच्या विश्वात आपण वावरत असतो.

ते काही तासांत असावं. माणसानं आपल्या वास्तवात यावं ना? तसं घडतं नाही.माणसं त्याचं व्यक्तीरेखात अडकून पडतात. त्यामुळेच केरला फाईल,काश्मीरी फाईल व अलिकडचा दीघे नंबर एक दीघे नंबर दोन असे चित्रपट राजकीय लोक काढतात व आपली वोट बॅक मजबूत करतात.

त्यात त्यांना यश ही येते.

माणसं भावूक होतात.आपली सदसद्विवेक विवेक बुध्दी विसरून जातात.त्यामुळेच सुपारी बाज इतिहासकार आणि अभ्यासक यांच फावते आहे.

मला या सा-याचं टेन्शन्स नाही मला त्या अक्षय खन्नाचं टेन्शन्स आले आहे.

आता औरंगजेबाच्या कबरीचं ही राजकारण रंगलयं.कबरं येथे का ठेवायची?ती उकडून टाकावी.

औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा दुश्मन होता.शंभू राजांना त्यांनी हालहाल करून मारलं.

त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का ठेवायची? आजही काही लोक तिथे नमाज पठणाला जातात चादर चढवतात.औरंगजेबचं,उदात्तीकरण करणारे लोक आता,असूच कसे काय शकतात? हे प्रश्न काही वावगे नाहीत. आपला

इतिहास आता ख-या खोटयाच्या तावडीत सापडलेला आहे. आता काय करायचं?

हे असचं चालू राहिलं तर?

अक्षय खन्नाचं काय होईल याची मला चिंता वाटते.

त्याला सारेच क्रूर औरंगजेब समजात. 

त्याच्या जीवावर ही भूमिका बेतू नाही.

दुसरं काय?

 रिश्ते वही सोचं नई...!!

 जमाना ही दिलवालों का है| 

दिमाग का कोई काम नही.


                    परशुराम सोंडगे बीड

बुधवार, ५ मार्च, २०२५

मृत्यूही ओशाळला होता…! | संतोष देशमुख हत्या आणि समाजाचा संवेदनाहीन चेहरा"

1000419343

कालचा दिवस इतक्या दुर्दैवी होता की,मी ते संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहू शकलो.आता ही माझ्या डोळयासमोरून ते दृश्य हालत नाही.डोळयातील आसवांना खंड नाही.मेंदूत चीड,संताप आणि हाताशपण्याच्या लाटा उसळत आहेत. 

मीच माझ्याचं चेह-यावर का थुंकत नाही? समग्र माणूस जातीवर ती गिधाडे हासत होती.

पुराणातही राक्षस असाचं मृत्यू  एन्जॉय  करतं.  असं अनेकदा ऐकलं होतं. वास्तवात कुणी इतकं क्रूर असू शकत? ह्या राक्षसाचे चेहरे डोळयासमोर नंगानाच करत होते.

 माझी,आज ही नजर त्या रक्ताच्या थारोळ्यात अडकलीय... संतोष देशमुख यांचा निर्घृण खून... त्यांचा पडलेला निपचित देह....!!

...आणि त्याभोवती उभे असलेले ते भावशून्य चेहरे..!! समग्र,माणूस जातीच्या चेह-यावर थुंकणारे ते नराधम.

  तो चेहरा कुणा माणसाचा नाही.ते मुत्तेमवार होते इथल्या समाजव्यवस्थेवर,पोलिस यंत्रणेवर.ते निपचित पडलेले प्रेत आहे इथल्या माणुसकीचे. 

कुणीतरी फोन काढून फोटो घेत होतं,कुणीतरी "व्हायरल करू" म्हणत होतं, कुणीतरी त्यांच्या जखमांची मोजदाद करत होतं...आणि कुणीतरी निव्वळ तमाशा पाहत होतं.,ते पण ऑन लाईन.ते हसू क्रूर होतं.ते  कुठल्याही शस्त्रापेक्षा धारदार होत.काळीज चर्र चिरत गेलयं भाऊ.

   हे हात इतके क्रूर का झाले? त्यांची ह्रदय दगडाची का झाली? का आटून गेली माणुसकीची हळवी ओल त्यांच्या ह्रदयातली? मृत्यूचं दान ही का त्या दुर्देवी  जीवाला ते देत नव्हते?

  सत्तेतून  पैसा,पैशातून सत्ता,अंगात माज.सत्ता रखेल झाली. त्या भ्रष्टतेच्या रगीवर,उशीवर हे सैतान पोसत गेली.उन्मतपणा असाच पोसत गेला.

आता सावा सारखं  त्यांची फाशीच मागणी तेच करतील. दगडाच्या काळजाने संवेदना ही व्यक्त करतील.

ही सारी जागी जाणती माणसं थुंकतं का नाहीत त्या नराधमावर? सत्तालोलुप  त्या गिधाडांवर?

मला नक्की आठवतं.माझी तीस वर्षा पुर्वी  ताई वारली होती.तिचा चेहरा....शेवटचा पाहण्यासाठी मला असचं त्या प्रेतापुढे उभं केले होते.मी डोळे झाकून घेतले होते.मला नाही पाहयचा चेहरा तिचा.आयुष्यभर नाही तिचा हा मलूल चेहरा मी माझ्या अंतरंगात साठवू शकत?

का?

मला तिचा कायम चेहरा हसरा चेहरा माझ्या ह्रदयात कोरून ठेवायचा आहे.

त्या वैभवीला ... तिचा वडिलांचा हासरा चेहरा आठवेल का? तिच्या  अंतरंगात  काय काय चिखल्या गेलयं?

उरात हे धगधगत दुःख घेऊन तिनं असच जगायचं का?

      एकेकाळी मृत्यूला शोकांतिका समजलं जायचं. आज मात्र तो केवळ एक "कंटेंट" बनलाय... सोशल मीडियावर शेअर होणारा, मिम्समध्ये रूपांतरित होणारा, आणि काही तासांत विसरला जाणारा... जसा संतोष देशमुख विसरला जाईल. नराधम पुन्हा नंगानाच करतील तुमच्या आमच्या छाताडावर.

     संवेदनशिलतेपेक्षा तुम्ही जर सत्तेच्या खुर्च्या उबीत बसणार असाल तर काय होईल?

या देशात नराधमाच्या आरत्या होत असतील तर दुसरं काय होईल?

सोमवार, ३ मार्च, २०२५

स्वारगेटला शिवशाही बसमध्ये झाला तो बलात्कार की लफडं? का पेड सेक्स...??? संशय कल्लोळात महाराष्ट्र.

1000416106

पहाटेची वेळ आहे.गजबजलेलं पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन आहे.

एक तरूणी येते आहे. स्कार्पने तोंड बांधलेले आहे.तिला फलटणला आपल्या घरी जायचं आहे.गाडी लवकर येत नाही.बस सहसा वेळवर येत नाहीत हे सर्वांचा अनुभव राहिलेला आहे.त्यामुळे ती बेचैन होते.असं वाट पाहून पाहून थकल्यावर झालं की माणूस हैराण होतो.तसं ती ही झाली.बस येणार आहे की गेली असेल? हा प्रश्न माणसाला फार त्रासदायक  असतो.बसच्या वे॓ळा तर विचारूच नका.स्वारगेट स्टेन्शनच तर माझा वैयक्तिक अनुभव फारच वेगळा आहे. असो.

        तिला एक तरूण भेटतो.त्याला ती विचारते.,कारण,तिथूनही बसलेले नीटस सांगत नाहीत.कुत्रे जसे भुंकणारे तसे ते येणा-या माणसावर नुसते तुटून पडत असतात. चौकशी कक्षात चौकशी नको रे बाबा..!!

"ही गाडी फलटणाला जाते आहे.अस तो सांगतो.हायसं वाटतं.बस स्थानकावर फक्त तुम्हाला हायसे वाटू शकते. या गुड फिलींग  तिथे काय असू शकते?ती गाडी शिरते. बसते. पहाटेचा वेळ आहे.बस रिकामी आहे येतील पॅसेंजर अशी ती वाट पहात बसते.

आपल्यासोबत पुढील काही  मिनिटांत काय घडणार  आहे हे तिला माहित नाही. तसं ते कुणालाचं कळत नाही.

तिला तरी कसं कळणार? नंतर तो आला.तो लांडगा होता.,तिचे लचके तोडू लागला. एखाद्या स्त्रीसोबत या पेक्षा भयंकर काय घडू शकते.तेच घडले.तिचं सर्वस्व लुटलं.तिला न ओरडता आलं ना बोलता आलं.आपली इज्जत लुटली हे सहज पुढे  येऊन कोण सांगते? स्त्री असेल किंवा तिचं कुटुंबातील लोक असतील? हे इज्जतीला फार घाबरतात. अश्या हजारो कळ्यांचे टाहो  हुंदक्यातच विरतात.  पुन्हा  जीवे मारण्याचा दम. ती भितीने थरथरतं बाहेर येते.

ती गाडीतून उतरते.तो नराधम निघून जातो. त्यानं डाव जिंकलेला. ताव मारलेला असतो. ती मस्ती काही औरचं असते.

 ती येते पोलिस स्नटेशनला.गुन्हा नोंद होतो.तो कोण माहित नाही.हल्ली पोलिसांवर विश्वास नाही. तिनं गुन्हा  नोंदवण्याचा धाडस तरी केले.तिला हे पण माहित नव्हतं की तो कोण आहे? तो कोण असू शकेल? तो भयंकर क्रूर माणूस होता.तो हैवानचं होता.  हे तर तिनं अनुभवलचं होतं.त्याच्याशी पंगा घ्यावा लागला.तो मोठ्या लोकांच्या बॅनरवर झळकणारा जीव जंतू आहे.त्याला पळून जाण्यासाठी त्याला इथले बिलंदर पुढारी  मदत ही करू शकतात. हे तिला माहित नसतं.तिचा विश्वास  होता.इथल्या कायद्यावर पोलिसांवर, घटनेवर...!! ती गुन्हा नोंदते. गुन्हा नोंदवला की,

 सुरू झाल्या ब्रेकींग  न्यूज.न्यूजचं न्यूज..!!!बातम्या या एन्टरटेनमेंट साठी असतात का? नसतील ही..!! पण आमचा छान करमणूक  होते.बोथट झाल्यात जाणीवा आमच्या.एकच सुरू होते. सणसणाटी.

(सौजन:टी.व्ही 9 मराठी)

1000416099

वाजवा रे वाजवा...!!! बलात्कार  झाला आहे.मिडीयावर सध्या सारं असं सुरू आहे.पोलिसांनी त्याची ओळख पटवली.त्याच्या गावातूनच त्याला  उचलला.तपास सुरू झाला.बातम्यांचा धुमाकूळ सुरू झाला.

एवढं सारं घडते आहे.चला,त्याचं थोडं राजकारण  करू.खेळ सुरू झाला.

बलात्कार  करताना ती ओरडली का नाही? हा बलात्कार  कुणी पाहिला का नाही?  तिचं कपडे फाटले का नाहीत. बचावासाठी तिनं काहीचं प्रयत्न केला का नाही?

प्रश्नचं प्रश्न. !!!

हे सारं पुण्यात  घडते आहे. सारख्या बातम्या सुरू आहेत. पुणे पण बदनाम होऊ शकते ना? बीड सारखं? पुण्याच्या  नेत्यांना टेन्शन..!! त्या एसटीत जाऊनचं मिडीयाचे कॅमेरे धडकले.काय काय सापडलं त्या एसटीत? ओढणी..कंडम्स...साडया .अजून काय काय?स्वारगेट  सारख्या स्टेन्शनची तर पारचं नालास्ती केली. गपा ना यार..!!या शहरांना जिल्ह्य़ांना पण इज्जती कधी चिकटवल्या. कुणी चिकटवल्या त्या ?

प्रत्येक गोष्ट  घडली कीच  राजकारणी लोकांनी बोललं पाहिजे का?किती बोलतात हे लोक?कायदा,तपास काही असतो की नाही?

अरोपीचे वकील दावा करतात संबंध झाले पण सहमतीने.

आता खरं कुणाचा? तिचं का त्याचं?

बलात्कार झाला की, लफड होते ते..का पेड सेक्स?

एका पुढारनीने तर निकाल देऊन टाकला.

पैशाच्या व्यवहारातून सारं हे झालं.

होऊ दया तपास... लागू द्या निकाल... इतका दम कुणाला?

शनिवार, १ मार्च, २०२५

अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर





ती बस स्टॉपवर भेटली.ती सुंदर होती. मी बराचं वेळ पहात होतो. ती खूप चंचल होती. तिचं चालणं पहाणं मोहक होत. मला ती आकर्षित करून घेऊ शकली होती. माझीच नाही अनेकांच्या नजरा ही तिच्याकडेच रोखलेल्या होत्या.असा एखादा चेहरा असल्या अनोळखी गर्दीत असतोच असं माझं निरीक्षण आहे. हआपल्यावर इतक्या नजरा खिळल्या हे तिच्या लक्षात ही आलं असावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती. माझ्या मनात अनेक गाणी रूंजी घालू लागली होती. खरतर मी ती गाणी गुणगुणू ही लागलो होतो.माझं ही वय तसं फार नव्हतं.मी नववीत असेल? आणि ती? मला कुठं माहित होतं? ती माझ्या पेक्षा वयानं थोडी लहान असेल.पाठीवर सोडलेले मोकळे केस.पोपटी रंगाचा कुर्ता.. व्हाईट रंगाची टाऊजर.छानशी गुलाबी रंगाची ओढणी.पाठीवर सॅक बहुतेक तिचं ते दप्तर असावं.मला नक्की आज ही आठवतं.तिनं आपल्या ड्रेसला मॅच होईल असे टिकली लावलेली होती.तिचा रंग गोरा होता. तारुण्याच्या खूणा तिच्या अंगा खांदयावर स्पष्ट झाल्या होत्या. या सा-या रंग संगतीमुळे,ती कमालीची आकर्षक दिसतं होती.हाय..हाय..अंधारात!! मर जाऊ..!!!अश्या विशिष्ट वयात साधारण सर्वच मुली सुंदर दिसतात. तारुण्याची झाक सौंदर्य अधिक खुलवत असेल का? मी तिच्याकडे टक लावून पहात होतो. तिचं लक्ष नव्हतं.तिच्या मी खिडकीतील ही नसेल ! माझं असं मोहित होऊन पहाणं माझ्या शेजारच्या एका काकूच्या लक्षात आलं होतं.खरतर ती तिची कुणीचं नव्हती. त्याचं माझ्याकडे राग राग पाहू लागल्या. मी दूर गेलो. मला माझ्या विलोभनीय क्षण असे हातचे निसटून नव्हते द्यायचे.मी तिचं ते अप्रतिम सौंदर्य माझ्या डोळ्यातून खोल अंतरंगात साठवून ठेवत होतो. तो क्षण आला. तिच्या नजरेला माझी नजर भिडली. मनात लख्खं चांदण सांडून गेले. ती लाजली वरमली.लाजेचे रंगात तिचा चेहरा ओथंबून गेला. जगात सा-यात सुंदर काय असेल बरं?
1000413304


 सखीचं लाजरं हासणं...!!! मी कुठल्याश्या धुंदीत शिरलो.मला वेडच लागलं होतं. तिच्या नजरेला नजर भिडून घ्यायचं.मी माझे केस ठीक आहेत ना हे पाहिले.शर्ट ही ठीक ठाक केले. ती नुसती मला आवडून उपयोग काय होता? मी ही तिला आवडणं आवश्यक होतं. ती माझ्यासाठी खूप काही होती. नजरा नजर सुरूच राहिली. ती ही मुरक्या मुरक्या हसू लागली. मला तर भानच नव्हतं. राहिलं.मी तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो.मला तिचं नाव विचारायचं होतं. इतक्या सुंदर मुलीचं काय नाव असू शकेल बरं? मी तिच्या नावाचा अंदाज बांधत होतो. तिला मला पत्ता ही विचारायचा होता.पण अनर्थ झाला एक गाडी आली.गर्दीचा लोट त्या गाडीकडे धावला.ती ही गर्दीचा भाग झाली.मी तिला शोधत होतो.मन माझं सैरभैर झालं होतं. ती कुठे गेली? मी व्याकूळ होऊन तिला पहात होतो. ती कुठेच दिसतं नव्हती. मी त्या बसच्या मागे घिरट्या घालत होतो. काय,आश्चर्य ती बसच्या एका खिडकीतून माझ्याकडे पहात होती.मी वरमून गेलो पुन्हा एकदा तिच्या नजरेत नजर खुपसली. ती गोड हासली आणि कपाळावर मारून घेतली. नुसतीच हासत राहिली.मी तिला हात करत बस कडे झेपावलो. बस आली. ती बाय करत होती. मी तिला फ्लाईंग किस केला. तिनं ही केला. पत्ता लिहून टाक असा इशारा केला. तिनं एक कागद खाली फेकला. बस भूर्र निघून गेली. मी वेड्यासारखं अजून ही तो कागद शोधतो आहे. वीस वर्ष झालेत त्या घटनेला. मी जामखेड बस स्थानकावर गेल्यावर ती भेटेल असं वाटतं. ती कशी दिसत असेल आता? प्रेम जर देवाची देणगी असेल तर ती मला नक्की भेटेल ना..? माणसाला एक आयुष्य थोडच  असतं? सात जन्मा तरी ती मला नक्की भेटेल? वाटं तर पहातो आहे.

 

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज अलकानंदा घुगे - आंधळे यां चा ' अर्धा कोयता ' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथ...

1000470524