रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

पुरस्काराचे खारमुरे

कथा अाणि व्यथा
---------------------

पुरस्काराचे खारमुरे

*************
आज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात आमचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.तेआवाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं आपल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात मी गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." 
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." 
"आज काही विशेष?"
"विशेषच आहे.पेपर नाही वाचले का आज? " 
"नाय बुवा." 
"व्हाॅट्स अप तरी पाहीलं का?" 
"नाय बुवा."
"फेसबुक तरी." 
"नाय बुवा.टायमच नाय भेटला."
"मग कसं कळेल."
"असं काय झालं की ते मला कळलचं पायजे" 
"झालं काहीच नाही.पुरस्कार भेटलाय ." 
"आता कसला भेटलाय?" 
"समाजभुषण...?" 
"कुणाला?" 
 "मलाच .दुसरं कुणाला? हा साधा नाही.राज्यस्तरीय पुरस्कार." "राज्यस्तरीय! " मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढां महान माणूस अपल्या जवळ असताना आपल्याला त्याचं हे कर्तृत्त्व माहित ही नाही. त्याचा एवढा आनंद बघून मलाच गलबलून आलं.आता एवढी मोठी बातमी तो सांगतोय आणि मी गप कसा राहू शकत होतो.मला त्याचं अभिनंदन करण्याची अतिव इच्छा झाली,"वा. !!काॅंगरेच्युलेशन मित्रा,मला तुझा सार्थ अभिमान आहे." असं एक नेहमीच गुळगुळीत वाक्य मी फेकून दिलं आणि त्याला कडकडून मिठ्ठी मारली.चेह-यावर फारच आनंद झाला असल्याचे भाव आणले. माझा असा जबरदस्त शो चालू असतानाच तो वरमला.इतका इमोशनल वगैरे मी होईल असं त्याला अंदाज नसावा बहुतेक. तो जरा संकोचत म्हणाला,"तसं नाही काही एवढं.भेटलाय आपला."
"असं कसं? मित्रा तू समाजभुषण ..!तू आमच्या शेजारी राहतोस. तुझ्या कार्याची दखल राज्यस्तरावरून घेतली गेली हे कमी नाही.आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझा."
 "चल,घरी. चहा तर घेऊ." कमालीचा आनंद ही माणसाला शब्द सुचू देत नसेल. तो गप होता नि मला तोंड सुटलं होतं.आम्ही दोघ त्यांच्या घरी गेलोत.त्यांची स्तुती करावी म्हणून मला काहीतरी गौरव पर बोलणं क्रमप्राप्तच होतं.उग गप कसं बसावं? "मित्रा,तू इतकं मोठ काम करतोस आणि कधी सांगितलं नाहीस."
 "आता त्यात काय सांगण्यासारखं."
 "सांगाया पायजे.तसं कसं माहित होईल."त्यानं पेपर पुढे टाकले.मी ते अधाशापणे वाचत राहिलो. त्यांच्या समाजाच्या संघटनेचा हा पुरस्कार होता.(ही कथा काल्पनिक नसल्यामुळे समाजाचा उल्लेख व संघटनेचं नाव मुद्दाम टाकलेले नाही.हल्ली सा-याच समाजाच्या भावना अतिशय नाजूक झाल्या असल्यामुळे त्या नुसत्या दु:खूच नाहीतर त्या तुटू पण शकतात. त्यामुळे सर्व समाज भावनाची कदर करून नामोल्लेख टाळलेले आहेत.) बातमी वाचल्यामुळे बरचसं मला कळालं होते. "ग्रेट यार. ..या गल्लीला तुझा गर्व पाहिजे "
 'ग्रेट ... 'वगैर माझे शब्द त्याला झेपत नव्हते.तो गुदमरल्यासारखा करायचा.स्तुती माणसाला अंहकाराचे पंख देते.त्यानं हुरळून जाणं अपेक्षित होत पण तस न होता.त्याला ती स्तुती झेपत नव्हती.अशात आपण कुणाची ही स्तुती करण्यात कसूर करत नाही. बोलाचाच भात बोलाचीच कढी. त्यात कशाला कसूर?
 "मी कसला ग्रेट?"
"मग कोण ग्रेट?"
 "ते आमचं पाव्हणं.मेव्हणं.हिचा भाव खरा ग्रेट माणूस.तुला म्हणून सांगतो. लय्यीच पाऊर गडयाचा "
 "त्यांचा पाऊर....? पुरस्कार तुम्हाला कसा?"
"ते बाॅडीवर आहेत संघटनेच्या.धरली बाजू लावून.तेव्हं निल्या पायतोंडयांचा लय टचून होता. त्याची नाय डाळ शिजली. पाहुण्यांनी लय टाइट फिल्डिंग लावली होती."
"पुरस्कारसाठी ही टाइट फिल्डीग? मला नाय समजलं?" "असं.कस...?लय्य टसली लागत्यात.नुसत्या या पुरस्कारासाठी शंभरच्यावरअर्ज होते. त्यात एकच पुरस्कार दयायचा.स्पर्धा तर राहणारचं"
"काय ?तुमच्या समाजात इतकी माणसं चांगली आहेत ." माझं तिरकस बोलणं त्याच्या लक्षात नाही आलं.
"हे एका पुरस्कराचं झालं.असे दहा पुरस्कार दिले जाणार आहेत.शिक्षणरत्न,साहित्यरत्न,जीवनगौरव...वैगरे" 
"असे प्रत्येक समाजातून असंख्य पुरस्कार दिले जातात. या वरून जगात प्रचंड संख्येने चांगली माणसं राहतात हे सिध्दच होत की.उगच सज्जनाचा तुटवडा असे बोंबलत असतो आपण."
"असं निगेटीव्ह नका घेऊ."
"यात काय निगेटिव्ह ?उलट मी फार पा‌ॅझिटीव्ह बोलतोय."
"पण सरकारी पुरस्कराला मर्यादारेषा असतात.त्यात वशिलेबाजी आली.अधिका-याच्या व पुढा-यांचे चमचे आले.त्यांचे लाॅबिंग आलं. तेच ते पुरस्कर बळकावतात.चांगली माणसं उपेक्षित राहतात."
"असं कसं? सरकारी पुरस्काराचे निकष असतात. त्यांची एक निवड प्रक्रिया असते. एक खास पारदर्शक पध्दत असते."
 "असते ना? सारे म‌ॅनेज होतात.सारे फिक्सींग असते.नुसते शो असतात.तेवढेच नाही राजकारण असते. कमालीचा जातीवाद असतो त्यात. "
"हे फार गंभीर अरोप झाले. "तो फार डेरींगने बोलत होता.
"एका शाळेत सा-यांच शिक्षकाना अादर्श पुरस्कार आहेत.या वर्षी ती शाळा बंद होते आहे."
"का?"
 "सारे पोरं इंग्रजी शाळेत. "
"असं कसं ? तसचं हे? पुरस्कार प्राप्त शिक्षक सारे फिरतेत....ना शाळाकडे लक्ष ना पोरांकडं.पालकांना  क्वालटी एज्युकेशन पायजे. मग पालक कशाला कुणाचं ऐकतेन?"
"आता लयचं झालं बुवा? "
"जातीवाद असतो.याचे पुरावेतआपल्याकडं .सलग दहा वर्ष झालं एकाच जातीत आदर्श पुरस्कारेत दिले जातेत.कसं शक्य? चांगुलपणा काय जातीवर अवलंबून असतो काय?"
 "असं कसं? हे नाही पटत बुवा."
"पटो न पटो .त्यात राजकारण असत. त्यात पुन्हा जातीवाद आलाच.काही लोकांची दखल घेतलीच जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो.त्यामुळे आमच्या संघटनेने हे काम सुरू केले आहे." ?
"छान उपक्रम....चांग्ल्या माणसाच्या पाठीवर थाप हवी पण इतर जातीच्या चांगल्या पण उपेक्षित लोकांना पुरस्कार देते का तुमची संघटना."
"नाय?आमची काय सेवा संस्था नाही.ही जाती साठी काम करते. सेवा संस्थाचे असतात धंदे पुरस्कार देण्याचे ."
 "आता कसले आले धंदे यात. उलट ते पदर सन्मान करतात लोकांचा."
 "विकतात पुरस्कर साले ते. भडवे."लांडग्याची मशिन गरम झाली होती.अनेकदा अर्ज आणि प्रयत्न करून ही त्याला पुरस्कार मिळत नव्हता.या त्याच्या खाजगी प्रश्नावर त्यांन उत्तर शोधले होते.मेव्हुण्याच्या माध्यमातून एक पुरस्कार पटकावला होता.संघटनेचा का असेना ?त्याचं मोठ सिलेब्रेशन करायचा मुड होता.त्याला कटाव म्हणून मी उठत म्हणालो, "बरं ते जाऊ दया.तुम्हाला तर मिळाला आहे ना."
 "मिळाला कशाचा? मिळावा लागतो.सहजा सहजी इथं काहीच मिळत नाही.काही गोष्टी कराव्या लागतात. इच्छा नसली तरी ही. !" त्याच्या प्रमाणिकपणाचं मला कौतुकच नाही तर गर्व वाटू लागला.
 "पाव्हण्यांनी त्यांच काम केलं.आता आपली जबाबदारी वाढली."
 "ती कशी?" 
"पुरस्कार मिळालाय पण कार्यक्रमाला माणसं भी पायजेत ना? पाव्हण्याचा भी वठ वाढयला पायजे संघटनेत."
"मग?"
"तेच चार पाच. जिपा न्यावा लागत्याल.थोडीपार गर्दी झाली पायजे ना?" तेवढयात आमच्या वहिनीची एंट्री झाली.फक्कडं चहा आणला होता.ती एका पुरस्कार विजेत्या ची पत्नी होती.त्यांच्या पण चेह-यावर आनंद मावत नव्हता.
"चार पाच काय म्हणता? जेवढे निघतील तेवढे निघू दया.नुसतं अभिनंदन नका करु, भाऊजी. त्यांच्या नाकावर टिच्चून पुरस्कार दिलाय.मित्राला. हा गौरव सोहळा पाहयाला यावच लागेल." इति.वहिनी.
 "नुसतं तूच नाही सारे गल्लॊतले मित्र पण काढावे लागतील ती जबाबदारी तुझी."
                   त्यांनी दिलेला चहा अक्षरश: मला कडू लागू लागला होता. आता वहिनीसमोर त्याला काही बोलता येईना.बायकोसमोर कुणीकुणाचा अपमान करू नये असा सुविचार आहे .माझी उडालेली भांबेरी त्यांनी हेरली," तस टेन्शन घेऊ नका.ओल सूक...सारचं देऊ."
 "देऊ नाही हाॅटेलच बूक करू.लेडीजसाठी एक. नि जंटसाठी सेपरेट. होऊ दया खर्च ." वहिनींनी मन मोठ केलं. बसल्या जाग्यावर माझ्याकडून त्यांनी शब्दच घेतला. कार्यक्रमाला माणसं काढण्याची हमी घॆतल्या नंतर माझी सुटका करणयात आली. मी त्या पुरस्कार देणा-याच संघटनेचे अभार मानले.एक साधा पुरस्कार इंन्सान को कितना बदल देता है। आता निल्या काळतोंडे काही लांबचा नाही.तो आमचा मित्रचं.आमच्याच गल्लीत राहतो.त्याच्या नाकावर टिच्चून संघटनेने असे पुरस्कार का दयावेत?चिमूटभर संघटना नाही ती नि राज्यस्तरीय पुरस्कार देते.आपल्याच जातीच्या माणसाचा सत्कार करावा यासाठी संस्था काम करतात.चागले काम,उत्कृष्ट कामापेक्षा त्या माणसाची जात महत्वाची तेच पाहयचे.आपल्या जातीची माणसं शोधायची.त्यांना डोक्यावर घ्यायचं. दुस-याच्या नाकावर टिच्चून ते पुरस्कार दयाचे. समानतेच्या गप्पा मारत जातीवाद पोसायचा.असा हा कार्यकम. हे तर काहिच नाही ज्या संस्थचे अाॅफिस आमच्या मागच्या गल्लीत आहे. ती संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार देते.तिची ख्याती गल्लीच्या पलीकड अदयाप पोहचली नाही.असे पुरस्कार !उदंड झाले आहेत. कुणी कुणाला ही पुरस्कर्ते देते आहे.महापुरूषांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत.ते योग्य व्यक्तीला दिले जावेत. त्याचे धंदे होऊ नयेत. पुरस्काराचे बाजार बंद कसे होणार? रस्त्यावर जाताना विकत घेतले खारमुरे दयावेत अगदी सहज तसे हे पुरस्कार देऊन कसे जमेल?  
या विषयावर माझी एक  कविता..

ग्रेटभेट.

मी पुरस्कारांस एकदा विचारले,
"तू,आदर्शालाच का लेट भेटतो ?"
ते थोड वरमलं. 
किंचीत हासलं सुध्दा
नि म्हणालं, "यात काय राजकारण
बिजकारण नसतं पण हल्ली
आदर्शच कुठं उरलीत?
जे आहेत ते पार सांदीत पडलेत...
शोधता शोधत नाहीत
होतो उशीर ....
अंधाराच्या गर्तेतून शेंदूनच काढावे लागतात.
एक एक....
एकदमच नाही असं नाही
होतो कधी माझा भी निलाव
कधी गटातटात..
कधी जात धर्माच्या
चिकट लगदाळीत अडकवतात मला.
बांधतात कधी नालायकांच्या भी गळयात
पण 
सोनं ते सोन असतं,भाऊ 
 ते चकाकतचं. 
नि होते ग्रेट भेट .... 
जी माझं अस्तिवचं शिल्लक ठेवते
 या भंयकर लोकशाही राज्यात ..."
     . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८
             sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...