मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर
काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.
कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...
रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ
भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.
नभ उतरू आलं
चिंब धरताडं ओलं.
पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.
या नभाने या भुईला दान द्यावे.
या मातीतून चैतन्य गावे.
पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.
दूरच्या रानांत,केळीच्या बनातं
हळदीचे उन्हं कोवळे....
हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.
चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.
घन ओथबून येती....किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी
सखे लावण्याची खाणी.....
पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.
शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं.
मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.
या रानांत गुंतलेले प्राण माझे...
तुटकी झ़ोपडी काळीज माझे.
त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.
माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच.
रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.
हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ असतेंच की...अनावरं.
इतक्या नको होतं जाणं त्यांचं असं.. सारं सुनं सुनं झालंयंहे जग,शिवाय,रान,बांध,पांदं, डोंगर....वगैरे
मन शब्दाळणं ही अटळचं आहे.
थरथरली वाट हिरवी
शिवार ही हिरमुसले.
गहिवरले हे रान सारे
हे बांध आश्रूत ओले.
शब्दगंधे बाहूत तुझ्या.
चैतन्य जरा स्तब्ध झाले.
आठवांच्या भारवात या
मनाचे पारवे सुन्न झाले.
तोडुन काळीज झोपडी.
प्राण रानात फडफडते.
भिजकी वही वेदनांची
कैवल्य तुम्ह शरण येते.
भावपूर्ण श्रद्धांजली....!!!