समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ जानेवारी, २०२३

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळले; वैजापूर तालुक्यातील घटना; दहा जण जखमी



सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच  पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल?  मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं  कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा  रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना?  असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.

          गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.डीजे वाजला की झाले सुरू.

  लावणी ही सभ्य  व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल  जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी  समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण  बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही  लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी  हे गीत सादर करताना ओलेचिंब  ललना  पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.

 मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.

 गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का  आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत  ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.

  हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला  होणारा  विरोध  हा पारंपारिकच आहे.त्यात  नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.



      गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.

     ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.

       परशुराम सोंडगे

       बीड



सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

लता दीदी,मी आणि माझी आई

 लता दीदी ,मी आणि माझी आई.

-----------------------------------------------------------------------------         


लता दीदी गेल्या.त्यांची नि माझी कधी भेट झाली नाही.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य वाटयाला कधी आलं नाही. त्यांची गाणी ऐकली. त्या सुरांनी व  शब्दांनी  मनात एक जागा केली. त्या दिव्य सुराबरोबरचं त्या व्यक्तीमत्वांनी  माझ्या काळजात घर केलं.
                     त्यांची गाणी ऐकत कधी धूंद झालो.कधी चेकाळलो.कधी विरघळून गेलो.कधी रडलो. त्या माझ्या कुणीचं नव्हत्या.माझ्या आईला व आण्णांना तर त्या अजिबात माहित नव्हत्या. आईचं विचाराल तर  राष्ट्रीय दुखवटा जाहिर झाला तरी आईला त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. लता दीदी हे जग सोडून गेल्या ही बातमी पण तिला कळली नव्हती.आई शिकली नाही.तिला लता दीदीचं नाव माहित नाही.मी श्रध्दांजली म्हणून लता दीदीचं 'अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव |दरीदरींतून मावळ देवा देऊळ सोडून धाव | ' हे गाणे युटूबवर लावलं.आईला ऐकवलं.
       काही क्षण मी निशब्द झालो. तिला ते गाणे फार आवडले. ते गाणं आईला कितीकसं कळलं असेल हा एक प्रश्नचं आहेपण ते स्वर तिच्या ह्रदयाला भिडले असावेत.हे गाणं म्हणणारी  बाई आज मेली आहे एवढचं आईला कळलं.आई फार  भावूक झाली.गावात कुणी मेलं तरी आई त्या माणसाठी दोन अश्रू वाहते. तिचं डोळ भरून आलं. जन्मला आलं की मराणं आलचं. मरून जाण्यासाठी का देव माणसाला जन्म घालत असेल? तिला भाबडा पण हा गहन प्रश्न पडला.
               लता दीदीला आम्ही नात्याचं लेबल नाही चिटकवू  शकत पण त्या माझ्यासाठी स्पेशल होत्या. आपलं आणि फक्त  आपलचं असतं ना कुणी.अगदी तश्या. त्या भारताच्या कोकिळा होत्या.माझ्या देशाची शान होत्या.त्या भारताचं रत्न होत्या .खरं खोटं माहित नाही पण पाकिस्तानचा मला  तेव्हा पासून फार राग येतो. 
             मी लहान असतानी अशीचं एक कुणीतरी पुडी सोडून दिलेली होती.ती पुडी अशी होती की  काश्मिरच्या बदल्यात पाकडे  लतादीदीचा गळा मागत आहेत.राग ही आला आणि भिती ही वाटली.सरकार दीदीचा गळा पाकडयांना देणार तर नाहीना? हया कल्पनेनचं काळजात धस्स झालं होतं. एकवेळ भारत काश्मिर पाकडयांना देईल पण लता दीदिचा गळा नाही दयायचं सरकार असं कधी वाटायचं.
 त्यांच्या जादुई गळयाचं संशोधन जगातील शास्रज्ञ करत आहेत.त्तांधा लता दीदी सारखा गळा तयार करायचा आहे.अशी पण एक पुडी सोडली होती काही दिवस. माझ्या प्रियेशीचा आवाज लता दीदी सारखा असावा असं मला माझ्या पहिल्या प्रेमापासून वाटतं आलं आहे. त्यामुळे मला दिदीनं गायलेली प्रेमगीत, शृंगार गीत खूप आवडतात आज ही.ती आवडतचं राहतील.
     संगीतातला मी फार जाणकार नाही. संगीताचा गाढा अभ्यासक तर मुळीच नाही. त्यांनी किती गाणी गायली? कसली गाणी गायली?त्यांची संपत्ती किती? त्यांनी कोणत्या प्रकारची गाणी गायली नाहीत?त्या अविवाहीत का राहिल्या? त्या गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीच काय करतील? असले सुजाण नागरीकाचे प्रश्न मला कधी पडले नाहीत. त्यांच्या सुरांचं नि माझ नातं आहे. त्या देहानं पंचतत्वात विलीन झाल्या अस्ल्या तरी सूर तर अजून ही मनात अमृताचे  शिंपन करणारच आहेत ना?त्या अमर नसतील पण त्यांचे स्वर तर अमर आहेत ना?

लता दीदींना मी का श्रध्दांजली वाहू? त्या त्यांच्या स्वराच्या रूपात माझ्या मनात सदैव घुमत राहणार आहेत.

     परशुराम सोंडगे,पाटोदा.

मंगळवार, १५ जून, २०२१

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं


 रिमझिम गिरे सावन.......

पाऊस आणि आठवणींच मेतकूटं

पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.

    पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.


गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

*उंदरीन सुंदरीन; बाल कल्पनालालसेचे चोचले पुरवणाऱ्या कविता

मराठी साहित्यात बालकुमारांसाठी फारसे लिहिले जात नाही. जे थोड फार लिहले जाते. त्यात तोच तोपणा व अनुकरण जास्त असते. पांरपारीक चौकटीतच लिहील जात. चौकोटी मोडण्याचं धाडस मराठी साहित्यात फारसा होताना दिसत नाही. बालकांसाठी लिहायच म्हणजे फारच कठीण काम असत. त्यासाठी लहान व्हाव लागत. आपल्या भावविश्वावर बालकांच भावविश्व बेताव लागत. बालकांच वय कल्पनालोलुप असत. त्यांच्या संवेदना व जाणीवा वेगळ्या असतात.अभिव्यक्तीची भाषा वेगळी असते. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्या मनावर चढत गेलेले प्रौढत्वाचे स्तर अलगद बाजूला करावे लागतात. बालसाहित्य लिहिताना अनेकदा शिंग मोडून वासरात शिरण्याचा ही प्रयत्न होतो परंतु त्या लेखनाला अकृत्रिमता प्राप्त होत नाही. प्रौढत्वाचा एक दर्प त्यात डोकावत राहतो. दर्जेदार बालसाहित्य ही काळाची गरज आहे. चांगल्या संस्काराची रूजवण, मूल्यांचे बालमनावर रोपण, भाषेचे समृध्दीकरणं, संवेदना, जाणिवाची व नेणिवांच प्रगल्भीकरणासाठी अंकुरणक्षम बालसाहित्याची आवश्यकता आहे. संकारक्षम लिहीण तर धाडसाच काम. त्यात भवतालाच्या वास्तवाचे चटके देणं ही तर महाकठीण गोष्ट. असा अनोखा प्रयत्न कवी विठ्ठल जाधव यांनी केला आहे. ‘उंदरीन सुंदरीन’ हा बालकविता संग्रह नुकताच हाती आला. नाव ऐकून कुणालाही वाटेल की हे बडबड गीताचं पुस्तक असेल. पण तसं नाही ते. आपण पुस्तक हाती पडल्यानंतर चाळण्याच्या उद्देशाने जरी पाने उलगडत राहीलो तरी त्यातल्या एकेक कविता आपण वाचत राहतो. वाचल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. इतक हे पुस्तक आपल्याला जखडून ठेवत. बालकांसाठीच हे पुस्तक मोठ्यांना पण रमून ठेवतं. विठ्ठल जाधव हे नाव काही मराठी साहित्याला नवीन नाही. ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहेच. ’पांढरा कावळा’ या बहूचर्चीत व पुरस्कारप्राप्त कांदबरीचे ते लेखक आहेत. नादमधूर भाषा, गेय नी लय व ताल पकडणारी शब्दयोजना, बोली भाषेतील शब्दांची रेलचेल, अनेक नवनवीन शब्दाची पखरंड जाधव यात करू शकले आहेत. सहजता व नैसर्गिकता हे त्यांच्या भाषाशैलीचं सामर्थ्य आहे. आपल्या अंगावरील सहज एखाद पिस काढून समोरच्याला गुदगुल्या कराव्यात इतक्या सहजतेनं ते शब्द प्रयोजन करत राहतात. वाचता वाचता आपण नकळत ताल धरून नाचू लागतो. तालबध्द शब्दांची हीच तर जादू असते. जाधवांच्या शब्दांत जादू आहे. उदा: ‘उंदरीन सुंदरीन कुरूकुरू शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा. गोल गोल.’ असेल़ किंवा ‘वाजती ढग गड गड गड चमके वीज चम चम चम सर येऊ दे सर सर सर अगं भिजू दे चिंब चिंब चिंब.’ बालमन कल्पनालालसू असतं. अनेक कल्पनाचित्र डोळ्यासमोर तरळलं राहतं. रंग रेषा वापरण्याऐवजी कल्पना चित्र रेखाटण्यासाठी शब्दचं वापरलं तर? शब्दांनीच चित्र डोळ्यासमोर रंगवल तर? ते अधिक आंनददायी असू शकेल. असे अनेक चित्र कवी आपल्या शब्दांनी वाचकासमोर उभा करतो. कल्पानालालसेच चोचले पुरवत राहतो. उदा: ‘एक वानरं,भरदुपारी विद्यापीठात आलं शोधत नवे काही, विभागात हिंडत राहीलं.’ किंवा ‘एक पोरग चुकलं गाडीत बसताना हुकलं गाडी जाता कारखान्या कोयतेधारी ऊसतोडण्या…’ कल्पनेच्या जगाला वास्तवाचा कठोर स्पर्श नाही पेलवू शकत. तरलं तरल स्वप्न लहरी तंरगणाऱ्या या नाजूक वयाला वास्तवाचे हळूवार चिमटे घेण्याचं काम ' उंदरीनं सुंदरीन ' या बालकविता संग्रहात कवी विठ्ठल जाधव यांनी केले आहे. कल्पनेच्या झुल्यात बसून वास्तवाच भान देणारी ही कविता आहे. उदा: बाप रगत ओकतो, दुष्काळी राज्यात या कविता असतील किंवा फाटत गेलेली आपली कुटंब व्यवस्था व आटत गेलेला कौटुंबिक जिव्हाळा असेल यासाठी खालील काही ओळी पुरेश्या आहेत ‘दारात कुत्रा नाही घरात मांजर नाही घर कसे सुने सुने? दार लावून जेवताना दाटत का नाहीत मने?’ किंवा ‘सगळी लेकरं,आईला सारखी प्रेमाला पारखी शेवटी ती.’ तसेच ‘निळेशार शांत पाणी झाड पापण्या कमानी कधी कंठातून गाणी कधी दुष्काळी कहाणी.’ आणि *‘जंगलातील सारी शांतता* *मोबाईल रिंगटोनने भंगली* *कोल्हेकुई, डरकाळी* *नेटवर्क व्यस्तने थांबली'* विदीर्ण होत चालेला असा भवताल असेल किंवा नात्यामध्ये येत गेलेली कृत्रिमता असेल ते चपखल शब्दांत सार बसवतात. बालकवितामध्ये सारेच चांगल चुंगलच असाव अस थोडच असत ? कवी जाधव यांच हे वेगळेपण आहे. नाजूक कोवळ्या बालमनाला दाहक वास्तवभानाची झालर कवी आपल्या खास शब्दातून लावतो. वास्तवभान बरोबरच समाजभान, राष्ट्रप्रेम, भावनिक बंधाचे अधिकचे दृढीकरण, पर्यावरणस्नेहही या कवितेतून दिसते. या कविता जश्या कल्पना लालसेचे चोचले पुरवणाऱ्या आहेत तश्याच त्या संस्कारक्षमपण आहेत. दासू वैद्य यांचा मलपृष्ठावरील या कवितासंग्रहाविषयीचा थोडक्यातला मजकूर ही पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवायला पुरेसा आहे.
               कवी विठ्ठल  यांनी बाल कुमारासाठीचा हा कविता संग्रह लिहिण्याचा धाडसीपणा केला आहे. बाल आणि कुमार या वयातील भाव विश्वात फार भिन्नता असते. त्यांना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं वर्गीकरण झालं असतं तर ते अधिक छान झालं असतं. अर्थात हे माझं वैयक्तिकच मत आहे. एका पुस्तकात कविता छापल्या म्हणून त्यांच मोल कमी होत नाही. इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ व आतील रेखाटन दिवंगत प्रमोद दिवेकर यांनी सुरेख केले आहे. प्रत्येक कवितेला रेखचित्र दिले आहे. बालसाहित्यात शब्दांसोबत चित्र असेल तर उत्तमच असतं. शब्दांचे भाव अलगद त्या रेखाटनात चिकटले जातात. ती बालसाहित्याची गरजच असते. मराठी बालसाहित्यात जुन्या चौकटी मोडून या कविता अधिक गडद होतील यात शंका नाही. मराठी बालसाहित्यात त्या कमालीच्या आश्वासक आहेत यात मात्र शंका नाही. *उंदरीन सुंदरीन* (बालकवितासंग्रह) *विठ्ठल जाधव* इसाप प्रकाशन, नांदेड पृष्ठे; ४२, मुल्य; ४० ₹. ---

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...