शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

पोळा

 पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या   पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.

                  हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात.

अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी ही 

दादा, आज पोळयाचा क्षण. मी आता कॉलेज वरून आलोय. आयीचं लयीचं फोन आलं होतं.पोळयाचं सणाला गावाकडं ये. गावाकडं ये.

पोळयाच्या सणाला गावाकडं येन काय करू? बैल जित्राब नाही दावणीला आता.दावणं सारी सुनी सुनीच आहे. नाहीत.एक ही

दादा,खरं सांगू का? पोळयाला येऊच नाही वाटत मला गावाकडं. पोळा आठवला की तुझ्या आठवणी नुसत्या झोंबत राहत्यात अंग भर आग्या मोहळाच्या माश्या सारख्या.आता तू जाऊन पाच सहा वर्ष झाल असतील.तो पोळा नि तू.ते बैलंराज्या नि पवळया नुसत आठवत राहतात.

            त्या साली मी नववीला होतो.त्या वर्षी ही आखडी पडली होती.आखडीच्या नंतर श्रावण चांगला बरसाला.झिम झम पाऊस सारखा चालूच राहीला.चांगला मूर पाऊस झाला होता.शेत ही तररारून आली होती.सारीकडं हिरवळ माजली होती.हिरव्या पोपटी रंगानं रान नं रान,शिवार नं शिवार रंगून गेलं होतं.श्रावण्याच्या सरी ही अधून मधून  बरसतचं होत्या.खांदमळणीचा दिवस म्हणून गुरूजीनं दुपारूनच सुटटी दिली होती.रानात बैल चांगल्या शेलक्या बांधावर चारून चारून तू टम करून दिली होती.बैल जोगली होती. न्हं-पावसाचा खेळ चालूच होता.अधून मधून  कोल्हयाचं भी लगीन लागतचं होतं. तशाचत तू बैलाची कासर माझ्या हाती दिली.

         शेजारच्या नालाबंडीत म्या लयं बैल पोहीली.आंगाची साबण लावून बैल धुतली.चांगल्या बांधाला चारले. दुपारपासून मीच बैल ताब्यात घेतली होती.बैलाचं खांदमळणीचा दिवस म्हंजी बैलाचा हळदची दिवस.पोळा म्हंजी बैलाचं लगीनचं असत ना?तशीचं तयारी घरात चाललेली.बैलाचं खांद मळून घेतलं होतं.तॅल पाणी केल.हिरवं हिरवं गवात टाकलं.आपल्या खिळयाच्या टीतून लुसलुशीत शिप्पी आणली होती.रातच आठ साडे आठ झाले असतील.तसल्या अंधारात शिंदया सावकाराचा शिव्या नि विक्राम्या आलं.वटयावर टेकलं सुध्दा नाहीत.उभ्यानचं तुला पैसं मागया लागलं,“सांग पैसं कवा देतो?” शिव्या डाफरला.ते पावरातचं आला होता तेवळं असाचं कुठं भी पाऊर दावीतचं असतो.

देतो की.आता माल टालं झाला की.” एकदम लव्हाळया वाणी वाकून तू म्हणलास.ते एकदमच ताठ होतं माडागत.

शहाण्या, उग बाता कमून हाणतो रं? कशाचा माल न टालं रं तुला? पावसानं असं हात आखडीलाय व्हता. आखडी पउल्यामुळे सा-या धानाचं कॉळ झालं.तुहयचं बरं पीक आलय.”

आखडीत तर पडलीचं होती.ती मला कशी सोडीनं पण थोडं फार माल हुईलचं की.काळीमायचं वटी भरिली ती वांझ नाही जायची.काहीना काही पसा खोंगा पदरात टाकीणचं ना?”

तुझ्या आसल्या मालाटालावर आमचं पैसं फिटत नसतेत.कुठं दात टोकरून प्वाटं भरतं असतयं का?दुसरं काही तरी कर.पण पैस दे आजची आज.” शिव्या डाफरतचं बोलला.

दुसरं काय करू?म्या आसला फाटका माणूस दुसरं काय माझ्याजवळ?मोलमजुरीचं तर ते खायलाचं पुरतं नाय.”

आर,मग कमी खात जा ना.”शिव्यानं  मोठया आवाजातचं सल्ला दिला.त्याच्या तसल्या बोलण्यानं काळजाला पार डोबरं पडलं होतं.आय नि मी तर नुसतं गप गप झालोत.

शिवा तात्या कसं खातोत कसं राहतोत आमचं आम्हला माहीत.त्याचं ग-हाण तुमास् सांगून काय उपेग? तुमचं देणं हाय. म्या काय नाय म्हणतोय का?”

नाय म्हणतं नाहीस पण देत भी नाय.आर, नाम्या तुचं सांग कव्हरं थांबायचं?”

करा ॲडजेस्ट ,सिवाभैय्या.हातावरलं प्वाटं.‍पोरगं शिकतं.तिचं माग दुखलं.लयचं ज्यारं झालोय बघा.तुम्हला ठावं नाय व्हयं?”

ठाव हाय मला सारं.मग काय करू आम्ही?दयावात का सोडून?”

थोडा टायेम दया.पै ना पै देईल बघा.”

ऐ तुझं तुणतुण नेहमीचं वाजू नको.ते ऐकायला इथं नाय आलो.तुझं हे कवा भी चालूचं असतं.बैल दिसतेत की.टाकायचं फुकून व्हायचं मोकळं.”

बैल फुकून जमत्यात व्हयं?त्यांच्या जीवा वरचं चाललयं सारं.”

सारं तुझचं कसं ऐकायचं? बैल घेतोत लावूनदुसरं हाय काय तुझ्याजवळ?”

’शिव्‍या भैय्या,तसं नका करू.बैल गेल्यावर.हातचं मोडणं बघा माझं.”तू गयावया करत होतास.त्यांना काय त्याचं? ते इचार करतेत व्हयं?

विक्राम्या सोड बैल.जाऊ दे याला मराठी कळतचं नाय.कव्हरं हयाचं रडगाण ऐकायचं?”

असं नका करू.म्या काय पैसं बुडीतोय काय?आतापुतोरं कुणाच्या नरकात नाय गेलो कवा.”

हे बघ.आमचं पैसं कुणीचं नसतं बुडीत.तुचं काय?शिंदया सावकराची पैसं बुडवीणारा जल्‍माचा  अजून. एखादा मेला तरी थडग्याकडून आम्ही पैसं वसूलचं करीत असतो. पैसं आणून दी तुपलं बैल घेऊन ये.” विक्रम्या लगेच पुढं सरकला.खात्या दावणीचं बैलं सोडलं.तुझ्या देखतं.तू पुढा सरकला त्यांना गयावया करू लागला.शिव्या कुठं ऐकत असतो व्हयं?लगेचं शिव्या आडवा आला.

इंथचं थांबायचं.उग गाव जागा करायचा नाय.पैंस आणायचं नि बैल घेन यायचं.उग नाटक केलं तर फोडून काढीत असतो.माहित ना तुला?”शिव्या नुसता दम देत होता.

बैल का न्यानात पण उदयाचा एवढा पोळयाचा सण हुदया.पैसं देयील नाहीतर महया हातानं बैल तुमच्या दावणीला बांधीनं.एवढा इश्वास ठेवा.खांदं मळीलेत.असं सणासुदीचा नका दावणं सुनी करू.”तू ज्यारं झाला तरी त्यांनी बैल सोडलचं.

विक्राम्या थोबाड वर करून काय थांबलास. तेव्हं असंचं इव्ळत असतो.ओढेव बैल.”चरकात ऊस घालावा व पीळवटून रस काढवा.तसं तुझं झालं होतं.काळजाचा पार चौथा झाल्यागत उभा होतास.

अहो,शिवाभैय्या,तॅल पाणी केल्यालं बैलाला.का असं करू.उदया सण झाला की आणून बांधतोत दावणीला.”

लय देणारी होती तर मून दिल्लं नाहीस आतापर्यंत.उदया काय जादू करणारसे.का लॉटरी लागणारे काय?महीन्याचा वायदा केला होता.नाय तर मागच्या महीन्यातचं ओढले असते बैल म्या.”

महया पोरा शपथ सण झाला की बैल तुमच्या दावणीला बांधतोत आणून.”आई विनवणी करत होती. पदर पसरीत होती.शिव्याचं काळीज लयचं निबार.त्याला पाणी फुटतयं व्हयं?

पोरांच्या शपथा कशाला खाती?आपल्याकडं पैसंच हायेत त्यांच.तसं कसं कुणाच्या जित्राबांच्या कास-याला हात लावतेल.”आईला मागचं ओढलं. आईल माग ओढलं होतं तुम्ही पण तुमचं शब्द जड झालं होतं.सोताच्या जीवापेक्षा जास्‍त जीव होता तुमचा आपल्या बैलावर.

                विक्राम्यानं बैल सोडलं.तेव्हं गोटयातून बैल बाहेर काढयला लागला.मला राहवलचं नाही.मी पळतचं गेलो नी पवळयाच्या गळयात मिठी मारली.विक्राम्यानं  हातानी ढकलील पण मी मिठी सोडीणारचं नव्हतो.

नाय नेदेणार मी बैलं..नाय नेऊ देणार..”एकचं घायटा घेतला.बैलाच्या पुढच उभा राहिलो.शिव्यानं भी  मला ढकलनू पाहिलं.मी बैल सोडीतचं नव्हतो.

आर, पोराला दापेव.हयो काय तमाश्या उभा केलाय.”

अहो तात्यात्याचा लयं जीव बैलावर. आठदिवसापासून.. त्यानं फुगंन ते आणून  ठेवलेत.दया त्याला बैल रंगाचेत.लय नाद बघा त्याला.एवढा सण होऊस्तोवर ठेवा.”

बैलाची लयचं पोराला हौसं तर पैसं..फेकून दयावेत थोबाडावर.. बसावं लाड करीत पोरांच.”

आकाश्या, सोडं बैलं त्यांच.” तू डाफरलास.मी रगेलवाणी तसाचं आडा उभा.

त्यांचे नाहीत बैल.आपली बैलेत. म्या नाय जाऊ देणार.”

आर, बायको नि पोराला पुढं करून तू बरी मज्जा घेतोस.चांगली आयडीया गया तुझी.”शिव्यानं असं तुला हिणीलं की  तुझं मशीन गरम झालेलंच होतं.दादा, तू मला हिंजाडलस तरी म्या बैल नाही सोडलं.

काय पोरग बुवा?बापाचं पण ऐकत नाही.” तुझा रागाचा पारा वाढत गेला.तू सणासणा माझ्या थोबाडीत हाणल्या.आयी धरायाला गेली तर तिला भी तू ढकलनू दिलं.फरा फरा मला ओढलं.

जावा.. घेउन..” तू अजून ही दात ओठ खातच होता.मी थरथरं कापतं आईच्या  पदरात शिरलो. आपल्या सा-याच्या समोर ते बैल घेउन गेले.तू राग रागचं घरात गेलास चंगाळी.गोंड,फुगं रेबनं सारा वाराचा सराजम तू एक एक पराळात मांडला.आम्ही सारं बघत होतो.आता तू हे काय करतोस?

आता काय करता?” तुमचं हात धरतं आई म्हणाली.

देतो काडी लावून.टाकू फुकून.मालकचं गेल याचं.पोळयाच्या सणाला दावणीला जितरांब नाही.कशाचं कुणबाटतं आपून.हे सारं कश्याला ठेवायच?”

असं येडयावाणी करीत असतेत काय?” तुझ्या हातातली काडी घेत आई म्हणाली. चंगाळी, गोंडं ,घुंगरं सारं फेकायाला लागलास.भिताडावर हाणायाला लागलास.रागानं इतका लालबुंद झाला होतास.धाप लागली होती.

हयो सराजम नक्कू ठेवू डोळया पुढं.नुसतं आतडं तुटतेत तटातटा.”


आय तशीचं थिजून गेली.तिनं तुला काडयाच पेटी नाही दिली.अंगणातला सारा सराजम गोळा केला. डोळया देखत बैलं नेलं.तुझ्या काळजाला ढोबरं पडलं होतं.तू जेवला नाहीस.कुणीचं जेवलं नाही.सुतकं पडल्या सारखं सारं गपगप झाले.


                        सकाळी सकाळी तू आणि  भऊ बैल घेऊन आलात.आंनदाला पारावर राहिला नाही माझ्या.मोठया थाटात आपण पोळा साजरा केला.तो आपला शेवटचा पोळा साजरा झाला. उचलं घेतलीस.बेलापूराला गेलास.पोळा साजरा करण्यासाठी तू तुझं अख्ख आयुष्याचं काटयावर घातलं होतंस.कर्जाचा डोंगर वाढत गेला नि एक दिवस हे जग.. सोडून गेलास.ईला मला सोडून गेलास.हे जग इतकं दुष्ट आहे तरी तू आम्हला तसाच या जगात का ठेन गेलास,दादा

आता मी राकाटीच्या रानात उभा.ते आंब्यांच झाङ माझ्या डोळयासमोर.आयघलं वठलं आता.ज्याला तू  लटकून तुझं आयुष्या संपवून टाकलं. भऊ नि रम्यानं ते बैल चारतेत रानात.पोळयाचाच दिवस ना आज भीमला काहीच पाहू नाही वाटत आता. नुसती तुझी आठवण येते रे.वाटतयं तू.. बैल घेन येशील.म्हणशील  पोहवं बरं बैल..आकाश्या….

                           

तसं होणार नाही.तू कसला परत येतोस आता.आसल्या दुनियेत येऊ भी नक्कूस.दादा तुज्या शपथ सांगतो मी पोळयाचा सणचं कधीचं साजरा करणार नाही.ज्या सणानं माझा दादा माझ्या पासून हिरावून नेला तेव्हं सण मी साजरा नाही करणार.. नाही करणार

कुण्बटयाचा शिक्का मला पुसून टाकायचा.. पुसून टाकायचा.

  


सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

लता दीदी,मी आणि माझी आई

 लता दीदी ,मी आणि माझी आई.

-----------------------------------------------------------------------------         


लता दीदी गेल्या.त्यांची नि माझी कधी भेट झाली नाही.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य वाटयाला कधी आलं नाही. त्यांची गाणी ऐकली. त्या सुरांनी व  शब्दांनी  मनात एक जागा केली. त्या दिव्य सुराबरोबरचं त्या व्यक्तीमत्वांनी  माझ्या काळजात घर केलं.
                     त्यांची गाणी ऐकत कधी धूंद झालो.कधी चेकाळलो.कधी विरघळून गेलो.कधी रडलो. त्या माझ्या कुणीचं नव्हत्या.माझ्या आईला व आण्णांना तर त्या अजिबात माहित नव्हत्या. आईचं विचाराल तर  राष्ट्रीय दुखवटा जाहिर झाला तरी आईला त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. लता दीदी हे जग सोडून गेल्या ही बातमी पण तिला कळली नव्हती.आई शिकली नाही.तिला लता दीदीचं नाव माहित नाही.मी श्रध्दांजली म्हणून लता दीदीचं 'अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव |दरीदरींतून मावळ देवा देऊळ सोडून धाव | ' हे गाणे युटूबवर लावलं.आईला ऐकवलं.
       काही क्षण मी निशब्द झालो. तिला ते गाणे फार आवडले. ते गाणं आईला कितीकसं कळलं असेल हा एक प्रश्नचं आहेपण ते स्वर तिच्या ह्रदयाला भिडले असावेत.हे गाणं म्हणणारी  बाई आज मेली आहे एवढचं आईला कळलं.आई फार  भावूक झाली.गावात कुणी मेलं तरी आई त्या माणसाठी दोन अश्रू वाहते. तिचं डोळ भरून आलं. जन्मला आलं की मराणं आलचं. मरून जाण्यासाठी का देव माणसाला जन्म घालत असेल? तिला भाबडा पण हा गहन प्रश्न पडला.
               लता दीदीला आम्ही नात्याचं लेबल नाही चिटकवू  शकत पण त्या माझ्यासाठी स्पेशल होत्या. आपलं आणि फक्त  आपलचं असतं ना कुणी.अगदी तश्या. त्या भारताच्या कोकिळा होत्या.माझ्या देशाची शान होत्या.त्या भारताचं रत्न होत्या .खरं खोटं माहित नाही पण पाकिस्तानचा मला  तेव्हा पासून फार राग येतो. 
             मी लहान असतानी अशीचं एक कुणीतरी पुडी सोडून दिलेली होती.ती पुडी अशी होती की  काश्मिरच्या बदल्यात पाकडे  लतादीदीचा गळा मागत आहेत.राग ही आला आणि भिती ही वाटली.सरकार दीदीचा गळा पाकडयांना देणार तर नाहीना? हया कल्पनेनचं काळजात धस्स झालं होतं. एकवेळ भारत काश्मिर पाकडयांना देईल पण लता दीदिचा गळा नाही दयायचं सरकार असं कधी वाटायचं.
 त्यांच्या जादुई गळयाचं संशोधन जगातील शास्रज्ञ करत आहेत.त्तांधा लता दीदी सारखा गळा तयार करायचा आहे.अशी पण एक पुडी सोडली होती काही दिवस. माझ्या प्रियेशीचा आवाज लता दीदी सारखा असावा असं मला माझ्या पहिल्या प्रेमापासून वाटतं आलं आहे. त्यामुळे मला दिदीनं गायलेली प्रेमगीत, शृंगार गीत खूप आवडतात आज ही.ती आवडतचं राहतील.
     संगीतातला मी फार जाणकार नाही. संगीताचा गाढा अभ्यासक तर मुळीच नाही. त्यांनी किती गाणी गायली? कसली गाणी गायली?त्यांची संपत्ती किती? त्यांनी कोणत्या प्रकारची गाणी गायली नाहीत?त्या अविवाहीत का राहिल्या? त्या गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीच काय करतील? असले सुजाण नागरीकाचे प्रश्न मला कधी पडले नाहीत. त्यांच्या सुरांचं नि माझ नातं आहे. त्या देहानं पंचतत्वात विलीन झाल्या अस्ल्या तरी सूर तर अजून ही मनात अमृताचे  शिंपन करणारच आहेत ना?त्या अमर नसतील पण त्यांचे स्वर तर अमर आहेत ना?

लता दीदींना मी का श्रध्दांजली वाहू? त्या त्यांच्या स्वराच्या रूपात माझ्या मनात सदैव घुमत राहणार आहेत.

     परशुराम सोंडगे,पाटोदा.

सोमवार, २८ जून, २०२१

सागरी किनारा ,ती आणि मी

 सागरी किनारा ती आणि मी.                             तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण  फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला.

          'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गाणं तसं आज ही अवीट  आहे. माझ्या मनाच्या त्या बेधूंदपणाला मी  फक्त त्या गाण्याला दोष नाही देतं.माझं वय ही तसचं होतं. मन पटलावर बेधूंद लाटा उसळत राहतात. मनात स्वप्नांचे ही इमले बांधले जातात. अनेक कल्पनांनी मन फुलून येई. ते गाणं  आज ही माझ्या मनाचा ताबा घेते. 


एक किनारा असावा..सुगंध वारा  आणि गारा असावा नि  आपली ओली चिंब  मिठी तिचा निवारा असावी.रेशमी स्पर्श आणि मलमली शहारे...  कोण? आपल्याला आवडणारी आपल्याच  वर्गातील  एक स्वप्नसुं  असे. तो चित्रपट  नाही पण मला ते गाणं अक्षरशः पागल करुन गेले होते.त्या गाण्यामुळे आपण कुणाच्यातरी प्रेमात पडावं असं वाटू लागलं.

     मी.  तिच्या प्रेमात पडलो ही पण  समुद्र किनारा कुठं होता? समुद्र किनारा आणि तिची मिठ्ठी हे स्वप्नच राहिले. तिचं लग्न झाल.ती दुस-याची कुणाची तरी झाली. ती गोव्याचा समुद्रात भिजुनआली. मधुचंद्र ही तिचा साजरा झाला.मी तर अजून समुद्र ही पाहिला नव्हता. सागरी किनारा हे गाणं लागलं की ऊर नुसते पेटून येई. तिचे व त्याचे समुद्रात ले फोटो काळीज करपून टाकीत. ख़ोटं सांगत नाही. ते गाणं लागलं की  अनेकदा बंद केले आहे. आपण होऊन कोण तरफ लावून काळीज उचकटून काढील. ते गाणं बंद करत नाही म्हणून टपरीवाल्या बंड्याचे नि माझे भांडणं होई.बंडयाचं ते आवडतं गाणं.

 मी जेव्हा वयाच्या तीसाव्या वर्षी समुद्र प्रथम पाहिला तेव्हा मंत्र मुग्ध होऊन पहात राहिलो. स्वप्न आणि आठवणी सा-याचं जाग्या झाल्या.

मंगळवार, २२ जून, २०२१

समुद्र न पाहिलेला माणुस

 आण्णा

अण्णांनी समुद्र पाहिला नाही. असचं ते एकदा बोलता बोलता म्हणाले परशु, मी अजून समुद्र पाहिला नाही.

"कसं काय?"

"आमचा कशाला योग आलाय? रावणाच्या लंकेत जाण्यासाठी  वानर सेनेने  शीळा पाण्यवर तरंग ठेऊन सेतू बांधला होता.समुद्र दरी खोल असते जणू."

"७१ टक्के या पृथ्वीचा भाग समुद्रानं व्यापलेला आहे. समुद्रांनं." मी काय बोललो आहे. हे त्यांना कळणं शक्य नव्हतं.आण्णा निरक्षर होते.

"म्हजीं"

" बारा आणे पाणी आहे.चाराणे जमीन..."

"एवढं मोठं पाणी?" पृथ्वीचं आकार त्यांना काय माहित? पृथ्वी शेषांच्या फण्यावर आहे हे त्यांना माहित होतं.पोथी पुराणातून ते ऐकतं होते. पोथी पुराणात खोटं असू शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास..एक ही दिवस शाळेत न जाणाऱ्या  अण्णांचा हा शब्द साठा रामायण,शिवलिलामूत महाभारत अश्या  आलेला होता

" समुद्र पाहिला नाही बघ मी.तुम्ही आत्ताची पोरं किती सा-या पाहिला असेल.अशी फोटो पण काढलेत. " त्यांना ते अप्रुप वाटतं होतं.

"आपण या वर्षी उन्हाळ्यात जाऊ.मलख सुटी लागली की."या आश्वासन देऊन मोकळा झालो. ते फक्त हासले. ते हासणं गुढ होतं.त्याचा अंदाज.

"हास्यात काय खरचं जाऊ.. पाण्यात पोहत.. वाळूत लोळू." ते गप राहिले. जग पाहण्याची सर्वांना च आवडते. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात मी स्वप्न पेरले होते.

 मला सुट्टी लागायच्या आणि मध्येचं आण्णा आजारी पडले.

 त्यानं पाहिला नाही. मी भूगोल शिकलो होतो म्हणून मला समुद्र माहित होता. मी पण बरेच दिवसं म्हणजे चांगला मोठा होऊस्तोवर मी समुद्र पाहिला नव्हता.पहिल्यांदा समुद्र पाहिला तेंव्हा तो अथांगसागर डोळ्यात साठवून ठेवत राहीलो.मी मग्न होऊन समुद्र पहात राहिलो.बरोबरची सारी पुढं निघून गेली‌.

   हा सागरी किनारा ... ओला सुगंध वारा. ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा... असं काही गाणं ऐकत होतो. त्या गाण्यात किनारा.. सागर.. ओला गंध होता.फक्त ओली मिठ्ठी नव्हती. रेशमी निवारा नव्हता. बरंच काही होतं नि बरंच काही नव्हतं ही. किना-यावर अनेक लोक मात्र ..त्या गाण्यातला सारं अनुभवत होते. ओली चिंब होत होती. काही माणसं. अपुरे कपडे घालून नाचत होती.हुंदडतं होती.दुस-याचं सुख पाहून  ही आपण सुखाची छान कल्पना करत शकतो.तसचं माझं झालं होतं

  उसळणाऱ्या समुद्र भयाण वाटतो. भयाण अथांग तर तो असतोच. 

मंगळवार, १५ जून, २०२१

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं


 रिमझिम गिरे सावन.......

पाऊस आणि आठवणींच मेतकूटं

पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.

    पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.


सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...