सोमवार, ४ मार्च, २०२४

अंनतरावांच प्री-विडींग आणि आमचा रम्या







 अंनतरावचं प्रि- विडींग आणि आमचा रम्या

त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न्  बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग  म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं?

काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग  सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं‌. हलक्यात घेऊ नका.

                  आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय.

एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं.

मला लग्नात  जायला भेटलं नाय म्हणून  खंत नाय.आपला शाहरूख खान गेल्ता ना तिथं. आपण त्याचं फॅन हायत बरं का? लयं जबराटं फॅन हायत आपण त्याचं.काही जण उगीच त्यांच्यावर डक धरून असत्यात.तेव्ह तिकडं जेवला तरी आपलं प्वाटं भरलयं इकडं.

आडीच हजार का काय नुसतं पदार्थ होतं जणू तिथं खायला.इतुक्याश्या बारीक बारीक पोटात एवढी समदी पक्कावन्न  कशी ढकलायची? मला उगीच प्रश्न पडला? उग घडीभर टेन्शन भी आल्तं पण नंतर मपलचं मलाच कळलं आपल्याला कुठं खायचे आहेत ते पक्कावन्न‌. जे खाणार ते बघून घेतेलं.आंबानी सेठ सोता वाढीत होतं. उग प्वाटं फुटायचं एखाद्या खादाडाचं.

             अंनत आबांनीच्या फ्री व्हीडींगच मला तर लयं अभिमान वाटुतुया. तीन खान तिथं गेलं भी.नाचल भी.फुटू भी काढलं. हिंदूच्या लग्नात हे थ्री खान जाणंं म्हणजे मोठी राष्ट्रीय घटना हाय ती.राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच म्हणायचं ना?बरं शारूख तिथं स्टेजवरून जय श्रीराम पण बोल्ला. जयश्रीरामवाल्याचा भी राग कमी झाला आसणं. या प्री विडींग मुळं देशाच्या दृष्टीने ही महत्वाची घटना घडली की. तेव्हां भी लयं डांबरसं. जयश्रीराम म्हणतच नव्हता. देशाचा माहोल झालाय.बच्चा असता है.राम आता है. ह्यो शारूख म्हणायचं नव्हता.त्या प्रोग्राम मधी तेव्हं म्हणाला.जयश्रीराम....!! प्रश्नच सुटला ना?


             'मेरा देश महान... !!' असं वाटून वाटून मव्हं छाताड फुगून टम्म झालयं बघा.कमून म्हणून इचारा ना?ती पाप स्टार रिहाना.नाचवली आंबानीन‌.जगातली टाॅपची नाची हाय ना ती? ती मागे आपल्या देशाला गरीब देश म्हणली होती..शेतक-याचं ते आंदोलन बघून तिन तसं टिव्टं केल्तं.भारत देशात शेतकरी गरीब हायत म्हणून काय समदा देश गरीब समजायचा का? देशात टाॅपची श्रीमंत माणसं भी हायत की‌.तिला काय माहित? आमच्या देशाचं जे पंतप्रधान हायीत का त्यांना पण शेठ म्हणत्यात. तू या देशाला गरीब म्हणायचं नाही‌.किमत बोल तुझी? एका तुह्या डान्सला चौ-याहत्तर कोटी दिलं आमच्या आंबानी सेठनं. बैलापुढं गौतमी पाटील नाचणारी आम्ही ग्रेट माणसं आहोत.आता तरी अंबानींच्या प्री-विडींग मध्ये तुला नाचविल. बैलांचं पण लग्न असतं आमच्या देशात.एखादा सेठ किंवा आमचा पुढारी डायरेक्ट तुला बैला पुढं नाचील. नाद नाय करायचा इंडियाचा.आमच्या देशाला गरीबाचा देश म्हणती व्हय? मोदी सेठच्या पुरं हे ध्यानात असलं.त्यांनी मुद्दामच आंबानींला तिलाच नाचायला बोल्येव असं सांगितलं आसलं.पैशाचं काय टेन्शन? मोदी सेठ आणि आंबांनी सेठ  जानी दोस्त हायीत. ही दोस्ती तुटायची नायं.

अंनतरावांच भाषण लयं भारी झालं जणू.आपल्याला लयं कळालं नाही.ते इंग्लिश मध्ये ह़ोतं.बाप रडला राव‌. चक्क डोळ्यात पाणी आलं त्याचं.माणूस किती मोठा असला तरी बापाचं काळीजचं  असतंचं की त्याला. बाप म्हणून तेव्हं रडू नाही थोपू शकला.त्याजवळ बक्कळं पैसा. त्यांनी खर्चीला भी. पोराची हौस नाय करायची तर कुणाची करायची?पैशाचं तरी काय करायचं? थोडाचं नदीला तुंब टाकता येतो पैशाचा?  बाप आणि लेकाचं नातं पाहून आपण तर पुरं इम़ोशनल झालोत बुवा.आसला चिक्कार पैसा असलेल्याची प़ोरं लयं मोकार असत्यात. सारा देश बापलेकाच्या या भव्य दिव्य नात्यात पार इरघळून गेला असतानी आमचा रम्या इतका जळतोय त्या प्रि विडींगवर इचारुचं नका. दुस-याचं सुख पाहिलं की आपलं दु:ख उंचबळून येत. तसचं झालं असलं राम्याचं भी.

तेव्हां म्हणतोय.त्या अंनतरावाला पोरगी भी लयं चिकणी भेटली.पोरीना फक्त पैसा पाहिजे.तसली नटीवाणी नाय पण काळी बेंद्री कसली तरी आपल्याला पोरगी भेटली पाहिजे.एखाद्या मंदिरात बिंदिरात तरी गरीबांची लग्न व्हायला पाहिजेत. काय अंनतरावाचा बाप नि काय आमचा बाप? तीस उलटून गेलं तरी म्हया बापाला काळी-बेंद्री,नकटी- धुकटी कसली तरी प़ोरगी सून भेटाना‌. काय खरं?इतकं भी दरिद्री असू नाही बाप.


"आर,वाहतील तुझं भी लगन. लयं अवघड असणया उमगआयआ बाप रं.." म्या आपलं गाण्याच्या  ओळीच गायल्या.क

"कसलं होत डोंबल्याचं ? मोदीसेठला केलयं पंतप्रधान.त्याला नाय बायको.बायकू नसल्याचं दु:ख त्यांना भी कळाना. गरीबांच्या लग्नाची गॅरंटी मोदीसेठ घेतील काय?"राम्याचं असलं डायलॉग ऐकून मला तर हसूच आलं.रम्याचची अपेक्षा भी फालतू नाय.प्रश्न गहनच हाय की या देशात? मोदींच्या कानावर घातला पाहिजे."आयला,प-या इथून पुढं गरीबांची लग्नं होतील का नाय रं? रहियाना नाचली म्हणून देशातल्या गरीब थओडएचन श्रीमंत होणारेत. मही देश अभिमानानं टम्म झाल्याली छातीत धस्सं झालं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...