सोमवार, ९ एप्रिल, २०१८

गरिबीचा विळखा


सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत. घेतेत ॲडजेस्ट करून… त्यांना भी महीती गडयाची लयं तारांरबळ आसती.पोरी लयं लांबच्या साळात पाठवीणं भी जरा रीस्कचं कामं. आताचं पोरं आसली निघालीत. सैराटी कोंढूळी…. बरं ‘शिकून तरी काय होतं? कुठं नवका-या लागत्यात आता?
                      दोनचार पोताड अस डोक्यावरचं वाहील्या मूळं त्याचा घामाघूम झाला होता.रानतून पार सडकाला आणयचं म्हणजे…सोप्प् काम नव्हतं.बैलगाडी नाय. आंवदा गाडीचं नाय म्हणल्यावर बैलं तरी ठेवता येतत का ? टाकलं ते अघोटीतचं फुकून. गाडी दिली अंकुश्याला.जीतराब भी संभाळयाचं सोप काम नाही राहील.उग ज्यारं होतं माणूस.तेवढं लयं आडतं भी नाय त्याच्यावरून. टमटम आलं की त्यात टाकून ते जायचं होतं.आता कशाला भी टॅक्टरं नि टमटमच आसत्यात. राती घरी जाऊन त्यानं शाम्याला इचारलं होतं. दोन चार पोताड कांदयाची तेवढं… रामपूरी पर्यतं घे सकाळ सकाळ गेलं तर मग बरं पडतं.त्यांचा भी धंदाच राहतो.ते कशाला नाय म्हणतेत.आता हयो माळावर थांबलेला.सारं पोताडी आणलेली. मेथीचं भी एक बाचकं आणलं होतं.टमटम आलं पण जॅम आलं. सारं गच्चं भरलेलं.. उलटं.. दोघ तिघं… त्याला मागून लटकलेले.. सारं पॅक झालेल.जॅमच.शाम्या नुसता हासला. आता तेव्हं तरी काय करणार? कुणाला उतरं म्हणता येतं का? तेव्हं म्हणल्यानं कुणी उतरत तरी असतं का? बाजकी नी बोचकीनं…मुंगीला शिरायला जागा नाही.
“शामा, आता म्या कशात पोतं टाकू ?”
“आयला. तुझं खरं लका पण म्या तरी काय करू. गाडी लाऊस्तोवरचं जॅम झाली.भरं एकदा माणसं बसलयावरं…काय करता येतं?”
“आयला,तुझ्या भरोश्यावरच थांबलो होतो.”
“तुझं खरं पण… म्या काय करू. ये कशानं तरी.”
“असं आसतं का रं? भरोश्याच्या म्हशीला टोणगा.लका परत तरी ये.”
“ छया..छया..!! कसलं परत येतुस? परत आल्यावर… स्पेशलं भाड पडंनं. ते तुला काय परतळं खातं.”
“आयला शामा, तुवा लयं झोपीत डोक्यात धोंडा घातल गडया.” आता सारं पॅक झालेले. टम टम.. लोकं कुठं टायेम पास करून देत आसतेतं व्हयं? बाराची बारा.
“आरं ,शाम्या, शहण्या,,तेव्हं पैसं देणारं ने आमही काय कवडया.. देणारेत व्हयं?” जग्गू दादा उगचं म्हणाला.त्व्हं असाचं पाऊर हाणीत आसतो कुठं  भी.
“तसं नाय. त्याला सांगावा आपलं. नायतर तेव्हं बसायचा आपल्याचं भरोश्यावर.” सारचं गडी गडबड करायला लागली. त्यांच बरूबर होतं. आता इथचं नऊ वाजलं होतं. बाजारात पोहचायला. पार दहा वाजायच्या. भर लवकर गेलं तरं चांगली जागा भेटती नाय तर.. मग बोंबलच्या रांगाकडं नाय तर मिरच्याच्या हारमळीला बसावं लागतं.त्यामुळं सारचं जणाचीं घाई आसती. शाम्याला काय तेवढचं पायजे होतं.त्यानं लगेच सेल्फ  मारला. ते डुगडुग करीत हाललं.त्यातं लोडचं तेवढा होता.ते हाललं पण रायबाचा जीव मात्र घोरात पडला.उगचं कुणी तरी मोठा डोंगूर पुढं टाकलाय आणि आता तेव्हं चढयाचा असं झालं.
             त्याची बायको कुशी,पोरगी उषी पण बाजाराला ‍निघाल्या होत्या. उषीचा लय नाद होता.तिनं उग घोकं घेतला होता. कामं काय होतं तर तिला डेस घ्यायचा होता. आत्याच्या पोराच्या लग्नातला एक भारी ड्रेस होता. तिला पण तेव्हं पार वीरला होता. धूवू धूवू तेव्हचं घालायचा.भारीतला असला तरी रोजच त्याचं धूणं झाल्यावर. पोथारा व्हायला काय लागतं? भरं जी गाडी येई ती.पॅकचं येई. यांचं चार पोती. तीनं सीटं… लोडचं व्हायचा.एखादं आसतं तर कसं लटकून फिटकून जाता येतं. गाडीचं थांबत नसं.तास झाला. दीड तास झाला. आजून ते माळावरचं… आता काय बाजार सोडयला जायचं का ? त्यांच्या जीवाची नुसती घालमेल व्हायला लागली. बायकोनं पोरगी म्हणल्या आम्ही परत जातोत पण हयो गडी ऐकाना. आसला हीरमूड आसतो काय?जाऊ उग परत जायचं म्हणजी बरं नाय.
                    तेवढयात एक डबरीवरला ट्रक आला.त्याला हात केला.ते निघालं भीमा वड-याच्या पोरग.त्यान वळखील.बरं त्यात भी डबर आणलेली.शामा लयचं काकूळती आला. तेव्हं झाला राजी पण आता डबरांनी भरलेल्या ट्रकवर पोतं उचलयचं कसं ? त्या पोरांनी मदत केली पण शामाची आताडीनं आताडी गोळा झाली. कशी बशी डबरीवर तिघं माय लेकरं बसलं. त्या ट्रकातली पोरं नुसती मागं माग वळू वळू बघायची. पोरचं ती. नवाट पोरगी दिसल्यावर चेकाळलं.शामाला मस्स राग यायचा पण बायकोनं आवरला. नाय तरी त्याचा राग काय कामाच होता.लयं शहाणपणा केला आसता तर दिलं असतं मध्येच उतरून. काढलं असतं पीसून.ते चांगलं नवाट चार पाच जण होतं. याचं काय चालायचं त्यांच्य पुढं.
            डबीरीनं भरलेला ट्रक गावात कशाला जातोय. ते बाय पासनचं जाणारं. पैसं थोडचं कमी घेतोय.एका पोत्याचं तीस. असं चार पोत्याचं. एकसं वीसं. तीन सीटाचं नव्वदं. असं दोनशे दहा रपये घेतलं. मेथीच्या बाचक्याचं काहीचं नाय घेतलं. रायबानं त्याचं उपकार मानलं.परात भर कांद त्यांना दिलं. जर ट्रक आला नसता तर कशाचा बाजार कशाच फीजारं. राहीलो आसतो माळावर.त्या शेरीच्या पूलाजवळ त्यानं उतरीलं. तिथून काय  बाजार जवळ नव्हता. रीक्षावाले अश्या टायमला आडूनचं बघणारं. बर आता खिशात खडकू भी नव्हता राहीला.चाळीस पन्नास रूपये राहीले होतं. ते गेलं की कमीटीवालं मागं लागतेल. ते भी पोतयावर पटटी आकरेत. दहा रूपायला पोतं. त्यांचं काय ? मनचं राजं ते. पार त्वांड वाळून गेलं होतं. अकरा वाजून गेलं होतं.
“उषे, पळ भर जाग धर.” कुशीला पुढचं मराणं दिसतं होतं.जागाचं नाय चांगली मिळाल्यावर…
“तुझं तर काही निघत. लेकरू कसं जागा धरीन.तिला कोण मेळ लागून देत आसतं व्हयं?” रायबा लागलीच कुशीवर वसकला.
“मग काय करायचं? जागाच नाय ना मिळायची. बसा बोंबलत.”
“उग नक्कू शाहणपणा हाणू. चल लाव हात.” असं म्हणला. ताणताणच एका पोत्याला हात लावला. बळचं दात खावून पोत उचललं.आतडी पार पिळाटून गेली.उषीनं हात लावला.मधून शिरले. रस्ता मस्सं शॉर्ट कटचा पण लयं खराब. खडी सारी वर आलेली. याडपाट ची काटं जागजागी. हागणदारी भी त्याचं रस्त्याला. पायाची गोळ पार पिंढरी पर्यंत आले आसतील.त्याचा पायचं उचलत नव्हता. धाप लागली होती. काही आलं की त्याचं पाय तीरघडयाची. तसं उषीच्या जीवाची घालमेल व्हायची. मोठया मोठया कार मध्ये माणसं ऐटीत बसून जात होती. हॉर्न वाजत होती. आपल्या बापाची कधी दयीना फिडनं असं वाटायचं. लयं शिकलं पायजे. मोठं साहेबीणं झालं पायजे असं तिला वाटं.नुसतं वाटून काय उपेग ?
             

बाजारात आलं तर सारी गर्दीचं गर्दीं होती. सारं इकडचं ट्रॅफीक जॅम झालेलं. आत घुसताच येईना. उषी पुढं सरकून वाट काढीत होती.काही पुढं सरकायची. काही रगेल वाणी तिथचं उभा राहीयची. कडीकडनं रस्ता काढीत ते घुसले खरे पण  पुढं. त्या चहाच्या टपरी पाशी  सारं पाणीचं सांडलेले.सारा रेंधा झालेला. कसं काय झालं न कासं काय माहीत ? गापकुणी पोतचं खाली पडलं. तसा रायबा भी खाली पडला.पोत खाली पडल्या मळं रेंधा उडाला. एका मामूच्या पांढ-याफॅक पायजम्यावर गेला. तसा तेव्ह ओरडतचं अंगावर धावत आला. रायबा खाली पडल्यामुळं सारी पँन्टं भरली. बळचं तीरघडत उठला.हात जोडलं. हात जोडलं तरी मामूचा तवा चांगलाचं तापला व्हता.
“मादर चोद.. हरामखोर दिखता नही का?” सारचं मुसलमानं गोळा झालं. नुसती चॅवचॅव करायला लागले.पांढ-या शुभ्रपठाणी ड्रेस. त्याच्यावरचं चित्रं उमाटलं होती. तेव्हं अंगावर धावत आला. रायबबाला काहीचं कळत  नव्हतं. त्यानं आपलं नुसतं हात जोडलं.
“नाय हो. मामू, पाय घसरला.” उषीनं त्या मामूचं पाय धरलं.गयावया करू लागली. सारं लोक जमलेली… आता बाराची बारा. कुणी काही. कुणी काही म्हणं.
“नका हो मामू. नका हो मामू.नका हाणू. त्यानं धाप लागली.” सा-यानाचं कीव आली. “सारचं जाऊ दया. दया. वझं झालं आसलं. पाय घसरला आसलं”. असं म्हणायला लागले. मामू लयं पावरात होता पण जरा नरमला व डाफरतचं म्हणाला,” छोकरी के वास्ते छोड देताय.” सा-यानीचं त्याची कीव केली. एवढं ओझं कशाला डोक्यावर आणायच रिक्षा करायचा. असं काही बाही म्हणायला लागली. रायबा कधी नाय ते इरमाटून गेला. पोतं बाजूला वढीलं.उषीला तिथंच बसून तेव्हं बाजारात गेला. जागा धरायची होती. फुल्ल् बाजारं भरलेला… आता कशाची जागा. सारी कडं फिरला. बोंबलाच्या आळीच्या आलीकडं कासारीचं काही दुकानं होती.त्या दुकानाच्या हारमळीत पलीकडं माग आडोश्यला लघवीला जात तिथं थोडी जागा होती. ते कासारं कसं बसून देतेल? बरं त्या आळील एक माळयाचं दुकानं नाही. भेतं भेत कासाराला त्यानं इचारलं. ते सुभा कासाराचं पोरग होतं. सुभा कासारं. रायबाच्या वडीलाचां लयं दोस्तना. ते आता सुधारलं. रामपूरीत त्याचं दोनं दुकानं. बाजारं भी करत्यातं. सुभा कासारं थकलाय आता. त्यालाच इचारावं अम्हणून त्यानं त्या पोराल इचारलं. “मांडा माझी काय हरकत नाय.” अशी परवागी दिली.वळखं कामाला आली.
                  त्यानं लगेचं तळवट आथरीला. काटा मांडला नंतर उषीला हाका मारल्या. आता तसल्या गर्दीत तिला कसं ऐकू जाणारं… पळत गेला. उषीला आणलं. कांदयाचं पोतं अर्ध ओतलं. लाल जरीत कांद नुसतं चमकायची. लोंकाची कांदं एवढी तेजदार नाहीत.असं त्याची त्यालाच वाटलं. लोंकानी पाहीलं की कांदं घेतल्याशी कोण पुढं जात. कांदचं लयं भरी होतं. चांगलं निबारे पोसलेलं. लोकासारख्या चींगळया नाहीत. उषी नळावर गेली. पाणी आणलं.रायबा पाणी प्याला. उन्हं चटकायला लागलं होत. च्याचं फुळूक पाणी प्याला. तसं त्याला थोडी तरतर आली. खरं तर तरतरी त्याला आपलं दुकानं थाटल्यामुळे आली होती. त्याचा जीव हुरूळून गेला. उग पळतचं परत गेला. दुसरी पोतं आणयची होती. मेथीचं बाचक आणायचं होतं.
                            उषी दुकानं मांडून बसली. कुणी गि-हाईकच येत नव्हतं. बोंबलाच्या आळीला लोक सारं माळं घेतल्यावरच येणार. आलं तरी नाकचं दाबून येणारं.आलचं एखाद तर उग चौकशी करं. उग भाव करीत बसं.  भाव पाडून माग. तेवढयात कमीटीवाली पोरं आली. लगेच ते लागले पटटी मागायला. उषी जवळ कशाचं पैसेत.आताचं दुकानं मांडलं. भवानीचं झाली नाय असं ती मस्स् काकुळतली येउन सांगायचे पण ते पोरं ऐकेनात. आता ते पोरं नी पोरगी…. ते उगचं मज्जा घ्यायला लागले. ती पार ज्यारं झाले. गडी काय ऐकेनात. हे सारं त्या कासा-याच्या पोरानं पाहीलं.ते तिथूनचं खवळला,”सांगू काय चेअरमनला ?लयं झालं काय ?” आता त्याचा वठ होता मार्कटमध्ये.ते पोरं तक्काडं पळाली.
“तायडे, आसल्याला भ्याचं नाय. रगडून बोलयचं. भाकरीपायी हमाल्या करेतत. उग हाणेत शहाणपणा.”
त्याचं बोलण्यानं  तिला धीर वाटला.
             मेथीचं बाचकं.पोतं आणलं.पुन्हा दोघ जणं  आलं. बाजार चांगलाच भरला होता. यांच्या हरामळीला कुणी येत नव्हतं. बरं मेथी उन्हात तळून गेली होती. पार सुकल्यामुळं.तिला कुणी इचारीना.रायबबला पोटातचं कसं तरी व्हायला लागलं. पोटातचं काय नव्हतं. वझं तसलं उचलीलं होत. पोटात कालीत होतं.तिथचं भाकर सोडली वांग्याचं भरीत होतं. खाल्ल् दोनचार घास.तसल्या टायमाला घास गिळत असतो व्हयं कुठं ? कुशी तरं नुसती तवांडच पाणीच गिळीत बसली. इकलंच नाय असं नाय पण उग चार पाच किलो कांद विकलं. मेथी तर फुकटचं दील्यावाणी दिली. रूपायला जुडी. बाजार ओसरू लागला. तशी त्यांची तग मग वाढली. बाजार हाट नाय. ड्रेस नाय. कापड नाय.उषी कधी आपल्या ड्रेसं कडं पगायची तर  कधी तिच्या बापाच्या बंडीकडं.तिची तगमग वाढली. लाजाळू पोरगी पण मोठयानं ओरडू लागली.
“कांद घ्या. लाल कांद. घ्या.”
काही माणसं येईत. भाव करीत. कुणी घेई. एक पोत विकलं होतं. अजून तीन पोती कसं विकायचं.
ती आरडून विकालया लागली.रायबबाला नव्हतं जमतं.त्याला उगचं कसं तरी वाटायचं. काय आपलं नशीब. काय पोरीवर येळ आणली. उगचं जीवाला खायाच. नशीबबाला दोष दयायचा. त्याची घालमेल पाहून त्या कासाराच पोरालाच त्यांची दया आली.
“रायबा मामा, आता बाजार ओसरला.इतकं पोती कवा खपायची.धाब्यावाल्याला दयाची का गुतचं. त्याला लावतो घ्याला.”
“ घेईल का ?”
“त्याना काय कीती आसलं तरी कमीचं पडतेत. घे म्हणतो. जरा भाव कमी करीन.”
“लाव बब्बा. नाय नाय कशला म्हणू. आता हे परत कसं नेऊ.कसं भी दे.”
 दहा पंधरा मीनीटात तेव्हं धाब्यावाला आला. राहीलेल्या पोत्याचं दोनशे दिलं. मेथी. गुत्तीचं पंधरा रूपायला दिली.सारं अडीशे रपये आलं. सकाळी खर्चीलाचं घेतल होंत उसनं जालू आण्णंकडून. तेवढं ही नाही मिळालं.तिघ परत आलं. पोटात आग पडली होती. कापडं नाय. बाजार हाट नाय. तसचं परत फिरले.रायबबाला चालणं होतं नव्हतं.
दोघीनं त्याचं हात खांदयावर घेतलं.तो फरकत फरकत चालत होता. स्टँडवर आले.एस. टी कवाच गेली होती. बाकडावर ते बसले होते.रायबाला दम लागत होता तर. शीळया भाकरीचं तुकडं पाण्याबरूबर कुशी गिळतं होती.पोटातील आग कशी तरी गार करावीचं लारगणारं होती. उषी मात्र इचारत पडली होती.हा अंधार काही तासात निव्वळलं. पृथ्वी स्वत:भोवती फिरली की रात जाईल दिवस येईल पण हयो दाद्रियाचं अंधार कसा दूर होईल?
अंधार गच्च दाटून आला होता.
                                               परशुराम सोंडगे,पाटोदा
                                                 ९५२७४६०३५८

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

म्हतारीचं कॉन्फीडन्स


कथा आणि व्यथा
                                       म्हतारीचं कॉन्फीडन्स

दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या.
मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं. मी उगच जरा अलीकडं सरकलो.आता त्या मला पाहू शकत नव्हत्या पण मी थोडं पुढं सरकलो की सारं पाहू शके.
                          सा-या मलांची खिचडी वाटून झाली.  आजी उठल्या. डबा पुढं केला.त्या आमच्या भातावाली बायीला भात मागू लागल्या. अापण फारचं प्रमाणीक व साव अहोत याचा आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.तसा प्रयत्न अनेक चोर पण करतच असतात.म्हतारी हळू अवाजात भात मागत असतानी.काकू त्यांना टाळत होत्या. त्या मोठयांंन बोभाटा करू पहात होत्या.मी ते सारं हळूच पहात होतो.अाजीनं डब्याचा स्पर्श तिच्या दंडाला करत विनवणी सुरू केली.
तशी काकू मोठयान तिच्यावर खेकसली,” म्हतारे पळ ग. हा भात पोरासांठी असतो. मोठया माणसाना नाही.”
तसं म्हतारीनं तोंडावर बोट ठेवता.तिला गप राहण्याची खूण केली. बराच वेळ मी गप राहीलो. त्या ही गपच बसल्या. मुलांनी खरकटं सांडू नये म्हणून ग्राऊंड मध्ये उग फिरवू लागलो.माझं लक्ष मात्र त्यांचकडच होतं.
“अग,रकमा आत्या तुला सगितलं ना ? जा. तू. सर मला खवळतेल. मोठाल्या माणसाला नाय हयो भात.”
“अग, दे थोडा. पोंराचं झाला की आता खाऊन.”
“जा, तू सरला इचार.”
“मी नाय बया. त्यांना कशाला इचारू?”
“मग मी इचारू का ?”
“नकू. त्यांना कशाला इचारतीस? ते जर म्हणले आजी, तू काय शाळेतस तर काय सांगू?^
हे ऐकल्या बरूबर. मी जवळ गेलो व म्हणालो,”काकू काय म्हणत्यात आजी?”
“काय नाय हो सर. म्या कशाला काय म्हणू ?”
“आजीला, मी मराठीत किती वेळा सांगते. हा भात पोरांसाठी असतो. तुला कसं देऊ.तिला मराठी कळनाचं.”
आमच्या शाळाची आर्ची म्हणून प्रसिद्धीस आलेली मीनी.सैराट पिक्चरमधील बरेच डाॅयलाॅग पाठ असल्यामुळे सारे तिला अार्चीच म्हणू लागले. तिला तसचं वाटतं.तर ती आर्ची मध्येच म्हणाली,”आजी ,मग काय इंगलीश मध्ये सांगू काय ?”
तशी म्हतारी चिडली. रागारागनं काठी उचलली.
"नका, देऊ. जाते माझी म्या. कशाला इंग्रजी नी बिग्रजीत सांगता मला”
“आत्या राग आला काय?”
“आता कशाचा राग बया मला. माझा सारा राग गेला.कुणावर रागू ?अशी पोरी सोरीनी भी राडोळी नाय करावी. जाते बया.” अशी म्हणाली. दोन पावलं पुढं गेली.
“आजी, पोरं काय करेतत?”
“एकचं होता. एकुलता एक. त्या ढोल्या मेल्यांनी नेलां बाबा. आता चार वर्ष होत आलं.”
“त्या वरच्यान. भरल्या रानात. फाशी घेतली. गेला सोडून.”
“मग सून आसणं की….?”
“सुन कुणाची कोण बाबा. लयं रीन झाल. रीन झाल.असं म्हणाली. गेली एके दिशी एका डारयवरचा हात धरून.इवडुशी इवडूशी पोरगी माझ्या अंगावं टाकनू.
 “अरे.. अरे.. तिला काय झालं ?” मी उत्तर हळहळ व्यक्त केेेली.
“तसल्या शिदळ रांडाचं काय आसत ? झोपीतल लेकरू. उठलं आयी आयी करत. आयीन केलं काळ त्वांङ.संभाळते मीच. भरल्या जगात कुणी नाय तिला. “ आजीच्या डोळयात पाणी दाटलं. त्या चेह-यावरील सुरूकत्याच्या ओघळरेषातून ते पाणी खाली ओघ्ळत आलं. आजीचा पदर ओला झाला. आता मला आजीचं पुढं काहीचं ऐकायचं नव्हतं. कुणाचं दु:ख टोकरण्यात काय  हशील? मनातलं ठसठसलेले थोडसं ढिवचलं. की कसा भळा भळा पू बाहेर यावा तसं तिच्या मनातलं भळभळत राहीलं.
“सरकार भी कसलं. त्या सटवेनं.कपाळाला लावायला माती नाय ठेवली.म्या पोटाला चिमटं घेऊन कमीलेले सारं शॅत त्याच्या घशात घातल.”
“कुणाच्या..”
“तुम्हाला सांगाया काय झालं बाबा. महया लेकारावाणीत तुम्ही.त्या मसनवाडीच्या ड्रायरला घेउन घरात बसायची. महया लेकाच्या खाटीवर… पोटात आग पडायची नुसती. आग. आग व्हायची देहाची.सारं घरं पेटून दयावा वाटायचं. त्यात उडी मारून जळून जाव वाटायचं.त्यांना भी जाळावं पण त्या पोरीकडं पहात जगते बाबा. माझं तरी काय राहीलं? गापकुणी डोळ झाकलं तर महया लेकराचं काय होईल? लयं घोर राहतो. झोप नाय लागतं रातच्याला.”
“असं नाय व्हायचं आजी. रडू नका. देवाला काळजी आसती. नाय तुमचं डोळ झाकायचे. त्या आजीला मी धीर देऊ लागलो होता.
"कुडीत प्राण हाय तव्हरं.मी नाय कमी पडू दयायचो." फाटका पदर पुन्हा एकदा ओला झाला. माझं काळीज आतुन चीरफाडत गेलं होतं.
                    गेल्या वर्षी आमच्या शाळेत असलेली.एक सडपातळ.. बुजरी.. पोर ही राणी…तिचंच चित्र डोळया समोर उभा राहीलं. राणी लयं हुशार नाही पण ती समजदार पोरगी आहे. इतकी समज तिला या वयात का आली असेल ! त्याचं उत्तर मला आज कळालं होतं.
“काकू ,दया त्यांना भात.”
“सर, आज देता येईल.आजी रोजच आल्यावर ?” संवेदना बोथट झालेल्या ऑफीसमधील अधिका-यासाखी व सरकारी बाबूसारखी काकू मनान बधीर झाल्या सारखी वाटली मला.
“येऊ दया की…. रोजच दयायचा त्यांना भात आता.”
“ही म्हतारी आली की दुस-या येतील.. तुम्हला माहीत नाय हे गाव सर.” काकूनं उगचं निर्थरक सल्ला दिला.
“येऊ दया. म्हतारंपण  ही निरागसच आसतं ना बालपणावाणी?”
“दे की सर म्हणेत तू का फाटं फोडीती?" मी दिलेल्या आधारानं तिचा कॉन्फीडन्सं वाढला होता.
भरला डबा घेऊन जातानी तिच्या चेह-यावर आंनदाच्या मंद लाटा उठल्या होत्या.
आणि माझ्या अंतरंगात कसल्या समाधानाचं अमृतथेंब पाझरत होते. ते माझ्या डोळयाच्या कडा ओलावून गेले. त्यालाच आंनद आश्रू म्हणतात,ना?
                                                 परशुराम. सोंडगे,पाटोदा
                                prshuramsondge.wordpress.com
sahitygandha.blogspot. com




बुधवार, २८ मार्च, २०१८

तुझी ओढणी उठाली

ही एक प्रेम कविता आहे.अतोनात प्रेम असलेली प्रिया
असता हे गावच सोडून जात आहे.शेवटचं काही बोलता नाही आलं.दाटलेल्या अनेक भावनांना  सहज अाणि अप्रतिम शब्दांत पकडलं.कवी परशुराम सोंडगे यांनी.

मंगळवार, २७ मार्च, २०१८

देव नसलेले डाॅक्टर



 दवाखान्याचं कॅनटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतोत.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.अाईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर पण खेळलेलो ,वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून अाईनं काय केलं नव्हतं मच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं.  अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळून गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्यची अटळता माणसाला कळू लागते. या विचारत मी गढून गेलो असतानाचं माझा मोबाईल वाजला .कॉल आय.सी.यु मधूनच होता.आताच तर मी सारं बघून आलो होतो. बाईचं कंडीशन ठीक होती. डॉक्टरच्या मताप्रमाणे तब्येतीत सुधारणा होती. आताच कुठं तिचं शरीर औषधानां साथ देत होतं.तो दिलासा होता. असं इतकं असपष्ट बोलणं ही पुरेस असतं.थोडसं रीलॅक्स व्हायला.
             पुन्हा तिथूनच फोन.जी बातमी पल्याला ऐकायचीच नसते. अशी बातमी असूच नाही असं वाटतं. तीचं बातमी ऐकावी लागते की काय  अशी भीती असल्यामुळे मी दचकलो.तुमचं पेंशट सीरिअस ..कम फास्.” आय सी यु मधील नर्सचा फोन होता.अर्थात तिचा स्वर कमालीचा शांत होता. भावनाशून्यं. आता आईचं मरण पहावं लागतं की काय असा प्रश्नं मला पटला.माझा पाय ओढत नव्हता. ऐ-हीवी मी पळत जात असे. आज पाय जड झाले होते.जाव तर मलाच लागणार होत कारण त्या आय सी यू मध्ये रूगणाच्या एकाच नातेवाईकाला जाऊ दिलं जातं होतं.ते डॉक्टर.. फक्त माझ्याशीच रूगणाच्या कंडीशनविषयी बोलत असतं. ते कुणा कुणाला सांगणार? मी पळत गेलो कारण मी खाली तिस-या मजल्यावर होतो.हॉस्पीटलं किती मोठं असो.तिथं जागजागी लिप्टचा वापर करू नये.चांगल्या आरोग्यासाठी जिन्याचा वापर करा असा फुकटचा सल्ला दिलेला असतो.मी पळत पळत वर गेलो.पळणं आणि प्रचंड भिती मुळे माझाच बीपी हाय झाला होता. मला प्रचंड घाम आला होता.तेवढयात पुन्हा कॉल आला . कम फास्टं.
मला हे कळत नव्हतं. ती सीरीअसं असली तरी मी ती जाऊन काय करू शकत होतो. अनेकदा हात जोडून डॉक्टरला फक्त विनवणीचं करू शकत होतो. जास्तीत जास्तं केवीलवाणा अवाज काढून.जे काय करायच होतं.ते सारं त्यांनाचं करायचं होतं.शेवटी मरण तर अटळचं आसतं.
मी वार्डमध्ये शिरलो.सारे नर्स, दोन डॉक्टरं.. दोन त्यांचे अस्टिंट.सारे तिथ जमा झाले होते. सा-यानी गराडा घातला होता. आमची आयी तडफडत होती. तिच्या एंकदंरीत हालचालीवरून तिला श्वास घ्यायला कमालीचा त्रास होत होता. ती पुढचा श्वास घेईल की नाही अशी भीती वाटतं होती.मी गेलो.ती माझ्याकडं पाहू शकली.त्या डोळयात  कमालीची असाह्ययता होती. हे जग सोडून जावाचं लागतं. असं तिला बहुतेक वाटतं असावं. तीनं माझ्या हाताला स्पर्श करण्याची अपेक्षा केली. माझा तर दगड झाला होता. अगदी निर्जीव…..
काय झालं?” माझा गहीवरल्या स्वरात प्रश्नं. हे बरं होतं तिथं माझ्या जवळचं कुणीच नव्हतं. नाहीतर मी माझा हुंदका थोपवू शकलो नसतो.असावांचा बांध फुटायला आपलं आणि आपलं कुणी तरी जवळ असावं लागतं.
बी पी हाय.”
काय करावं लागलं? डॉ.काय म्हणतायेत.”
तिथचं एक ऑपरेटर एका मशीन मधून आलेली वाकडी तिकडी नळी घेऊन उभा होता.
त्यांना  ऑक्सीजन दयावा लागेल.
मग दयांना?  उशिर का करताय?”
नक्की दयायचा का?”
दयाना प्लीज.तुम्ही  का उशिर करताय ? आई सीरीअसं.”
येस. क्रीटीकलं.” असं ते म्हणतं होते पण तो मशिनची नळी मात्र तिच्या तोंडाला लावत नव्हता. माझा मात्र पारा चढत होता.
"मग दयांना प्लीज…. "मी अक्षरश: ओरडलो.
याचा एका तासाला पाच हजार रूपये चा्र्ज....
असू दया. तुम्ही कधी लावणारेत. लावा लवकर….”
त्यानं पुन्हा माझ्याकडं पाहीलं.त्याला अजून माझ्याकडून कन्फर्म करायचं होतं. मी हातानं इशारा करून त्याला ते लवकर लावण्यास सांगितलं.ती नळी आईच्या नाकाला तोंडाला लावण्यात आली.त्यामुळे तीची होणारी तगमग शांत झाली.पाच मिनीटे सारेच निशब्द होते. तिला आराम वाटू लागला असावा. सारेच आम्ही त्या मशीनच्या स्कीनवरील निळया,पिवळया रेषा पहात राहीलोत.
मी विचारलं,”कसं वाटतं.
ती फक्त मान हलवू शकली. त्यात होकार होता.मला हायसं वाटलं. भीतीच्या जाळानं झालेली काळजाची आग आग थंडावत गेली.
मरणास तूर्त तरी आम्ही थोपवलं होत.
मी वार्डमधून बाहेर पडलो.तितक्यात ती नर्स जवळ येऊन म्हणाली,”हे औषध आणा अणि इतका अॅवान्स भरा.
तिचा भंयकर राग आला.मी आय सी यू मध्येच आरडा ओरडा करायच्या बेतात होतो. मला मीच आवरू शकलो.
"आम्ही पेंशटं तुमच्या जीवावर आय सी यू मध्ये ठेवतो. तुम्ही ऑक्सीजन दयाला आम्हला बोलवतात.तुम्ही तो देउ शकला असता.फक्त पैशासाठी माझी वाट पहात बसलात."
"तसं नाही सर,आम्हला सक्त सूचनाच तशा आहेत."
आसल्या कसल्या सूचना आहेत ?”
पेंनश्टच्या नातेवाईकाना विचारूनच सारं दया.पुन्हा प्राबलेम होतात.”
मी जर उपलब्ध नसतो झालोतर ....तुम्ही मरू दिल असत आईला तर ?”
तस नाही सर,या हॉस्पीटलचे पण काही रूलूस हेत.”
पेशंट तडफडत असताना त्याची तडफड नातेवाईकांना दाखवायची."
तसं नाही सर....असा राग अाणि नका."
"मग तुम्ही  रेट का सांगत होता.
सर सांगावा लागतात.बिलींगच्या वेळेस कीत्येक जणाचे अनेक प्रश्न असतात.
तुम्ही पेंशटच्या नातेवाईकाना ब्लॅकमेल तर करत नाहीत ना?
मुद्दाम असे सच्यूएशन तयार करत नाहीत ना?”
"छे! सर असं काही नाही. हे सरकारी ऑफीस नाही. हे  हॉस्पीटलं आहे."
असं वेठीस नाही धरायला पायजे." मला जरी राग असला तरी मी तो व्यक्त करू शकत नव्हतो..माझ्या मनात आईची तडफड्‍ व त्या माणसाचा तो प्रश्न घोळतचं होता. तो प्रसंग व ती चीडं लगेच विसरणं शक्यं नव्हतं.
तुम्ही अॅडव्हनस भरा.पेंशटची काळजी  नका करू. आमच्या सरांनी अनेकानां मृत्यूच्या दारातून परत आणलं सर.तुम्हीचं तर ते जाणातच अहात. एवढया मोठया हॉस्पीटलंमध्ये नियमांचा अग्रह तर राहणारचं ना सर "
तिचं ते बोलणं. टि.व्ही वरील बातम्या देणा-या ‍ निवीदेकसारखं वाटू लागलं. अगदी बलात्कार ,खूनाच्या बातम्याही कीती ही भावशून्यं चेह-यांनी व स्वरानी देऊ शकतात त्या मी ती चीट्टी घेऊन कॅश कांउटवर गेलो.
              डॉक्टरला आपण लुटारू नाही म्हणू शकत. त्याला देव तरी कसं म्हणता येईल ?  मरण तर अटळचं असत ना ? माणूस जरी डॉक्टर असला तरी ही…….त्याला ही मराव लागतच की.
डाॅक्टर काय करू शकतो? फक्त मरणाच्या वाटा लांबू शकतो.
                                                                  परशुराम सोंडगे
sahitygandha.blogspot. com


            
1हिह
1266



गुरुवार, २२ मार्च, २०१८

गुडमाॅनींग पथक


झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर झाला.तिथचं खिळपाटाला पार चिटकून फटफटी उभी केली.उपरण्याने जॅम आळपलेले थोबाडं मोकळ केल. कावरं बावऱ होऊन इकडं तिकडं पाहिलं.कुणाचाच पत्ता नव्हता.कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता.ते पथक तालुक्याहून येणार व्हतं. ते जिपड नाय नि कुणी मेंबर भी नाय .अपुनच आगुदर आलोत याचं त्यांची त्यांनाच बर वाटलं.बाकीची पथकातली मेंबर कमून आलं नसतील ?त्यांनी उगचं मोबाईलचं डबडं तपासून पाहिल.कुणाचा काल बिल आल्ता का काय ?मिस काल बिस काल काय नव्हता .
आयला सीयोची आडरी तरी कुणीचं कसं नसण आलं .ते ग्रामसेंक पण नाय आलांअसल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून...
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू...
  आता हे बसले तंबाखू  मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला.  तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी  भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात...बाया तरी काय करत्याल ?
जागाच नाही दुसरी. खालतून पाटलाचा अख्खा नंबर आला. तिकडं कुणाला पाय ठेऊन देत नाही . तेवढयात एक दोनजणी आल्या झराझरा पण मास्तरला पाहिलं की रिव्हस गेअरच टाकला. लगेचं पारू आत्याच्या पवळीवर चढून  उडी टाकून पांदीत गेल्या. बायाची पंचाईत झालेली मास्तराच्या  काय लक्षात आलं नाही. बरं असं उघडयावर जाणारचं सारे आज आडवायचं काम व्हतं त्यांचं पण एकटयानं कशाला झंझटीत पडायचं. बाकीचं पथकातले मेंबर आल्यावर बघू... मास्तरं बसलं मोबाईल चिवडीतं. बायाची पंचाईत झाली पण  गडी माणसं कुठं लाजत असतेत व्हयं ? ते आपलं ऐटीत डुलत डुलतं जातं. कुणी टरमेल फिरीत..कुणी बाटली हल्लीत.कुणी सिगारेटीचं धुराडं फुकीत. काही पट्टे मोबाईलचं तुटाणं वाजवीत जातं. काही पट्टे....बॅटरीकी चमकीतच जाईत. इच्चू काटाच्या उजेड भी पाहयजीचं ना ?
कुणी पळतं पळतं जाईत. अर्जंट काॅल असल्यावर...काय करतेल ?   बरं माणूस पाहिलं की मास्तराला रामराम शाम शाम करावचं लागतं. रावू नाना चाला व्हता. ते होता गरबडीत..मास्तरं ...ने ठोकला राम राम...तसाचं गडी वसकला.
मास्तरं...हे टायमं का ? राम राम घालायचा ?" 
मास्तरं नुसतं हासलं. आता काय बोललं ? दोन चार  म्हतारी कोतारी तिथंचं पलीकडं गेली नि तिथंचं जवळचं बसली. आता यांना कसं सांगणार ? बरं ते एकून घेतेत व्हयं ? मास्तरला प्रश्न पडला. तेवढयात एक जण बुटाटं वाजीतचं आलं होतं. टाक ..टाक...काठी हातात. डायरेक्ट बॅटरीक त्याने मास्तराच्या डोळयावरचं चमकीली .मास्तरंने मस्स हात आडवे धरलं पण ते काय खाली घेईना . बरं ते कोण आसणं याचा अंदाज ही काढता येईना... बघता येईना .
"आर, कोणं ? "
"मीचं...?"
"मीचं...? तोहया आयबापानं तोव्हं  नाव नाय ठेवलं का ?"
" मीचं कावळे सर ...?"
" कावळे मास्तरं व्हयं ? इथं कशाला थडपडताय ?
"डियुटीचं तसली आज ?"
"आरं आसली कसली डियुट?"
आता मास्तरांन बळबळचं थोडं हासून घेतलं.
" आज गुडमाॅर्नींग पथक हाय ?"
" आता हे कसलं गुडमार्नींग  ...फिडमारनिंग ...?"
" जे असं हागणदारीला  संडासाला जातेत.  टरमेल...घेऊन येतेल...त्यांना गुलाबाचं फुलं देऊन स्वागत करायचं."
"कुठतं फुलं ?"
" आता येत्याल ना मॅडम फुलं घेऊन..
अंगणवाडीच्या "
" ती आणणारे फुलं.... सुशी आणणारं का फुलं...? तिलात केसात खोसायलाचं पुरायचे नाहीतं."
" तसं नाही तात्या कालचं शाळेतल्या पोरीनी व मॅडम नी पाटी बरं फुलं तोडून ठेवलीत . यात्यालं घेऊन.."
"  येईल तवा येईल. इथं काय करता. जरा बाजूला जावं की .
बायाची कसली पंच्यात झाली. आसं ऐन वाटावरचं थांबल्यावर त्यांनी काय करायचं ?एवढं कळू नाय का  मास्तरं ?.पोराला कसं शिकीता कायनू." आता पार अक्कलचं काढल्यावर...मास्तरचं डोकच सटाकलचं पण काय करता येत? गावात नोकरी करायची असती. काय बोलता येतं ?  मुरली तात्या... सरपंचाच बाप. गडी लयं पावरबाज. टर्रीबाज. आपलीचं टर्र कडीला नेणारं.
" आसलं करायचं कुणी सांगितलं तुम्हाला?"
" सरकारनं... ते आपलं गावं हागणदारी मुक्ती साठी  निवडलं. असं उघडयावरं संडासला बसायचं नाय."
" कुणी आणली रं ही स्कीम येडमाटांनी ?"
" सरपंचानीच निवडलं आसलं गावं.
आता इक्कास करायचा म्हजी ..हागणदारीमुक्ती होणं भी लयं गरजेचं "
" आमच्या शहाण्यानी आणली व्हयं  ही स्कीम ? सा-या स्कीमा  बंद झाल्या की काय  ? ती हागणदारीची स्कीम आणली  ?"
" नाही तात्या,..."
" काय नाय तात्यान काय ? बरं आणली तर आणली मग हागणदारीला काय ? बसावंन तिकड...उग रस्त्याला उभा राहिलावं.
राखणं केल्यावाणी. बायाची लयं पंच्यात होती.
" म्हणूनचं सरकार म्हणतयं संडास बांधा. बाया माणसाचं लयं आवघाड होतं."
" तुमच्या सरकारला लयचं टॅन्शान काय बायाचं. मग दया की म्हणावं बांधून...पाण्याचा हाय का पत्ता ?"
 आता मास्तरनी हेरलं. तात्याच्या तोंडी न लागलेचं बरं. तेवढयात अंगणवाडीच्या मॅडम आल्या. फुलाचं गठूडचं आणलं. बारकाल्या पोरी व्हत्या सोबतं.
" सर, उशीर झालावं का ? कोण सायब यायचे होतं ते आल्लेत का ?"
" नाय आजूक... येतेल ना ते. ते सायब..त्यांना कोण इचारणारं.."आपलं काम सुरू करा. त्या पवळी जवळ थांबा. लेडीजच्या हागणदारीच्या रस्त्यावर...मी इथं थांबतो. " मास्तरांनी  बरीचं फुलं घेतली.
" आवं सर...हे वरचे लोक काय भी काढतात्यात... मला तर लयंच लाज वाटते बया.." उगीचं कारणं नसतानी हासली.
"आता करावं तर लागणचं. " 
      दोघ कामाला लागली पण तवर उजाडत आलं होतं. मास्तरने शिव्या, भिम्या डुलतं डुलतं येत असलेलं पाहिलं. जवळ गेलं आणि हासत हासतच म्हणालं," गुडमाॅर्नींग....नेते." गुलाबचं फुलं शिव्याच्या हातात दिलं. आता शिव्याला काहीचं मेळ नाय .तेव्हं गेला आरबाळून. भिम्यानं मास्तरं बसले हासतं. 
" काय सर? हे काय नवीन?"
" असं उघडयावर जायचं नाय. रस्ते घाण करायचे नाहीत. संडास बांधून घ्यायचं.... " मास्तर पाठ केल्यासारख बडाबडा  करतं राहिलं.  इथं काय चाललयं म्हणून  बाकीचं गडी जमा झाले. कुणी काही भी  बोलतं.कुणी नुसतं हासतं. तेवढयात कुणी आलं की मास्तर....मास्तरं... नुसतं बोंबलतं. तसं मास्तरं फुलं घेऊन माग पळं. मास्तराला पळावं लागं व हसावं ही लागं. बेजारं झालं.
तेवढयात पप्या आला. ते पण गाडीवर 
तसं ते सारंचं ओरडले," मास्तरं...मास्तर...पप्या..पप्या.." मास्तर पळालं. गाडीच्या डिक्कीत  बाटली घेऊन तेवूहं चालला होता. मास्तर नी त्याला फुलं दिलं आणि  गुडमाॅर्नींग घातलं. तसा गडी इरमाटला  पलीकडं तांबा-याच्या वठयावर उषी, निशी नि पुष्पी होत्या.आता पोरी देखतं आपमान म्हणल्यावर... तेव्हं सटकलाचं. राग राग खाली उतरला नि डायरेक्ट मास्तराच्या अंगावर गेला.
" मास्तरं बंद करा नाटकं. काय लावलं."गडी डायरेक्ट  अंगावरच आल्यावर मास्तर तर हॅगच झालं.
"नाय पप्पू. तस नाय.. सरकारी काम.मला तरी काय करयचं?"
" मग नीट निघायचं.गपचिप पोरं शिकायची. जो पर्यंत हयो सरपंच तोवर मी संडास नाय बांधणार...बघू आमची सत्ता आल्यावर..." गडयांनी तावानीच गाडीला किक मारली. आता असं डायरेक्ट  राजकरणावरचं गडी घ सरल्यावर मास्तराची बोलतीचं बंद झाली. 
  आता तिकडं बायाच्या हागणदारीत गम्मच झाली. शब्बा काकूला फुल दिलं की तिन दुसरं मागितलं.
मॅडम अजून एक दया..."
आता ते कशाला ?"
" देते की स्वातीला.तिला लय आवडेत.
आता मॅडमलाच हसाव का रडावं तेच कळाना. शब्बा काकून घेतलं हातातलचं ओढून.
आता मॅडम फुल्लं देत्यात म्हणल्यावर.. सारा पोरीचा घोळकाचं तिथं उलथला. सा-या फुलं ओढू लागल्या. मॅडमला त्या पोरी मोजीत असत्यात व्हयं ?
 ग्रमपंचाईतीचा शिपाई  हळू हळू आला. मुरक्या मुरक्या हासला.
" मास्तरं, सारी गावं  सुधरतील पण हयो आमचा गाव नाय सुधरायचा."
" निल्या दादा असं लयं निगीटीव्हं नाही बोलावं. तुम्हीचं असं म्हणल्यावर..."
" मग सुधरा...बसा येना देत."
मास्तरं गपच झालं. काय करील ?
                       *****
             परशुराम  सोंडगे  पाटोदा  (बीड )
                       9673400928

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...