बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

होय ,राजकारण एक धंदा आहे.


 होय,राजकारण एक धंदा आहे.

राजकारण हा एक लोकप्रिय धंदा आहे. राजकरणाला धंदा मानायला कुणी तयार नाही.अलीकड सरार्स राजकरणाला एक धंदा म्हणूनच पाहिलं जातं.कार्यकर्ते,नेते धंदा म्हणूनच राजकारण करतात.नव्या पिढीला ही राजकरणात एक चांगल करिअर म्हणूनचं खेचतात पण धंदा आहे हे मान्य करत नाहीत. वेश्येच्या धंदयासारखचं आहे हे. सा-यांना ज्ञात असून ही वाच्यता करता येत नाही.तसं सर्वांना माहित असते यांचा मुख्य धंदा राजकारणच आहे. 

        अड्डयावर बसणारी बाईला सारे जाणतात की ती धंदा करते पण वेश्या म्हणून तिला तरी कुठं ओळख हवी असते. चारचौघीत तिला ही कुणी धंदयावाली म्हणून ओळखलेलं आवडणारं नसतं तसचं हे राजकारणाचं पण.राजकारण करणारी माणसं जनसेवा करतात.त्यांना विकास करायचा असतो असे ते सारखे बोलत राहतात.विकासाचा महामेरू,मतदार संघाचे भाग्यविधाते,लोकनायक,लोकनेते विकासाची गंगा आणणारे अवतारी पुरूष अशी अनेक विशेषण आपल्या नावा भोवती चिकटवून ते राजकारण करतचं असतात.

                      मते  मागतानी पण ते सेवेची संधी दया.आपलं मत विकासाला,मी  एक चौकीदार,मी  जनसेवेचा कंत्राटदार.अशी विधान करतात.राजकारण हा फक्त जनसेवा करण्याचा मार्ग नाही.संघर्ष करून मोठया पदावर पोहचला  की त्याचं करीअर राजकरणातच होतं. अनेक सिलेब्रेटी ही पैसा,सन्मान प्रसिध्दी असून ही राजकरणात करिअर करतात.समाजसेवक, साहित्यिक,वकील,निवृत्त अधिकारी,निवृत्त न्यायाधिश  ही राजकरणात येण्याची संधी शोधत असतात. संधी मिळताचं त्या संधीचं सोनं करणारी ही अनेक जण असतात. धंदा, करिअर समजून अनेक जण राजकरणात येतात पण जनसेवेचं बेगडं ते राजकरणाभोवती लपेटून घेतात.जनसेवेसाठी  जीवाचा फार आटापीटा ही करतात. जनसेवेसाठीच लोक एका पक्षातून दुस-या पक्षात बेडूक उडया मारतात.आपल्या शिवाय कुणीच जनसेवा करू शकत नाही अश्या भावना तयार झालेल्या असतात. खाजगीत राजकरण्यांना विचारा ते सांगतिल 20  टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण आम्ही करतोत.अनेक मोठे राजकारणी स्वतःच्या नावासमोर समाजसेवक अशी विशेषण चिकटवून घेतात.आपण गृहीत धरू 80 टक्के समाजकारण करतात हे लोक मग 20  टक्के राजकारण करतात म्हणजे हे लोक नेमकं काय करत असतील?

                राजकरणातल्या लोकांच्या संपत्तीमध्ये जलद गतीने वाढ होते त्याचं रहस्य काय?समाजसेवेतून तर हे  पैसे नाही भेटू शकत.मग हा पैसा येतो कुठून? असं राजकरण्यांना  विचारणं फार रिस्की आहे.विरोधी पक्षात राहून ही जनसेवा अथवा राजकारण करणं शक्य असतं पण सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षासोबत असले तर जनसेवेच्या अनेक संधी प्राप्त होतात. त्यामुळे अनेकदा पक्षांतर होतात.गद्दा-या होतात. गद्दारीची कारण विकासासाठी अशीचं देतात.

         राजकरण्याकडे पैसा कसा येतो? याचे मार्ग अनेकांना माहित असतात.टेंडर्स,क॓पन्या,हप्ते,गुत्ते, टक्के असे अनेक मार्ग असतात.आपण सहजा यावर चर्चा पण करत नाहीत.प्रश्न तर कुणालाच विचारत नाहीत.आमच्या एक जवळच्या नातेवाईकांन ठरवून एक मुलगा राजकरणात घुसवला आहे म्हणजे त्यांनी राजकरणात ढकला आहे.त्यांना एकदा मी सहज विचारलं,"रवि ,झाला डाॅक्टर पण बंटी काय करतोय?"

"टाकला राजकरणात.त्याला नाद."

"राजकरणात? शाळेत हुशार होता."

"पुढं शिकला नाय.मोकार झाला जरा.मग घेतला निणर्य."

"राजकरण्याचा पिंडच असतो.जमेलं त्याला?"

"दहा लाख दिलं त्याला भांडवलं.उडू दया.इन्व्हसमेन्ट केल्याशिवाय काय पर्याय?राजकारणं सोप नाही.लयं पैसा ओतावा लागतो.चाप्टरं तेव्ह.टाईट फिल्डींग केली त्यांनी.नाद केला पण वाया नाही जायचा.फिक्स नगरसेवक बघा तो यावेळी."

"कोणत्या पक्षाकडून?"

"पक्षाचं काय घेऊन बसलाय? मागं लागलेत.सभापतीला टक्कर दयाची त्याला...जे पक्ष टिकीट देईन त्याच्यात जायचं.त्यानं त्याचं वजन तयार केल.माग लागलेत त्याच्या..."

"नगरसेवक झाल तरी दहा लाख..."

"नगरसेवक झाल्यावर पैश्याला लयं वाटा असत्यात.दोनचं महिन्यात...कमवील तेव्हं."

काकाच्या बोलण्यात काॅन्फीडन्स होता.


होय,राजकारण एक धंदाच. 

शिंदेसरकारमधील मंत्री शुंभू देसाई हे सत्य बोलून गेले.अर्थात ते अनवधाने बोलले.राजकरण्याच्या धंदयात मी नवीन नाही. खर त्यांच .जे पोटात तेच ओठात आले.याचा अर्थ असा नाही ज्याच्या ओठावर आलं नाही त्यांच्या पोटात ते नाही.मान्य नाही केलं तरी राजकारण एक धंदाच आहे.पक्त एक नंबर की दोन नंबर ते ठरवावं लागेल आपल्याला.एवढचं....!!!

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

आली वयात ही लोकशाही

-


आपण लोकशाही स्वीकारलेली सात दशक उलटून गेली आहेत.भारतीय लोकशाही जगात एक नंबर आहे असं म्हणतात.एक नंबर म्हणजे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाची लोकशाही. तिला सात दशक होऊन गेली तरी प्रगल्भता आलेली नाही म्हणजे ती अजून परिपूर्ण झालेली नाही. देशात निरक्षरतेचं प्रमाण अधिक होतं. निरक्षरता ही भारतीय लोकशाहीला लागलेला  शाप समजतं असत.साक्षर जनता भूषण भारता असा कार्यक्रम आपण राबवला. निरक्षरता कमी झाली याचा अर्थ सुजाण नागरिक आपण घडू शकलो असं नाही. सुजाणतेपण अजून ही कोसो दूरच आहे.                     शिक्षणाचा प्रमाण वाढलं. साक्षरता वाढली पण लोकशाही शिक्षण अपूरेचं राहिले. आपलं मत अमूल्यं आहे हे लोकांना फारस कळतं नाही.बरेचं लोक मतदान करतं नाहीतं. जे करतात ते कुणाच्या प्रभावाखाली मतदान करतात. आमिषाला बळी पडतात.संसदीय लोकशाही पध्दतीत व्यक्तीला महत्व नाही.पक्षाला महत्व आहे.आपल्या देशाची लोकशाही ही बहूपक्षीय लोकशाही आहे.या देशात असंख्य पक्ष निर्माण करू शकलोत आपण.अजून ही होताहेत. पक्ष निर्माण करणे  ही आपली फक्त गरजचं  नव्हती तर ती एक संधी होती .ती घटनेने दिलेल्या संधीचं सोन करायचं म्हणून अनेक लोक आपले विचार  घेऊन पक्ष निर्माण करू लागले. आपल्या विचारांचा देश बनवावा.आपल्याचं कंपूतले लोक सत्तेत यावेत म्हणूव झगडू लागले. वासतविक देश चालवण्यासाठी कुठल्या  विचाराची गरज मुळीच लागतं  नाही.त्यासाठी आवश्यक असते मानवीमूल्य...समनता...लोकशाही मुल्यावरील अढळ निष्ठा..राष्ट्र उभारणीचं भक्कम स्वप्नं. विकासाचा सर्व समावेशक विशाल दृष्टीकोन.देशाच्या अखंडतेचा व  समतेचा स्वीकार.असं काही घडलं नाही विचारांना प्राधान्य आलं.आपआपली  विचार या मातीत पेरायचं प्रयत्न सुरूवाती पासूनचं झाले.त्यासाठी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाले.होत राहिले.होत राहतील.

          राजकारण हे एक करिअर झालं. व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार कामगार शेतकरी मजूर बेरोजगार . तुश्टीकरण ही गंबीर समस्या बनली. सरकारने आम्हाला तुष्ट करावा ही भावना वाढली. मतासाठी फसव्या अभाषी अश्वसनांची  खैरात सुरू झाली. सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे तर होणारचं होतं.

             विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं. व्यक्तीस्तोम माजलं. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या.राजकरणात असचं असतं.ग फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.अभिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माढसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं. लाॅबिंग सुरू झालं. आपला तो बाब्या....

    चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन व घटनातमक दर्जा व नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जाऊ लागली.त्यासाठी  आपल्या हाती असलेल्या आनेक यंत्रणाचा वापर होण साहजिकचं आहे. तो होणारचं. परिस्थितीचीच ती देणं आहे. त्यातून अंधभक्ताची फलटणं तयार केली जाते. अंध भक्त आपला विवेक गमावून बसलेले असतात. खरं-खोटं ठरवण्यापेक्षा  ते आपल्या  माणसाच्या प्रत्येक कृतीच समर्थनच नाहीतर उदात्तीकरण करून त्याला एखादया सुंदर विचारसरणीचं झालर लावत सुटतात. स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं आवडू लागतात. त्यांच्या अस्मितेवर बोट लावून राजकीय मंडळी त्यांना गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुदल्यातून  लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.

भारतीय लोकशाहीचा प्रवास घटनेच्या गाभाभूत घटकापासून सुरू झाला असलातरी तो वैचारीक भेद, समुहभेद मार्गे लोकांच्या टोळया तयार करण्यात आल्या.नंतर  ते सूडा पर्यंत पोहचला आहे.आता लोकशाही म्हणजे एक सुडाचा प्रवास सुडाग्नीत हे सत्तातूर जंतू जळून जातील.या भारताची लोकशाही वयात येईल.परिपक्व होईल.लोकशाही हुकूमशाहीच्या घश्यात जाण्याची अजिबातच शक्यता नाही असे नाही.ती गिळण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ते गिळू शकणार नाहीत. एवढचं या लोकशाहीला काही बलिदान हवे असतील...काही माणसाचं रक्त सांडावे लागेल.इतकचं.तो तर आपला इतिहास आहे.

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

पोळा

 पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या   पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.

                  हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात.

अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी ही 

दादा, आज पोळयाचा क्षण. मी आता कॉलेज वरून आलोय. आयीचं लयीचं फोन आलं होतं.पोळयाचं सणाला गावाकडं ये. गावाकडं ये.

पोळयाच्या सणाला गावाकडं येन काय करू? बैल जित्राब नाही दावणीला आता.दावणं सारी सुनी सुनीच आहे. नाहीत.एक ही

दादा,खरं सांगू का? पोळयाला येऊच नाही वाटत मला गावाकडं. पोळा आठवला की तुझ्या आठवणी नुसत्या झोंबत राहत्यात अंग भर आग्या मोहळाच्या माश्या सारख्या.आता तू जाऊन पाच सहा वर्ष झाल असतील.तो पोळा नि तू.ते बैलंराज्या नि पवळया नुसत आठवत राहतात.

            त्या साली मी नववीला होतो.त्या वर्षी ही आखडी पडली होती.आखडीच्या नंतर श्रावण चांगला बरसाला.झिम झम पाऊस सारखा चालूच राहीला.चांगला मूर पाऊस झाला होता.शेत ही तररारून आली होती.सारीकडं हिरवळ माजली होती.हिरव्या पोपटी रंगानं रान नं रान,शिवार नं शिवार रंगून गेलं होतं.श्रावण्याच्या सरी ही अधून मधून  बरसतचं होत्या.खांदमळणीचा दिवस म्हणून गुरूजीनं दुपारूनच सुटटी दिली होती.रानात बैल चांगल्या शेलक्या बांधावर चारून चारून तू टम करून दिली होती.बैल जोगली होती. न्हं-पावसाचा खेळ चालूच होता.अधून मधून  कोल्हयाचं भी लगीन लागतचं होतं. तशाचत तू बैलाची कासर माझ्या हाती दिली.

         शेजारच्या नालाबंडीत म्या लयं बैल पोहीली.आंगाची साबण लावून बैल धुतली.चांगल्या बांधाला चारले. दुपारपासून मीच बैल ताब्यात घेतली होती.बैलाचं खांदमळणीचा दिवस म्हंजी बैलाचा हळदची दिवस.पोळा म्हंजी बैलाचं लगीनचं असत ना?तशीचं तयारी घरात चाललेली.बैलाचं खांद मळून घेतलं होतं.तॅल पाणी केल.हिरवं हिरवं गवात टाकलं.आपल्या खिळयाच्या टीतून लुसलुशीत शिप्पी आणली होती.रातच आठ साडे आठ झाले असतील.तसल्या अंधारात शिंदया सावकाराचा शिव्या नि विक्राम्या आलं.वटयावर टेकलं सुध्दा नाहीत.उभ्यानचं तुला पैसं मागया लागलं,“सांग पैसं कवा देतो?” शिव्या डाफरला.ते पावरातचं आला होता तेवळं असाचं कुठं भी पाऊर दावीतचं असतो.

देतो की.आता माल टालं झाला की.” एकदम लव्हाळया वाणी वाकून तू म्हणलास.ते एकदमच ताठ होतं माडागत.

शहाण्या, उग बाता कमून हाणतो रं? कशाचा माल न टालं रं तुला? पावसानं असं हात आखडीलाय व्हता. आखडी पउल्यामुळे सा-या धानाचं कॉळ झालं.तुहयचं बरं पीक आलय.”

आखडीत तर पडलीचं होती.ती मला कशी सोडीनं पण थोडं फार माल हुईलचं की.काळीमायचं वटी भरिली ती वांझ नाही जायची.काहीना काही पसा खोंगा पदरात टाकीणचं ना?”

तुझ्या आसल्या मालाटालावर आमचं पैसं फिटत नसतेत.कुठं दात टोकरून प्वाटं भरतं असतयं का?दुसरं काही तरी कर.पण पैस दे आजची आज.” शिव्या डाफरतचं बोलला.

दुसरं काय करू?म्या आसला फाटका माणूस दुसरं काय माझ्याजवळ?मोलमजुरीचं तर ते खायलाचं पुरतं नाय.”

आर,मग कमी खात जा ना.”शिव्यानं  मोठया आवाजातचं सल्ला दिला.त्याच्या तसल्या बोलण्यानं काळजाला पार डोबरं पडलं होतं.आय नि मी तर नुसतं गप गप झालोत.

शिवा तात्या कसं खातोत कसं राहतोत आमचं आम्हला माहीत.त्याचं ग-हाण तुमास् सांगून काय उपेग? तुमचं देणं हाय. म्या काय नाय म्हणतोय का?”

नाय म्हणतं नाहीस पण देत भी नाय.आर, नाम्या तुचं सांग कव्हरं थांबायचं?”

करा ॲडजेस्ट ,सिवाभैय्या.हातावरलं प्वाटं.‍पोरगं शिकतं.तिचं माग दुखलं.लयचं ज्यारं झालोय बघा.तुम्हला ठावं नाय व्हयं?”

ठाव हाय मला सारं.मग काय करू आम्ही?दयावात का सोडून?”

थोडा टायेम दया.पै ना पै देईल बघा.”

ऐ तुझं तुणतुण नेहमीचं वाजू नको.ते ऐकायला इथं नाय आलो.तुझं हे कवा भी चालूचं असतं.बैल दिसतेत की.टाकायचं फुकून व्हायचं मोकळं.”

बैल फुकून जमत्यात व्हयं?त्यांच्या जीवा वरचं चाललयं सारं.”

सारं तुझचं कसं ऐकायचं? बैल घेतोत लावूनदुसरं हाय काय तुझ्याजवळ?”

’शिव्‍या भैय्या,तसं नका करू.बैल गेल्यावर.हातचं मोडणं बघा माझं.”तू गयावया करत होतास.त्यांना काय त्याचं? ते इचार करतेत व्हयं?

विक्राम्या सोड बैल.जाऊ दे याला मराठी कळतचं नाय.कव्हरं हयाचं रडगाण ऐकायचं?”

असं नका करू.म्या काय पैसं बुडीतोय काय?आतापुतोरं कुणाच्या नरकात नाय गेलो कवा.”

हे बघ.आमचं पैसं कुणीचं नसतं बुडीत.तुचं काय?शिंदया सावकराची पैसं बुडवीणारा जल्‍माचा  अजून. एखादा मेला तरी थडग्याकडून आम्ही पैसं वसूलचं करीत असतो. पैसं आणून दी तुपलं बैल घेऊन ये.” विक्रम्या लगेच पुढं सरकला.खात्या दावणीचं बैलं सोडलं.तुझ्या देखतं.तू पुढा सरकला त्यांना गयावया करू लागला.शिव्या कुठं ऐकत असतो व्हयं?लगेचं शिव्या आडवा आला.

इंथचं थांबायचं.उग गाव जागा करायचा नाय.पैंस आणायचं नि बैल घेन यायचं.उग नाटक केलं तर फोडून काढीत असतो.माहित ना तुला?”शिव्या नुसता दम देत होता.

बैल का न्यानात पण उदयाचा एवढा पोळयाचा सण हुदया.पैसं देयील नाहीतर महया हातानं बैल तुमच्या दावणीला बांधीनं.एवढा इश्वास ठेवा.खांदं मळीलेत.असं सणासुदीचा नका दावणं सुनी करू.”तू ज्यारं झाला तरी त्यांनी बैल सोडलचं.

विक्राम्या थोबाड वर करून काय थांबलास. तेव्हं असंचं इव्ळत असतो.ओढेव बैल.”चरकात ऊस घालावा व पीळवटून रस काढवा.तसं तुझं झालं होतं.काळजाचा पार चौथा झाल्यागत उभा होतास.

अहो,शिवाभैय्या,तॅल पाणी केल्यालं बैलाला.का असं करू.उदया सण झाला की आणून बांधतोत दावणीला.”

लय देणारी होती तर मून दिल्लं नाहीस आतापर्यंत.उदया काय जादू करणारसे.का लॉटरी लागणारे काय?महीन्याचा वायदा केला होता.नाय तर मागच्या महीन्यातचं ओढले असते बैल म्या.”

महया पोरा शपथ सण झाला की बैल तुमच्या दावणीला बांधतोत आणून.”आई विनवणी करत होती. पदर पसरीत होती.शिव्याचं काळीज लयचं निबार.त्याला पाणी फुटतयं व्हयं?

पोरांच्या शपथा कशाला खाती?आपल्याकडं पैसंच हायेत त्यांच.तसं कसं कुणाच्या जित्राबांच्या कास-याला हात लावतेल.”आईला मागचं ओढलं. आईल माग ओढलं होतं तुम्ही पण तुमचं शब्द जड झालं होतं.सोताच्या जीवापेक्षा जास्‍त जीव होता तुमचा आपल्या बैलावर.

                विक्राम्यानं बैल सोडलं.तेव्हं गोटयातून बैल बाहेर काढयला लागला.मला राहवलचं नाही.मी पळतचं गेलो नी पवळयाच्या गळयात मिठी मारली.विक्राम्यानं  हातानी ढकलील पण मी मिठी सोडीणारचं नव्हतो.

नाय नेदेणार मी बैलं..नाय नेऊ देणार..”एकचं घायटा घेतला.बैलाच्या पुढच उभा राहिलो.शिव्यानं भी  मला ढकलनू पाहिलं.मी बैल सोडीतचं नव्हतो.

आर, पोराला दापेव.हयो काय तमाश्या उभा केलाय.”

अहो तात्यात्याचा लयं जीव बैलावर. आठदिवसापासून.. त्यानं फुगंन ते आणून  ठेवलेत.दया त्याला बैल रंगाचेत.लय नाद बघा त्याला.एवढा सण होऊस्तोवर ठेवा.”

बैलाची लयचं पोराला हौसं तर पैसं..फेकून दयावेत थोबाडावर.. बसावं लाड करीत पोरांच.”

आकाश्या, सोडं बैलं त्यांच.” तू डाफरलास.मी रगेलवाणी तसाचं आडा उभा.

त्यांचे नाहीत बैल.आपली बैलेत. म्या नाय जाऊ देणार.”

आर, बायको नि पोराला पुढं करून तू बरी मज्जा घेतोस.चांगली आयडीया गया तुझी.”शिव्यानं असं तुला हिणीलं की  तुझं मशीन गरम झालेलंच होतं.दादा, तू मला हिंजाडलस तरी म्या बैल नाही सोडलं.

काय पोरग बुवा?बापाचं पण ऐकत नाही.” तुझा रागाचा पारा वाढत गेला.तू सणासणा माझ्या थोबाडीत हाणल्या.आयी धरायाला गेली तर तिला भी तू ढकलनू दिलं.फरा फरा मला ओढलं.

जावा.. घेउन..” तू अजून ही दात ओठ खातच होता.मी थरथरं कापतं आईच्या  पदरात शिरलो. आपल्या सा-याच्या समोर ते बैल घेउन गेले.तू राग रागचं घरात गेलास चंगाळी.गोंड,फुगं रेबनं सारा वाराचा सराजम तू एक एक पराळात मांडला.आम्ही सारं बघत होतो.आता तू हे काय करतोस?

आता काय करता?” तुमचं हात धरतं आई म्हणाली.

देतो काडी लावून.टाकू फुकून.मालकचं गेल याचं.पोळयाच्या सणाला दावणीला जितरांब नाही.कशाचं कुणबाटतं आपून.हे सारं कश्याला ठेवायच?”

असं येडयावाणी करीत असतेत काय?” तुझ्या हातातली काडी घेत आई म्हणाली. चंगाळी, गोंडं ,घुंगरं सारं फेकायाला लागलास.भिताडावर हाणायाला लागलास.रागानं इतका लालबुंद झाला होतास.धाप लागली होती.

हयो सराजम नक्कू ठेवू डोळया पुढं.नुसतं आतडं तुटतेत तटातटा.”


आय तशीचं थिजून गेली.तिनं तुला काडयाच पेटी नाही दिली.अंगणातला सारा सराजम गोळा केला. डोळया देखत बैलं नेलं.तुझ्या काळजाला ढोबरं पडलं होतं.तू जेवला नाहीस.कुणीचं जेवलं नाही.सुतकं पडल्या सारखं सारं गपगप झाले.


                        सकाळी सकाळी तू आणि  भऊ बैल घेऊन आलात.आंनदाला पारावर राहिला नाही माझ्या.मोठया थाटात आपण पोळा साजरा केला.तो आपला शेवटचा पोळा साजरा झाला. उचलं घेतलीस.बेलापूराला गेलास.पोळा साजरा करण्यासाठी तू तुझं अख्ख आयुष्याचं काटयावर घातलं होतंस.कर्जाचा डोंगर वाढत गेला नि एक दिवस हे जग.. सोडून गेलास.ईला मला सोडून गेलास.हे जग इतकं दुष्ट आहे तरी तू आम्हला तसाच या जगात का ठेन गेलास,दादा

आता मी राकाटीच्या रानात उभा.ते आंब्यांच झाङ माझ्या डोळयासमोर.आयघलं वठलं आता.ज्याला तू  लटकून तुझं आयुष्या संपवून टाकलं. भऊ नि रम्यानं ते बैल चारतेत रानात.पोळयाचाच दिवस ना आज भीमला काहीच पाहू नाही वाटत आता. नुसती तुझी आठवण येते रे.वाटतयं तू.. बैल घेन येशील.म्हणशील  पोहवं बरं बैल..आकाश्या….

                           

तसं होणार नाही.तू कसला परत येतोस आता.आसल्या दुनियेत येऊ भी नक्कूस.दादा तुज्या शपथ सांगतो मी पोळयाचा सणचं कधीचं साजरा करणार नाही.ज्या सणानं माझा दादा माझ्या पासून हिरावून नेला तेव्हं सण मी साजरा नाही करणार.. नाही करणार

कुण्बटयाचा शिक्का मला पुसून टाकायचा.. पुसून टाकायचा.

  


सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...