रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

पुरस्काराचे खारमुरे

कथा अाणि व्यथा
---------------------

पुरस्काराचे खारमुरे

*************
आज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात आमचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.तेआवाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं आपल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात मी गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." 
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." 
"आज काही विशेष?"
"विशेषच आहे.पेपर नाही वाचले का आज? " 
"नाय बुवा." 
"व्हाॅट्स अप तरी पाहीलं का?" 
"नाय बुवा."
"फेसबुक तरी." 
"नाय बुवा.टायमच नाय भेटला."
"मग कसं कळेल."
"असं काय झालं की ते मला कळलचं पायजे" 
"झालं काहीच नाही.पुरस्कार भेटलाय ." 
"आता कसला भेटलाय?" 
"समाजभुषण...?" 
"कुणाला?" 
 "मलाच .दुसरं कुणाला? हा साधा नाही.राज्यस्तरीय पुरस्कार." "राज्यस्तरीय! " मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढां महान माणूस अपल्या जवळ असताना आपल्याला त्याचं हे कर्तृत्त्व माहित ही नाही. त्याचा एवढा आनंद बघून मलाच गलबलून आलं.आता एवढी मोठी बातमी तो सांगतोय आणि मी गप कसा राहू शकत होतो.मला त्याचं अभिनंदन करण्याची अतिव इच्छा झाली,"वा. !!काॅंगरेच्युलेशन मित्रा,मला तुझा सार्थ अभिमान आहे." असं एक नेहमीच गुळगुळीत वाक्य मी फेकून दिलं आणि त्याला कडकडून मिठ्ठी मारली.चेह-यावर फारच आनंद झाला असल्याचे भाव आणले. माझा असा जबरदस्त शो चालू असतानाच तो वरमला.इतका इमोशनल वगैरे मी होईल असं त्याला अंदाज नसावा बहुतेक. तो जरा संकोचत म्हणाला,"तसं नाही काही एवढं.भेटलाय आपला."
"असं कसं? मित्रा तू समाजभुषण ..!तू आमच्या शेजारी राहतोस. तुझ्या कार्याची दखल राज्यस्तरावरून घेतली गेली हे कमी नाही.आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझा."
 "चल,घरी. चहा तर घेऊ." कमालीचा आनंद ही माणसाला शब्द सुचू देत नसेल. तो गप होता नि मला तोंड सुटलं होतं.आम्ही दोघ त्यांच्या घरी गेलोत.त्यांची स्तुती करावी म्हणून मला काहीतरी गौरव पर बोलणं क्रमप्राप्तच होतं.उग गप कसं बसावं? "मित्रा,तू इतकं मोठ काम करतोस आणि कधी सांगितलं नाहीस."
 "आता त्यात काय सांगण्यासारखं."
 "सांगाया पायजे.तसं कसं माहित होईल."त्यानं पेपर पुढे टाकले.मी ते अधाशापणे वाचत राहिलो. त्यांच्या समाजाच्या संघटनेचा हा पुरस्कार होता.(ही कथा काल्पनिक नसल्यामुळे समाजाचा उल्लेख व संघटनेचं नाव मुद्दाम टाकलेले नाही.हल्ली सा-याच समाजाच्या भावना अतिशय नाजूक झाल्या असल्यामुळे त्या नुसत्या दु:खूच नाहीतर त्या तुटू पण शकतात. त्यामुळे सर्व समाज भावनाची कदर करून नामोल्लेख टाळलेले आहेत.) बातमी वाचल्यामुळे बरचसं मला कळालं होते. "ग्रेट यार. ..या गल्लीला तुझा गर्व पाहिजे "
 'ग्रेट ... 'वगैर माझे शब्द त्याला झेपत नव्हते.तो गुदमरल्यासारखा करायचा.स्तुती माणसाला अंहकाराचे पंख देते.त्यानं हुरळून जाणं अपेक्षित होत पण तस न होता.त्याला ती स्तुती झेपत नव्हती.अशात आपण कुणाची ही स्तुती करण्यात कसूर करत नाही. बोलाचाच भात बोलाचीच कढी. त्यात कशाला कसूर?
 "मी कसला ग्रेट?"
"मग कोण ग्रेट?"
 "ते आमचं पाव्हणं.मेव्हणं.हिचा भाव खरा ग्रेट माणूस.तुला म्हणून सांगतो. लय्यीच पाऊर गडयाचा "
 "त्यांचा पाऊर....? पुरस्कार तुम्हाला कसा?"
"ते बाॅडीवर आहेत संघटनेच्या.धरली बाजू लावून.तेव्हं निल्या पायतोंडयांचा लय टचून होता. त्याची नाय डाळ शिजली. पाहुण्यांनी लय टाइट फिल्डिंग लावली होती."
"पुरस्कारसाठी ही टाइट फिल्डीग? मला नाय समजलं?" "असं.कस...?लय्य टसली लागत्यात.नुसत्या या पुरस्कारासाठी शंभरच्यावरअर्ज होते. त्यात एकच पुरस्कार दयायचा.स्पर्धा तर राहणारचं"
"काय ?तुमच्या समाजात इतकी माणसं चांगली आहेत ." माझं तिरकस बोलणं त्याच्या लक्षात नाही आलं.
"हे एका पुरस्कराचं झालं.असे दहा पुरस्कार दिले जाणार आहेत.शिक्षणरत्न,साहित्यरत्न,जीवनगौरव...वैगरे" 
"असे प्रत्येक समाजातून असंख्य पुरस्कार दिले जातात. या वरून जगात प्रचंड संख्येने चांगली माणसं राहतात हे सिध्दच होत की.उगच सज्जनाचा तुटवडा असे बोंबलत असतो आपण."
"असं निगेटीव्ह नका घेऊ."
"यात काय निगेटिव्ह ?उलट मी फार पा‌ॅझिटीव्ह बोलतोय."
"पण सरकारी पुरस्कराला मर्यादारेषा असतात.त्यात वशिलेबाजी आली.अधिका-याच्या व पुढा-यांचे चमचे आले.त्यांचे लाॅबिंग आलं. तेच ते पुरस्कर बळकावतात.चांगली माणसं उपेक्षित राहतात."
"असं कसं? सरकारी पुरस्काराचे निकष असतात. त्यांची एक निवड प्रक्रिया असते. एक खास पारदर्शक पध्दत असते."
 "असते ना? सारे म‌ॅनेज होतात.सारे फिक्सींग असते.नुसते शो असतात.तेवढेच नाही राजकारण असते. कमालीचा जातीवाद असतो त्यात. "
"हे फार गंभीर अरोप झाले. "तो फार डेरींगने बोलत होता.
"एका शाळेत सा-यांच शिक्षकाना अादर्श पुरस्कार आहेत.या वर्षी ती शाळा बंद होते आहे."
"का?"
 "सारे पोरं इंग्रजी शाळेत. "
"असं कसं ? तसचं हे? पुरस्कार प्राप्त शिक्षक सारे फिरतेत....ना शाळाकडे लक्ष ना पोरांकडं.पालकांना  क्वालटी एज्युकेशन पायजे. मग पालक कशाला कुणाचं ऐकतेन?"
"आता लयचं झालं बुवा? "
"जातीवाद असतो.याचे पुरावेतआपल्याकडं .सलग दहा वर्ष झालं एकाच जातीत आदर्श पुरस्कारेत दिले जातेत.कसं शक्य? चांगुलपणा काय जातीवर अवलंबून असतो काय?"
 "असं कसं? हे नाही पटत बुवा."
"पटो न पटो .त्यात राजकारण असत. त्यात पुन्हा जातीवाद आलाच.काही लोकांची दखल घेतलीच जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो.त्यामुळे आमच्या संघटनेने हे काम सुरू केले आहे." ?
"छान उपक्रम....चांग्ल्या माणसाच्या पाठीवर थाप हवी पण इतर जातीच्या चांगल्या पण उपेक्षित लोकांना पुरस्कार देते का तुमची संघटना."
"नाय?आमची काय सेवा संस्था नाही.ही जाती साठी काम करते. सेवा संस्थाचे असतात धंदे पुरस्कार देण्याचे ."
 "आता कसले आले धंदे यात. उलट ते पदर सन्मान करतात लोकांचा."
 "विकतात पुरस्कर साले ते. भडवे."लांडग्याची मशिन गरम झाली होती.अनेकदा अर्ज आणि प्रयत्न करून ही त्याला पुरस्कार मिळत नव्हता.या त्याच्या खाजगी प्रश्नावर त्यांन उत्तर शोधले होते.मेव्हुण्याच्या माध्यमातून एक पुरस्कार पटकावला होता.संघटनेचा का असेना ?त्याचं मोठ सिलेब्रेशन करायचा मुड होता.त्याला कटाव म्हणून मी उठत म्हणालो, "बरं ते जाऊ दया.तुम्हाला तर मिळाला आहे ना."
 "मिळाला कशाचा? मिळावा लागतो.सहजा सहजी इथं काहीच मिळत नाही.काही गोष्टी कराव्या लागतात. इच्छा नसली तरी ही. !" त्याच्या प्रमाणिकपणाचं मला कौतुकच नाही तर गर्व वाटू लागला.
 "पाव्हण्यांनी त्यांच काम केलं.आता आपली जबाबदारी वाढली."
 "ती कशी?" 
"पुरस्कार मिळालाय पण कार्यक्रमाला माणसं भी पायजेत ना? पाव्हण्याचा भी वठ वाढयला पायजे संघटनेत."
"मग?"
"तेच चार पाच. जिपा न्यावा लागत्याल.थोडीपार गर्दी झाली पायजे ना?" तेवढयात आमच्या वहिनीची एंट्री झाली.फक्कडं चहा आणला होता.ती एका पुरस्कार विजेत्या ची पत्नी होती.त्यांच्या पण चेह-यावर आनंद मावत नव्हता.
"चार पाच काय म्हणता? जेवढे निघतील तेवढे निघू दया.नुसतं अभिनंदन नका करु, भाऊजी. त्यांच्या नाकावर टिच्चून पुरस्कार दिलाय.मित्राला. हा गौरव सोहळा पाहयाला यावच लागेल." इति.वहिनी.
 "नुसतं तूच नाही सारे गल्लॊतले मित्र पण काढावे लागतील ती जबाबदारी तुझी."
                   त्यांनी दिलेला चहा अक्षरश: मला कडू लागू लागला होता. आता वहिनीसमोर त्याला काही बोलता येईना.बायकोसमोर कुणीकुणाचा अपमान करू नये असा सुविचार आहे .माझी उडालेली भांबेरी त्यांनी हेरली," तस टेन्शन घेऊ नका.ओल सूक...सारचं देऊ."
 "देऊ नाही हाॅटेलच बूक करू.लेडीजसाठी एक. नि जंटसाठी सेपरेट. होऊ दया खर्च ." वहिनींनी मन मोठ केलं. बसल्या जाग्यावर माझ्याकडून त्यांनी शब्दच घेतला. कार्यक्रमाला माणसं काढण्याची हमी घॆतल्या नंतर माझी सुटका करणयात आली. मी त्या पुरस्कार देणा-याच संघटनेचे अभार मानले.एक साधा पुरस्कार इंन्सान को कितना बदल देता है। आता निल्या काळतोंडे काही लांबचा नाही.तो आमचा मित्रचं.आमच्याच गल्लीत राहतो.त्याच्या नाकावर टिच्चून संघटनेने असे पुरस्कार का दयावेत?चिमूटभर संघटना नाही ती नि राज्यस्तरीय पुरस्कार देते.आपल्याच जातीच्या माणसाचा सत्कार करावा यासाठी संस्था काम करतात.चागले काम,उत्कृष्ट कामापेक्षा त्या माणसाची जात महत्वाची तेच पाहयचे.आपल्या जातीची माणसं शोधायची.त्यांना डोक्यावर घ्यायचं. दुस-याच्या नाकावर टिच्चून ते पुरस्कार दयाचे. समानतेच्या गप्पा मारत जातीवाद पोसायचा.असा हा कार्यकम. हे तर काहिच नाही ज्या संस्थचे अाॅफिस आमच्या मागच्या गल्लीत आहे. ती संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार देते.तिची ख्याती गल्लीच्या पलीकड अदयाप पोहचली नाही.असे पुरस्कार !उदंड झाले आहेत. कुणी कुणाला ही पुरस्कर्ते देते आहे.महापुरूषांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत.ते योग्य व्यक्तीला दिले जावेत. त्याचे धंदे होऊ नयेत. पुरस्काराचे बाजार बंद कसे होणार? रस्त्यावर जाताना विकत घेतले खारमुरे दयावेत अगदी सहज तसे हे पुरस्कार देऊन कसे जमेल?  
या विषयावर माझी एक  कविता..

ग्रेटभेट.

मी पुरस्कारांस एकदा विचारले,
"तू,आदर्शालाच का लेट भेटतो ?"
ते थोड वरमलं. 
किंचीत हासलं सुध्दा
नि म्हणालं, "यात काय राजकारण
बिजकारण नसतं पण हल्ली
आदर्शच कुठं उरलीत?
जे आहेत ते पार सांदीत पडलेत...
शोधता शोधत नाहीत
होतो उशीर ....
अंधाराच्या गर्तेतून शेंदूनच काढावे लागतात.
एक एक....
एकदमच नाही असं नाही
होतो कधी माझा भी निलाव
कधी गटातटात..
कधी जात धर्माच्या
चिकट लगदाळीत अडकवतात मला.
बांधतात कधी नालायकांच्या भी गळयात
पण 
सोनं ते सोन असतं,भाऊ 
 ते चकाकतचं. 
नि होते ग्रेट भेट .... 
जी माझं अस्तिवचं शिल्लक ठेवते
 या भंयकर लोकशाही राज्यात ..."
     . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८
             sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

कुणात जीव रंगला

कुणात
जी
व रंगला



परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो. सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती. आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं . लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ... दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं. माझ्या एटीएमचा ताबा त्यांनी कधीच घेतला होता. मी आपलं उग इकडं तिकडं पहात होतो काय करणार? समोरच्या एका कांऊटरवर मला एक मुलगी दिसली. ती सेल्स गर्लच होती. या दुकानात दोनशे तीनशे तरी वर्कर असतील. त्यात ती नवखी वाटत होती .थोडी आर्कषक होती. अगदीचं मोहक वगैरे नाही. बाकीचं पण अनेक मुली मुलं होती.काही प्रौढ ही होती पण ती जरा वेगळीच वाटतं होती. ती तन्मयतेने काम करतं होती. ग्राहकाला तत्पर सेवा देत होती. तिचं बोलणं शांत होतं.ते ब-यापैकी मधूर असावं.मला तर ती प्रमाणिक वाटतं होती.मी तिच्याकडं वांरवार पहातो आहे हे तिच्या लक्षात आलं. तिच्या चेह-यावर संकोचाची रेषा उमटली. मी आता तिच्याकडं पहाणं टाळल. आता चोरून वगैरे पहाणं तर योग्य नव्हतं. मी आपलं वेडयाचं सोंग....घेऊन इकडे तिकडे पहात बसलो. तिच्या बरोबरची पोरं होती.ते चांगलेचं चेकाळली होती.ते तरूणचं होती.आणि त्यांच्या त्या हरकती तारूण्य सुलभचं होत्या.पण ती त्यातली नव्हती. ती शांत होती.मला जरा सोज्वळ वाटली . उलट ती तो धिंगाणा..मस्ती टाळत होती . मला पण एक कळत नव्हतं.माझं लक्ष तिच्याकडंचं का जातं होतं? काहीचं कारणं नसतानी नजरानजर होई. तो अपघातचं असे. तशी ती जास्त संकूचली.... थोडया वेळात एक प्रौढ बाई आली. तिच्या हातात एक वायरची पिशवी होती. ती जरा थबकत थबकत चलत होती. तिचं कुणीतरी हरवलं असेल का ? ती कुणाला शोधत होती? तिनं तिथंचं जवळ एका मुलाला विचारलं," आरं तू इथचं कामाला आसतुस काय ?" "हा..काय घ्यायचं ?" त्या पोरांनी जरा तिरकसचं प्रश्न केला. "घ्यायचं नाही.मला दयायचं .." " दयायचं.....? इथं काय द्यायचं ?इथं फक्त ..दिलं जातं." " आर, आमची आशी हाय कामाला इथं . दिसली का तुला ?" "आशी....कदमाची का चाळकाची ? " चाळकाची ...मयी पोरगी हाय ती"ते पोट्ट तिथूनच आरडलं. "ऐआश्ये....इकडं बगय तुही आय आली." आता त्याचा आवाज ऐकून सारीचं माणसं भांबरली. त्या बाईकडं पाहू लागली. आता हयो काय गुन्हा केलाय आपणं .आस तिला वाटलं. ती वरमलीचं. सारेच टकमक तिच्याकडं पाहू लागली.ती तरा तरा चालत त्या आशीकडं गेली. आशीला मात्र हे आवडलं नव्हतं. तिचा परावर चढला होता. चढलेला पारा चेह-यावर कुठं झाकत असतो व्हयं ? आशी राग रागच पहात होती. ती जवळ गेल्या गेल्याच आशी म्हणाली," कशाला आल्लीस ग इथं ?" " कशाला म्हंजी.....? तू भाकरीचं गठूड तसचं इसरून आल्लीसा. मग दिवस भर काय खाशीलं?" " तेवढयासाठीच आल्लीस व्हयं ?" " हा...कुठून आणून खर्ची?ते पाटलाचं टॅम्पो आल्लाय बाया घेऊन. " "बाया कशाला ?" " त्या मळयात नाही का पल्ली दिल्ली.तिच्यात ज्वारी काढायची." " मोलाणी आणल्यात वयं ?" " मग... बायाचं मिळाणातं ...तीनशं रूपयं रोजं केलाय त्यांनी. इक्काश्या भी लयं माग लागला व्हता. आपल्याला काय ? टेंप्पूत बसायचं. जायचं. ती लखा आत्या म्हणत होती.आश्यीला.... उगचं दुकानावरं पाठीलसं. चार हजारात काय होतं? बाहेरं असं दहा दिसं जरी काम भेटलं तरी झालं. उग कशाला महिनाभर टल्ल खात बसायचं?" " गप्प भर तू...? जा..आता " " म्या जाते.... हे घे. यात आळुच्या वडयात...दिल्लत साखर मावशीनं पानं ते केल्यात. खा लगीचं ?" " म्या खाल्लयं थोडं ? " " आता काय खाल्लसा ?" " खाल्ला वडा पाव... आणला होते " " कुणी....? कोण्या पोराबिरांनी आणलेलं खाऊ नक्कू... ? पोरं लयं टुकार निघाल्लीत आत्ताची." " आये..जा बरं तू...: तिचा काय पाय ओढत नव्हता. तिला अजून काहीतरी बोलायचं होतं. ती मागं फिरल्याली वरळून आली.तिला पालून घेतलं.आश्यी येतं नव्हती.एकदाची ती कटून लावावी म्हणून आली. "आये...जा भर त् आमचं शेठ बघत्या. गि-हाईक पण आढून बसलेत.लयं खडूस हाय हयो लहाना सेठ " " म्हणूचं म्हणत्ये? आसलं कामचं नक्कू बाई. आसल्याच्या नजरा लयं वाईट आसत्यात. " " आग तसलं नाही ग ? " " याचं दुकानातली पोरगी पळून गेल्लती गेल्या वर्षी...तेव्ह टॅप्पूवाला दत्या म्हणत व्हता." आता या दोघी बोलतं बसलूयावर...तिथं सारा खोळंबाचं झाला. तिकडं ते दोनं पोरं...आणि एक पोरगी कानात कुजबजत यांच्याकडं पाहून हासत व्हती. आशीला कसं तरीचं झालं. तिला रागचं आला आयीचा . " त्या दत्याचं नक्कू सांगूस लय नाय शहाणा.... तसली का मी ?" " तसं नाय ग चिमणे...पण उग केलं कुणी काठीचं कोल्हं तर ? हाय का कुणी आपल्याला गरीबाला...?" आशीचं आय पार काकुळती आल्लती तिचं ही खोटं नव्हतं. जगात काय म्हणून घडतं नाही. " आज घरी येणारं मी. मग ठरू.आत्ताचं कमून डोक्कं खाती?" "तसं नाय पण ....जीवाला घोरं लागुतीये..." ती पुन्हा जवळ गेली. तिच्या डोक्यावरून हात फिरीला. बोटं कडाकडा मोडली. " येते मी. दत्या नुसता काव्हणं.उशीर केल्यामुळे...राग नक्कू येऊ देऊस..माझे चिमणे,.. पण दिवसचं खराब आल्लेत बग. पोरांनी काही दिल्लं तर घेऊ नक्कू. आपलं फटकूनचं वाग...काहीचं आसत्यात तसल्या पण गव्हा बरूबर किडं भी रगडत्यात." ती तरा तरा चालायला लागली. दोन तीन पाय-या उतरल्यावर...तिथूनचं ओरडली. " आश्ये ..! भाकरी मोकळया करून ठेव.नाय तर त्यावरलं बेसणं खराब होईल." आशीनं पुन्हा तिच्याकडं बघितलं. ती वायरची पिशवी कांऊटरच्या खाली मांडली. ती पण गुपचूप.... हे सारं मी पहात आहे. तिच्या लक्षात आलं. ती अजून वरमली. तिनं मानं खाली घातली ते वरचं केली नाही. आता पुन्हा ती माझ्याकडं पहात नव्हती. तसं तिनं ठरवलचं असावं. थोडावेळ झाला.
.
 सौ. आणि श्रुति आल्या. त्यांना आता त्याचं कांऊटरला खरेदी करायची होती. जिथं ही अशा होती . त्या दोघी पुढं सरकल्या तसा मी ही सरकलो.त्यांची खरेदी सुरू झाली. तिला एखादी साडी पंसत होणं सोप काम नाही.सारे कंटाळणारं पण ती नाही कंटाळात.आशा त्यांना फार तत्परतेने सारं दाखवत होती. यांच्या स्टाईलला कमी नव्हती. ग्राहक हा राजा असतो.हे सौ.ला पक्कचं ठाऊक असतं. तिला तसचं फिलींग होतं. टाईमपास म्हणून...एक बडीशेपची पुडी तोडली. आणी रिकामा पाऊच कचराकुंडीत टाकायला गेलो. पहातो तर... तीचं वायरची पिशवी त्यात होती. मी खात्र करावी म्हणून ती उचलून पाहिली. तर भाकरीचं गठोड ही तसचं होतं. मी उचलली आणि तशीचं घेऊन आलो. आशा माझ्याकडं पहात होती. एकटक.... मला मात्र कळत नव्हतं. तिनं असं अन्न का फेकून दयावं ? तिला काय नाकारायचं होतं ? ते गरीबाचं अन्न....की तिच्या आईचं भाबड प्रेम ? वास्तव नाकारून ती कसल्या स्वप्न रंगात तर रंगली नव्हती ना ? का कुणात जीव रंगला असेल तिचा ... ?
               परशुराम सोंडगे,पाटोदा
        sahitygandha(साहित्यगंधा).blogspot com.            9673400928

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

जीवाशी खेळ

पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!" ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं. कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला. चौकशीच्या खिडकी जवळ तो आला .तिथं एक नर्स नि एक पोरगा व्हता .त्यांच आपलं काही तरी गुलूगुलू चालं व्हतं. बराचं येळ उभा राहिला तरी ते कशाला आला म्हणून हटकीनात .बरं ते काय बोलतेत. हे भी याला नीट कळन ते काही म-हाटीचं बोलतं पण काही इंग्लीश हाणीत . " मॅडम पेंशट आणलं व्हतं ?" "काय झालयं?" तिनं काय झालं हे इचारलं की गडी जरा बुचकाळयातचं पडला .आता या पोरीला काय सांगावा ? गडयाला लाजच वाटू लागली . तेव्हं जरा इरमलाचं. "काय नाय ...मामीला बोलावतो "आरं मग आणा लवकर ...वर त्वांड करून काय बघतुयास?" त्या कंपाऊडन्रनं उगचं पाऊर हाणला. " चलता नाय येत तिला ....लिप्ट दिसतीया ना ?" "ती नाय चालू ..."चालू नाय शब्द कानावर पडला कीच गडी धूम पळाला . डायरेक्ट पल्ली उचल्ला नि कचा कचा पाय-या चढून आला .पार घायाळ झाला. तेव्ह धापा टाकीत बसला पण नंतर त्या पोरांनी त्या पोरींनी तिला वार्डात नेलं.सासू आली .सारी बोचकं तिथं टाकली .धावत
चं वार्डात गेली .डॉक्टर आलं. तपासण्या सुरू झाल्या .त्या पोट्यांनी एक चिठ्ठी आणून दिली . ते बिलचं होतं तपासण्याचं. तिथं खिडकीवर बिल भरायला सांगितलं. तो बिल भरून आला . " आयल्ला ..!यांचा रट्टा अवघडचं यारं .सात हजार तर पहिल्या रट्यालाच हाणले गडया .." ' सात...?" " अॅडव्हानस्च पाच घेतलेत ...बाकीचं तपासणीचं" " तसलचं इथं...नार्मल झाली डिलव्हरीत बरं नाय तर काय खर नाय ?मग मेला गडया तू " " नार्मलचं कर म्हणायचं " "आयला ...ते डाक्टर काय ? ते आपलं एेकत असतेत व्हयं ?हयो तर सिझरच करतो म्हणत्यात " " पण मी नाय करायचो तसलं सिझर न बिझर..." " आयला बायकोच्या जीवा पेक्षा पैसा प्यारा काय लका तुला ...मग सरकारी दवाखान्यात तडफायचा ना तू ?" " आपलं जगदाळे डाक्तर म्हणालं ...इथचं न्या" ' आयला मग तर घोळच झाला बुवा ..' "कसा क्काय... ?" ' आर ,त्यांची लाईनच राहती.कमिशॅन आसत त्यांना पण" "हॉं..काय म्हणतुस ?" "डाक्टर तर देवा समान असतुया ना रं ?" " पण म्हणत्यात हयो डाक्टर नारमलं डिलव्हरी करतचं नाय जणू .खरं खोट काय कळतयं आपल्याला ...?" " सरसकट कसं करतेल ते ..कवा बुवा करती असतॅल" तेवढयात त्याची सासू घाब-या घाब-या आली. हयो उठूनचं पळाला . 'क्काय...म्हणतेत डाक्टर सायब ?" " ते म्हणतेयं ...सारं चांगलं.तसलं मशिन लावून तपासल.पोरगचं हाय .चांगलं पण..?" "आत्ता कसला पण ?" " पल्लीच्या पोटात पाणी नाय .रगत पण कमी " " तर भी मी साराखा गागत असतो पाणी पी पाणी पी... ती नाय मनावर घेत.रगत कसं काय कमी पडलं आसलं?" " मग डाक्टर काय म्हणतयं ?" डायव्हर नं त्वांड खुपसीलं " ते म्हणतेतं तास भर वाट पाहू .नाय तर सिझारचं करावं लागलं." "म्या म्हणतु नाय केल सिझर तर ...विल्या तू म्हणतुस तेच खर दिसतं .डाक्टराचा नक्की डावच दिसतुया " " आवो तुम्हाला याड लागलं की काय ? पोरं तिकडं नुसती जित्राबावाणी मिडकती.तुमचं हे आपलं काय भी निघतं." " आत्या तुम्हाला नाय कळायचं हे असचं करतेत डॉक्टर...?" " ते म्हणतयं बाळाला धोक्का ...बघा तुमचं काय ते " " बरं खर्च किती येईल म्हणालं?" "ते गुततच दया म्हणालं .पन्नासच खर्च येतो पण जगदाळे पाव्हणं म्हणालं जरा संभाळून घ्या .तुमचं पावणंच हायत जणू तर चाळीस हजार दया ...औषध बिवशध त्यांच्याकडंच " त्याचा तर हात पाय गळाले. "चल विल्या आपुन इचारू....आयला असं आसत व्हयं कुठं ?" विल्याला तो ओढत तो डाक्टरकडं घेऊन आला. कॅबिनमध्ये आत आलं. ते भारी कॅबिन बघून तो तर हॅंगच झाला.नुसतं बघतच बसला . "बस्सा..शेळगावचं न तुम्ही?" " हॉं...! जगदाळ डाक्टरने पाठवलं" " ते भर केलं त्यांनी .तुम्ही पण लवकर आल्लात .अजून तासभर जरी उशीर केला असता तरी बाळ हाती लागलं नसतं.आणि...." " जगदाळे डाक्टर म्हणालं तास दीड तासात पोहचा. मग हयो आमचा विल्या लयं भारी डायव्हऱ नुसती गाडी ठेचाळली." "नाही ते चांगल केलं.तुम्हाला कल्पना नसलं पण तुम्ही दोन जीव वाचवलेत." "हॉं..?" "बरं सा-या तपासण्या झाल्यात. तुम्ही पेंशटचं कोण?" "मी ...?" तो लाजला.आता आपण कसं म्हणावं की मीच नवरायं "तुम्ही पेंशटचं मिस्टर अहात तर ?" "नाय..नाय मी नवरा पल्लीचा." "हां तेचं..ते. अजून बाळाचा धोक्का टळला नाही.गर्भात पाणी नाही .बाळानं शी केली तर आईला पण धोका होऊ शकतो." बाळ आत कुठं शी करत असेल.ते काय खात असेल.काहीचं नाय खाल्ल्यावर शी कशी येईल? असलचं प्रश्न त्याला पडत राहिलं.त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून डॉक्टर जवळच्या कागदावर आकृतीचं काढली.त्यांना समजून सांगू लागले. आता पाची सहावीत असताना मास्तर अशा आकृत्या काढयाचा त्याला तव्हाचं काय कळत नसं.आता काय डोंबल कळलं व्हयं? आपल्याला काहीच कळत नाय यातलं हे कसं सांगणार? "डाक्टर हे कळलं सारं काय करावं लागलं?" "लयं रिस्क कामाची नाय.पेंशटच्या अंगात रक्त पण लयं कमी.अशक्त पेंशटं" "आयला खातचं नाय.रटून खायला पाहिजे अशा दिवसात पण लय खायचा नाद नाय तिला. आता काय करावं लागलं?" "काम पडलं तर रक्त दयावं लागलं.सिझर करावं लागलं." "नाय..नाय,,डाक्टर सिझर नाय करायचं.' " बाळाला आणि पेंशटच्या जीवाला धोका ..." "असू बापडीचा .." "डाक्टर गरीब माणूस..पैसच नाहीत जवळ...म्हणून म्हणतोय तेव्हं.खर्च किती पर्यंत येईल ?" " पन्नास पर्यंत जाईल पण जगदाळे डाक्टरमुळे चाळीस पर्यंत करतो म्हणालो. " " नाय सिझर नाय करायचं ...इथं गू खायला पैसा नाय." "पेंशट उचला....कोण रिस्क घेत ?" "अशा वक्ताला कुठं हलवणारं...?" "मग लिवून दया...तसं " टेबलावरलं बटन दाबलं.नर्स आली यांना अॅग्रीमेंटच पेपर दया.सहया घ्या." डाक्टर रागातचं होतं. हे सारं त्याची सासू बघत होती.इकडं हयो इरीला पेटला व्हता तर तिकडं लेकीचा मिडूक चालला व्हता.तिचा जीव आडकीत्यात सापडला व्हता. तेवढयात नर्स पळतचं आली. "डॉक्टर.. डॉक्टर...पेंशट सिरीअस...." डॉक्टर पळतचं गेलं.तसल्या नळया लावला. तसलं मशिन लावलं. त्यात नुसत्या रेषा पळत.याला आत पण येऊ देईनात. हयो काचातून नुसता पहात राहिला. तेवढयात त्याची सासू जवळ आली. तिनं गळयातल बोरमाळ काढली. त्याच्या हातात देत म्हणाली ,"लेकीच्या जीवापेक्षा ही बोरमाळ काहीचं नाय. माझ्या चिमणीचा जीव मिडकतोय.नाय देखवत तिचा मिडूकं. हे सोनारा पाशी जा मोडा.पैस आणा. खंडोबाराया महया लेकराला वाचव रे बाबा" नुसती फरशीच्या पाया पडत राहिली.ते हातात घेतलं.डाक्टर तिकडून येत व्हता .त्याला हात जोडून म्हणाला,"डाक्टर...काय भी करा.किती भी पैसं लागू दया हयो शिव्या कुणाचा गू काढीन पण महया पल्लीला मरू नाय दयायचो.हे मोडतो आणि पैसं घेऊन येतो.पण डाक्टर माझ्या पल्लीला काय नाय ना होणाऱ?" " प्रयत्न चालुच आहेत.शेवटी जन्म मरण तर या विधाताच्या हाती असतं.तुम्ही आपण कोणं ?" तिथंच भगवान श्रीकृष्णाची हासरी मुर्ती होती.धन्वंतरी ....त्याकडं पाहून डॉक्टर बोलला. तो शिव्या तिथचं हात जोडून उभा होता



एका माणसाची गोष्ट

कथा आणि व्यथा
                                     
 एका माणसाची गोष्ट 


शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?"
" हो, तुला कसं कळलं ?"
" असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? "  अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं.
" बरं तुझी गाडी कोणती ?'
" मॅक्स आहे साहेब "
" टेप ?"
" आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.."
" पण ड्रायवर चांगला का ?"
" एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा"
" अरे...! तो दारू वगैरे ?"
" आता साहेब धंदाच असलाय ? पण स्टेरिंग हातात तोपर्यंत थेंबाला पण शिवत नाही. लयं तात्वीक माणूस .त्याच्या इतकं या लाईनीत शिकलेलं नाही कुणी "
तो फार कॅान्फीडन्शली बोलत होता.त्यानं माझ्या हातातली बॅग घेतली व चालू लागला. मी ही अटी मान्य करूनचं घेतल्या. खाजगी जीपनं प्रवास करत असाल तर तुमचा रूबाब असतो. रूबाब गाजवण्याची तशी संधी तर नक्कीचं मिळते.
जीप जवळ आल्या नंतर त्यांन पुढची सीट रिकामी करून दिली कारण मी डायरेक्ट होतो. डायरेक्ट सीटाचा वेगळाच वट असतो.  दोन पोट्टयांना त्यांनी उठवून मला जागा दिली.ते पोट्टे फारच खुनशी नजरेने पहात होते. त्यांना राग येणं स्वभाविक आहे.
गाणी लावून देऊन तो पुन्हा स्टॅंडकडे गेला.गाडी भरण्यासाठी अजून पाचेक माणसाची गरज होती.
पलीकडं एका वेडया बाभळीच्या  चिमूटभर सावलीत पत्यांचा चांगलाच डाव रंगला होता. बहुतेक ते सारे ड्रायव्हर असावेत. ते ओरडायचे. हासायचे.अलीकडं जिपडयाच्या सावलीत दोनं पेताड चेकाळली होती. ते काय पण बोलायचे. ना शेंडा ना
बुडखा..." कमालीचं बोर झालं होतं.
              थोडावेळ गेला की ते पोट्टं  पाच सहा सीट घेऊन आलं . ते सीट पाहून माझा जीव भांडयात पडला. आता गाडी हाऊस फुल्ल झाली. ड्रायव्हर आला . मध्ये दोन महिला आणि दोन पोरी बसल्या . मागं ते पोरं नि दोन म्हतारे बसले. गाडी हलवायची की एक साहेब आला. तो धिप्पाड तर होताचं पण त्याच्या शरीराला विशिष्ट अकार नव्हता. तो अमिबा सारखा बहू आकृती दिसत होता. ते हळूहळू चालत आला.
'फटयार्यंत येतो'" त्याच्या तोंडात मोठा तोबरा होता. त्याच्या त्या विशाल मुखातून शब्द बाहेर पडतानी  द्रव्याचे
काही थेंब इतरत्र उडाले. ती स्वारी एकदम माझ्या पाशी येऊन उभी राहिली. त्याला माझी जागा हवी होती.त्याच्या बरोबर अजुन  दोघे होते. ते पण पुढंच बसणाऱ होते. मी माझी जागा देण्याचा प्रश्नच नव्हता. मी उठत नाही हे ड्रायव्वरच्या लक्षात आलं.तो शिताफीनं पुढं आला.
 . . . मला विनंती करू लागला. मला बाजूला बोलावून घेतलं. मी बाजूला झालो की ते तिथं बसले. माझ्यासमोर माझ्या जागेवर ते लोक विराजमान झाले. मला त्यांनं हळूचं कानात सांगितलं,
" ते पोलिस .त्यांना फटयापर्यंत यायचं.त्यांना जागा दयावीचं लागेलं.तुम्ही सर अहात समजून घ्या.नसेल तर उतरा . मी मजबूर...उग तमाशा करू नका ."
 त्याच्या या शब्दांचा मला राग आला. मी रागानं जाग्यावरचं तडफडू लागलो.
त्या पोट्टयाकडं बघितलं. मी रागातच होतो.ते लांबूनचं म्हणालं
," जाऊ दया सर. थोडा अॅडजेस्ट करो. बडा सायब है."
आता मला तर काहीचं पर्याय नव्हता.
मागे ही जागा नव्हती. तसाच लटकलो. गाडी सुरू झाली. मागे बसलेली पोट्टे नुसती हसायची.डोकायची. रागाचा पण पारा असतो का? रागाचा सर्वेच्च बिंदू मी गाठला होता.हे सर्वांनाच कळतं होतं. मी जाग्यावरचं फणफण करत होतो.
" हे शिंदया ... जागा दिल्याचं लयीचं कुणाच्या जिव्हारी लागलं आसलं तर मी उतरतो खाली. बघतो उदया तुझी गाडी कशी चलती ते."
" तसं नाय साहेब. कुठं कुणाला राग आलाय? सर ते ! ते आमची माणसं . करत्यात अॅडजेष्ट . सर ..!! राग आलाय का तुम्हाला .?"
छे..!! मला कसला राग ?" कमी जास्त बोललो असतो तर त्यानी मला निम्याचं रस्त्यात उतरील असतं. मग काय करणार ?
 लटकी राम करून तसाच माझा प्रवास सुरू झाला.
ते बिंलीदर गप्प ही बसतं नव्हतं. नुस्त्या गप्पा मारी. आपण कसं रिमांड काढतोत. कस एका एकाला गार करतोत. त्याच्या शौर्याच्या कथा ते सांग. ते अप्रत्यक्षपणे मला दमचं देत होतं. ड्रायव्हऱ नुसतं कोलदंडा घातलेला माणसावाणी हूँ...हूँ..हूँ... करी. बरं यांनी खाल्ला होता मावा .ते बसलं मध्ये. थुंकत भी नसे. तोंड बंद ही ठेवत नव्हतं.तोंडात तसचं मटेरिअल... झालं काय ?
कसा काय त्याचा ताबा सुटलान् कसा नाही.ते सारं द्रव्य... तिथं बसलेल्या पाहूण्यांच्या अंगावर उसळलं. सारे गंभीर झाले पण मला कुठं हसू आवरतं? मी तसच ओठ चावतं हसून घेतलं.मी हासतो हे आतल्य पोरीने पाहिलं नि  तिचा बांध फुटला. मग काय सारेच हासले.ते बिलिंदर ही हासलं. मग काय करेल ?
" प्रवासात आसलं काही बाही नाही खायला पाहिजे...हा...हा..." पुन्हा दाताड काढत बसलं.
त्याच्या थोबाडात उरलं सुरलेलं मटेरिअल बाहेर पडलं. तेवढयातली तेवढयात अंकूचन पावले पण कुणी छी..!!छी... !! थू ...थू केली नाही.
शिरापूर फाटा आला. त्याचे दोन पाहूणे उतरले.त्यांनी भित भित खिशातचं हात घातले.
तेवढयात हे ओरडलं," काय करता ?गाडी काय लोकाची काय आपलीचं.ते तुमच्याकडून कसे पैसे घेतील?"
' सायबाचे पाहूणे तेचं आमची भी पाहूणेच की "
" येऊत का ड्रायव्हर साहेब ?"
" ड्रायव्हर नाहीत ते .ते मालक आहेत या गाडीचे"
गाडीचं मालक म्हटल्यावर तो खुश झाला.
"बरं मालक ...काही चहा पाणी?"
तसा तो मालक उतरला. जवळच्या हॉटेलवर गेले.चहा पाणी घेतलं. टपरीवर पुडी घेतली.
आला आणि गाडी सुरु केली. मला आत जागा झाली होती.बसलो.मी त्याच्याकडं बारकाईनं पहात होतो.
त्यानं आपलं मला एकदा सॉरी म्हणून घेतलं. त्याच्या गाडीचा वेग ही वाढला होता. त्याला रागच आला असावा.
 आम्ही पाटोदयात उतरलो.त्याला पैसे दिले.सारे प्रवासी पांगले.माझा पाय ओढत नव्हता. त्याला वाटलं माझा रागचं गेला नाही.
" जाऊ दया सर .हे पोलिस लयं विचित्र असतात .त्यांच्या हातात आमचा धंदा .आमच्या धंदयावरचं घर चालतं. हा धंदा असला दोन नंबरचा  "
"मला राग नाही आता. तुझा हा धंदा दोन नंबरचाय? मग तो पोलिस होता ना ! त्याची भिती नाही वाटतं तुला ?"
" छे..! भिती कसली.हप्ता देतो आपण ? वर पासून खाल पर्यंत सारे बरबटलेलेत साले.सारे भाडखाऊ आहेत."
" तुला राग येऊ देऊ नकोस .शिक्षण महत्त्वाचं."
" काय नाय सर.... एम ए बी.एड सर मी.ते पण इंग्लीश...."
" मग नोकरी ?"
" गरीबाला कसली नोकरी? शेत विकलं नि आता ही गाडी घेतली त्यात हे असले डोमकावळे ?आज सारं तोटयात गेलं. डिझेल पण नाय निघलं. पुन्हा पाचशे नेलं सर उतरतानी त्यांनी.
मुद्दलात खोटं... मरता येत नाय आणि जगता येत नाही . टू भी ऑर नाँट टू भी दॅट इज क्वशन "
त्यांन खिशातली पुडी काढली.अख्खी तोंडात सोडली. बाय केलं. मला उगचं त्या पोलिसाचं शिक्षण काय असेल असा प्रश्न पडला .या देशात ब-याचं चांगल्या खूर्च्या नालायकांनी बळकावल्या आहेत.
मी नुसतं तिथं पहात राहिलो.
         परशुराम सोंडगे ,पाटोदा (बीड)

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...