रविवार, ४ मार्च, २०१८

लोकशाही झिंदाबाद

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात आलं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत आली.नात्या गोत्यात,पावण्या -रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू-सुना आमने सामने आल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.बाप-लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं. अशाच एका संवेदनशील बूथ असलेल्या गावात निवडणूकीत मतदान अधिकारी म्हणून माझ्या एका मित्रांची निवड झाली होती.त्यानं सांगितलेली ही घटना आहे.त्यानं सांगितली पण आपल्या सभोवती सरार्स या घटना घडत असतात.आपण तसे याबाबतीत एवढे गंभीर नसतोत.गंभीर तर नसतोतच पण बेजबाबदार ही असतोत. मतदाराला मतदान स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करता यावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो.ते अधिकारी याचा कसून प्रयत्न करत होते.अनेक उत्साही कार्यकर्ते नियमाचं  उल्लघंन करण्याचा प्रयत्न करत होते.अर्थात त्यात स्टंटचबाजीच जास्त असते.मोठयाने आवाज करणे,उगच शिव्या देणं,समोरच्यावर आक्रमण करणे.हे सारं उगचं करणं.दहशत पसरविणे हा त्यांचा उद्देश असतो.कधी कधी आपणच फक्त प्रमाणिक आणि आक्रमक कार्यकर्ता आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
         ती त्यांची गरज ही असते.प्रत्येक धंदयाचं एक कौशल्य असत.राजकारण हा जर धंदा मानला तर अशी नाटक करणं आवश्यकच असते.अभिनय उत्तम करावा लागतो.एखादया कसलेल्या कलाकारापेक्षा ते ग्रेट असतात. नेत्यांना ओरिजनल स्टेज असते. इतर पात्र ही खरे खुरे माणसं असतात.त्यांच्या भावना नाटकी नसतात.ओरिजनलं स्टेजवर हा अभिनय करावा लागतो.एकटयालाच हे करावं लागतं.
असा' शो 'च असतो पण गोंधळ खरा होतो.तो खरा गोंधळ होतो.पोलिस शिपायाची दमछाक होते.अनेक लोक पळत ....पुन्हा येत.मतदान केल्यानंतर तिथचं थांबत.आपल्या मतदानाचा अधिकार बजावून शांत जाणारे मतदार दुर्लभ असतात.गावातील झाडून माणसं मतदानाला आणण्याचा प्रयत्न जो तो करत होता.म्हतारे कोतारे,रानातून छप्परातून आणले जात होते.कुणाला गाडीवर. ...कुणाला चालत,तर कुणाला चक्क पाटकोळी....त्यांना अंधाळे दाखवून मतदान घरातले लोकच ठोकत होते.या वेळी मात्र दोन्ही पार्टया समजदार होतात.विधानसभेत नाही का सारे आमदार एक होऊन स्वत:चं मानधन व भत्ते वाढवून घेत.बहुमताने नव्हे तर सर्वानुमते.
असाच बराचं वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.आता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्ट्यांचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ.अधिका-याने उलट घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोर्टर ही बोलू लागले.प्रश्न हा होता की कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं. 
 अधिकारी: "आजी,खरच दिसत नाही का ?" 
आजी:" म्या काय दाटून म्हणतेयं काय ? पारं डोळयाचं खाचा झाल्यात की."
अधिकारी:"हे बोट किती?" तीन बोट म्हतारी पुढं दाखवत ते म्हणाले.म्हतारीनं थोडा वेळ घेतला.पटकन उत्तर दिलं. 
'पाच"तसं त्यातलचं एकजण आराडलं,सायेब,म्हतारी काय लबाड बोलती काय? खरच तिला दिसत नाही." सायबाची भी खात्रीच झाली होती.त्यांनी पुढच्या प्रश्न विचारला,"हे दोघ कोण आहेत ?" 
आजी:" हा थोरल्याचं नि हा धाकल्याचायं." अधिकारी:मतदान कुणाला करू दयायचं ?" 
आजी:"या धाकल्याच्याला.इकासला".असं ती म्हतारी म्हणल्या बरोबर थोरल्याचं ते पोरग पारं म्हतारीच्या अंगावरच धावून गेलं आणि म्हणालं,"म्हतारे काय म्हणालीस ?" 
आजी :"काय नाय बाबा तुला देते ना निम्मे.तेव्हचं नातू नि तू नाहीस काय ?"
 नातू :"बघ इचार कर.मतदान मला करू दे."
तो पोरगा डायरेक्टचं दम टाकत होता.हा काय तमाशा आपल्यामुळे झालाय याचं प्रेशर त्या म्हतारीला आलं होतं.तो नातू नंबर दोन जास्तच कालवा करत असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आलं.तवा मात्र दोन्ही पार्टया हातघाईवर आल्या.तेव्ह कराकरा दात ओठ खातचं बाहेर गेला.ते पण मोठं रगील होतं.मागं गुरकू गुरकू बघ. सर्व प्रोसीजर झाल्यानंतर त्या नातवांन मतदान केल.मतदान केल्या नंतर तेव्ह खूश झाला होता.ते खुशीतच पळालं बाहेर.म्हतारी राहिली तिथंच.आता म्हतारीला चालता येईना,उठता येईना.ती तिथचं आरडू लागली.बाकीचे म्हतारीला घेऊन बाहेर नेऊ लागले.म्हतारी जाईना."अगोदर त्याला बोलवा.महया इक्कासाला बोलवा."असं ओरडू लागली.इक्कासला मोठयाने चार पाच जणानी हाका मारल्या तवा तेव्ह आला.म्हतारीला हाताला धरून घेऊन जाऊ लागला.म्हतारी तरी जायला राजी होत नव्हती.आता सा-यांनाच काही कळेना की म्हतारीचा असा हट्ट का? "तू अगोदर त्या दोन नोटा दे." 
"चल बाहेर देतो"
 "नाय आता दे.इथच दे.त्या सुभ्याला लगेच माझ्या हाताने देते.तेव्ह आताच डाफरून गेलाय.उग कशाला भांडणाचा कहारं."ती सर्व लोकांकडे पाहत पाहत म्हणाली.लोकांचा काहीच आक्षेप नव्हता.अर्थात तो पण त्याचा घरगुती मुद्दाच होता.फक्त त्यांनी तो घरी मिटवावा एवढीच अपेक्षा होती. बबळच इक्काश्या ओढू लागला.म्हतारी कावाली. ""तू दे आधी...त्याची भी अन् तुझी पण आजीच त्यांनी दिलेत मताला पण मला कोण देतेय.मत माझं आणि मालक हे झालेत.म्हतारी साराचं पोलखोल करील म्हणून त्या नातवानं एक शंभराची नोट काढली.तशी म्हतारी ओरडली,"म्या काय आंधळी काय?पाचश्याची दे" तसा तो विकास नावाचा नातू तिला ओढीतच घेऊन गेला.प्रश्न हा होता म्हतारीला दिसतं होत.ती आंधळी नव्हती.मग ती खोट का बोलली? इक्कासने हे डील केल असेल.म्हतारीच मतदान करून घेतो अस सांगून तिन्ही ही पार्टयाकडून पैस उकळले असणार.लय्यीचं चाप्टर गडया.त्याच्या चाप्टरपणा बाबत सा-यांच एकमत झालं होतं.मतदानाचा अधिकार नसलेला इक्कसही आजच मतदान विकत घेण्याच व्यवहार करतो.त्याला हा देश व्यवहारचतुर म्हणतो.मताचा निलाव केला जातोय.हे सारेच बघतात.नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेले अधिकार आणि कर्तव्य कुठे शोधायचे?तेव्ह इक्कस मोठा नेता होणार.हे निश्चितच आहे.असे इक्कास गावागावातून शेकडयांनी तयार होत आहेत.भारतीय नसगरिक 'भारत माझा देश आहे'ही प्रतिज्ञा म्हणत लोकशाहीचं ही झिंदाबाद करत राहतील.कुणाला काही डाऊट? परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha.blogspot.com

बळीराजा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी वगैरे

कथा आणि व्यथा

बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."

कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
sahitygandha.blogspot. com
https://www.misalpav.com/node/39191या वर ही कथा वाचता येईल
लेखसंस्कृतीकथा



गरिबी अाणि जिद्द

कथा आणि व्यथा

गरिबी आणि जिद्द

यवतमाळ शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण  त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण  नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
 आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश...आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद...
" तीन चाय दे लवकर." मी आॅडर सोडली.
तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला.
पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं.
"सायब पाणी...!!" मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग होता.  गि-हाईक आलं की त्याला पाणी दयावं नंतर आॅर्डर घ्यावी अशी रीतच असते. त्यात रागण्यासारख काय होत ? त्या मघाकडं  आम्ही तुच्छ नजरेनं पाहिलं.
"सायब तुम्हाला बिसलरी हवी का ? पण ती माझ्याकडं नाही.समोरून आणून देऊ का ?"
"एवढं मोठं हॉटेल आहे नि बिसलरी नाही? "
"सायब त्याला फ्रिज पायजे की "
"मग ठेवायचं की?"
" इथं असं रस्त्यावर...? " तो हासला आणि पळतचं मेडीकल मध्ये गेला . त्याला कळून चूकलं होतं हे आपली मज्जा घेत आहेत. तो पाण्याची बाटली घेऊन आला. मला देत तो म्हणाला,
"सायब पाणी नाय ठेवत मी पण चहा असा फक्कड बनवतो ."
"स्वच्छता भी पायजे.नुसतं फक्कड नि बिक्कड" काय कामाचा ?" मी उगच उपदेशाचा डोस दिला.असा डोस देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. स्वच्छता शब्द एेकल्यावर तो बारिक हासला. तिथं जी माणसं होती. ती घटाघटा पाणी पित. चहा पित.वचावचा खात.मी कुतुहलाने पहात होतो.ते इतकं घाणरेडे खात आहेत. धूळ बसलेले अन्न खात आहेत.इतकं अशुध्द पाणी पित आहेत.यांच्या पोटात इतके विषाणू जात असतील.जंतू जात असतील.यांना कसं काही होत नाही?रोग गरीबांच शरीर निवडत नसतील काय ?
माझा मलाच भाबडा प्रश्न पडला.
आमच्यासाठी स्पेशल चहा बनत होता.तेवढयात तिथं एक कप्पलं आलं. त्यांच्या सोबत त्यांच एक पिल्लू पण होत. त्या गडयाचे केस  वाढलेले...विस्कटलेले...थोडे थोडे पिकायला लागलेले.दाढीचं खूट वाढलेले. जीन्स होती पण फाटलेली..मळलेली...त्यानं किमान आठ दिवस तरी अंघोळ केली नसेल.गाल पार चपटे झाले होते. त्याची बायको पण तशीच अवतार उतारलेली होती. तिचं वय तीसच्या आतचं असावं .जांभळया गर्द रंगाची साडी.कळकटलेल हिरवट रंगाचं पोलकं... ते पण विरलेलं होतं.त्यातून तिचं अंग दिसतं होतं. तिचा ते पदराने झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न चालु होता. . केसाचा झाप झालेला...पायात तुटकी चप्पल...ते लेकरू कडाला. त्याचं अंग मळलेलं...शेंबडाच्या वाळून गेलेल्या रेषा.. ते पण हं ते तिला तोडीत होतं.तिनं तिला पाजलं होत की नाही ? ते भुकेलेले असावं. तिनचं जर काही खाल्ल नसल्ल तर ? ती काय करू शकत होती. बाकी ती सुंदर  नाही पण आकर्षक होती.  तिची आकर्षकता तिच्या तारूण्यात असावी.तिला पाहिलं की मला जरा कळवळून आलं. ह्रदय माझं कणव पाझरू लागलं. ते सारे आमच्या पुढयात येऊन उभे राहिले.
" ती खिचडी दे एक प्लेट" त्यानं आॅर्डर दिली.
" पैसं आहेत का ?"
" दहा....हायेत "
"आरं मग ...पाच ?"
"देऊ की दादा .... त्यानं विनवणी केली.
"असं रोजचं कमी कसं ?"
" दे दादा ...आज देऊ तुझे .लेकरू लयं भुकेल"
हाॅटेलवाल्यांन लगेच एक प्लेट घेतली.खिचडी टाकली.त्यावर हरभरा उसळ टाकली .कांदा कापला.कोंथिबर टाकली तिच्या हातात दिली.
"बस्स..एकचं.तुम्हाला नको का?"
"आम्हाला नको .आज लग्नात जातोय.तिथचं खाऊ ." तिनं सपष्टीकरणं दिलं.
" त्यांना कशाला सांगायचं लग्न बिग्न...."तिनं सपष्टीकरण देणं त्याला आवडलं नव्हतं.
तिथचं झाडाच्या सावलीला बसले. आमचा चहा आला.फुरके मारीत चहाचं पिऊ लागलोत.चहाला भारी चव होती.पाॅश हॉटलात चहात अशी चव नि मज्जा नाही कधी सापडली.
 माझं लक्ष त्या कप्पलं कडेचं होतं. ती त्या लहानग्याला भरवित होती.ते लहानग अधाशापणे खात होते. हा तिथचं बसून होता. बोलता बोलता तो एकदा घास तोंडात टाकायचा.तशी ती ओरडायची ...त्याच्यावर खेकासायची..
"लेकराला खाऊ दया." तो नुसता हसायचा. दाताड काढयचा. तो जीभल्या चाटत होता.
तिच्या ही त्वांडाला पाणी सुटलं होतं.ते मी सपष्ट पाहू शकत होतो.मी त्यांच्याकडं पहातचं होतो. तेवढयात तिची नि माझी नजरा नजरा झाली.ती जरा संकोचली.  तो फटकाचं पदर तिनं नीट केला. हे मी माझ्या मित्राला दाखवलं. मला त्यांच्याबद्दल प्रंचड सहानुभूती होती .मित्र पण ते दृश्य पाहू लागलं.  आम्ही सारे त्यांच्याकडं पहात होतो.तिनं हळूचं तिच्या नव-याला सांगितल असावं .तो जरा सावध बसला.आपल्या दारिद्रायचं प्रदर्शन कुणाला हवं असेल बरं ?
माझ्या एका मित्रांनी ते करूण दृश्य कॅमे-यात बंध करण्याची उत्कट इच्छा झाली .एक बरं होतं.त्याला सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा झाली नाही. त्यानं मोबाईल काढला नि फोटो काढले. त्यांनी फोटो काढलेले तिला कळले.ती ताडकून उभी  राहिली.त्या लहानग्याला भरवण्याचं बंद केल.तिथूनचं ओरडली," फोटो का काढला काय  ? आम्ही काय वेडे वाटलोका ?"
तिला फार राग  आला होता. आमची सा-यांची चीड आली होती.
" तुझा नाय फोटो काढला मी"  मित्र घाबरून गेला. हासत हासत मागे सरकला. मोबाईल खिशात ठेऊन दिला. उग सुरक्षीत ...
ती पुन्हा पलीकडं गेली.त्या लहानग्याला खाऊ घालू लागली. हॉटेलवाला मित्राकडं बघून मुरक्या मुरक्या हासला.
" मी सहज फोटो काढयला गेलो.बाई पार जहाल दिसते बुवा"
" तुम्ही कशाला काढयचा फोटो?"
"उग आपला सहज...."
" गरीबी खूप वाईट असते. ती अशी फुटू नाहीत मावायाची."
" तसं नाही रे..."
" मग कसं ?"
" ती उपाशी राहते पण भीक नाही मागत. काम करते तेवढचं खाते.तो मात्र पैसा आला का मुत पितो."
"राहते कुठं ?"
" त्या तिथचं पुलाच्या खाली. सायब तिचं घर संसार... पण लयं इमानी .उधारी नाही ठेवत."
"पण ती इथं कशाला आली?"
"आली.कुणाला कोणतं भोग दयायचं त्याच्या हातात सायब .ती लय्यं मोठी स्टोरी हाय."
"लव्ह स्टोरी तर नाही ना ?"
"तसं...चं हाय." तो खळखळून हासला. सारे हासले. मला हासू नाही आलं.
" कसं? सांग तरी."
"एका प्राघ्यापकाची पोरगी सायब ती. त्याच्यात जीव गुंतला.आली सारं घर दार सोडून.आणि  या माठयांनी ठेवली आता पुलाच्या खाली.”
“तशीचं असलं ती.” आमच्यातला एक जण म्हणाला"असं नका म्हणू सायब. ती मला भाउ मानते.
 ती तुला भाऊ मानते पण तू मानतो का तिला बहीण..."माझा  खोचक प्रश्न.
"मानतो सायब.ती लय्यचं जिद्दी नि खंबीर ..."
मला त्याची छाती तिच्या गर्वानं फुगून आल्यावाणी वाटलं. ती आमच्याकडं पहात होती.
त्यानं तंबाखूचं पुडी काढली. त्यानं घेतली.तिला दिली चिमूटभर... दोघांनी चोळली .तोंडात टाकली. लेकराला कडेला घेतलं. तिनं त्याचा हातहातात घेतला व त्याला अधिकचं बिलगली.आमच्यकडं पाहिलं. विजयी मुद्रेने ती हासत गेली
                                  परशुराम सोंडगे,पाटोदा
                              sahitygandha.blogspot. com
                                  prshuramsondge.blogspot.com

गुरुवार, १ मार्च, २०१८

गुडमाॅर्नींग पथक (कथाकथन)

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी एका शिक्षकाची होणारी दमछाक.  .....व. शारदा काकूची जिद्द व प्रेरणेने गाव हागणदारमुक्तीसाठी सकारात्क होणारी भुमिका  .   (मराठवाडा साहित्यसंमेलब,अंबाजोगाई येथे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कथा.परशुराम सोंडगे यांच्याच अावाजात)

तहान

कथा आणि व्यथा
 ******************************
          तहान
( जलदिना निमत्त ही कथा लिहीली होती.व्यस्तमुळे प्रसिध्द करता आली नाही.माझ्या काही मित्र च्या आग्रहाखातर पोस्ट करतोय.)
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं वेडपाटं होती.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं  नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या.  बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या  बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा  होतं होता.
त्यात वशिल्यावाल्याला... नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं.
टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ  हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता...पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच...
  आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला.  सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं.
आता या बापुडया कुठून पाणी आणणार...मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ?
तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय... तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ?
पाणीचं कुठं दिसेना.
आता त्यांनी मोर्चा...काॅलनीतल्या घरांकडे वळवला.  अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या...पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं.ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ?
भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत.
मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं  काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं
ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं...आणी कुणी बोलतं ही नव्हतं.
आता हे काय करणारं ? मला उत्सुकता  लागली होती.
     देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद...टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून...
त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही.  त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला
पाण्याला कमी नव्हतं.
  आमची सत्ता...आमचं माणसं... आमचं पाणी... असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी  देणं शक्य नव्हतं.
पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक ...
लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर...रागानं त्यांच्याकडे  पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले.
" दादा दे ना पाणी. "
" पळा.. पाणी  बिणी काय नाही."
" दे ना रे...एक एक डराम दे फक्स्त..."
" पळा हे पाणी फुकाटचं नाय....
" दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे..."
" आता पळता का  कसं .." तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट....
मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या  एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम...एक प्रौढ बाई पळाली नाय.
अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं .."
" पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं"
"मग विकते देते काय ,"
" जाती की  नाय  .आयघाले ..." देवगावकर डायरेक्ट  शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली. देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला.
  ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं.  एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर...लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले.
मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण...
त्यांची तहान....? या जगात असे किती लोक असतील...ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात  किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी  पाणी नाही.
पाणी... आणि ....काही काही  आठवत राहिले.  दारात आलो तर...
पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देलगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला ...हंडा .
...सांडलेलं पाणी...माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं.
तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर....भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती....ती माणसाच्या रक्ताचीही असू शकते.

पाणी हे जीवन जपून वापरा. ते प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी
आवश्यक असते याचे भान ठेवा.
******************************
              परशुराम सोंडगे,
                 पाटोदा( बीड )
                  9673400928

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...