गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

द्यावा सुगंध सारा उधळूनी

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||



इथं प्रत्येकालाचं बहरायचं असतं.फुलायचं असतं.आपलं अंतरंग उधळायचं असतं.स्वतःला सिध्द करायचं असतं.प्रत्येक जण आपलं रंग ,रूप आणि गंध घेऊन बहरत असतो.अविष्कारत असतो. नटणं व सजणं तरी दुसरं काय असतं?आपलं व्यक्त होणंच असतं की.

या विशाल आणि विलोभनीय जगाला आपल्याला अधिकचं सुंदर करायचं असतं पण जग किती कंजूष असत?प्रत्येक क्षूद्र फुलाची दखल घेतचं असं नाही.

दखल नाही म्हणून

फुलांनं कधी फुलणं सोडलं नाही.बहरणं थोपवल  नाही.फुलणं असेल किंवा जगणं असेल ते  अटळचं असतं.फक्त आपलं अविष्कारनं सुंदर असावं. गुण आणि दोषाचं मिश्रण असतो माणूस.आपल्या गुणाचे रंग अधिकचे ठळक करायचे.झालं.एवढचं तर करायचं.

"दयावा सुगंध सारा या जगास उधळूनी.

घेऊन निशिगंध मज मान्यता मिळावी."

    चला,अंतरंग उधळून देऊया. ही सकाळ अधिकची सुंदर करूया. 




                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

कधी कधी खरं बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************



 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही?मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं. खोटं बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थातच मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना ,काहीच कारण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

           कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आवं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहते.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे 'सत्यमेव जयते 'म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू करू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

रविवार, ८ जानेवारी, २०२३

माणसा़चा धर्म


||आपला चं संवाद आपुल्याशी||

माणसाचं तीनचं प्रकार आहेत. देव मानणारी माणसं,देव न मानणारी माणसं व देव आहे की नाही हे ठरवताच न येणारी माणसं.

   देव ही  मानवी कल्पना आहे.सा-याचं कल्पना,स़ंकल्पना मानवनिर्मितच असतात.तर्कशक्ती व कल्पना शक्तीच्या आधारे माणसं  या जगाचं आकलन करत आहेत. आकलन ही प्रक्रिया आहे.ती अख़ंडपणे चालूच़ राहणारी आहे.आकलन हे अक्कलीवर अवलंबून असते. जशी व जितकी अक्कल तसं हे जग असतं.असणारं आहे. त्यामुळे तर प्रत्येकाचं जग वेगळं असतं.

तर्कशक्ती व कल्पना शक्ती मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत.

 आपले देव, देवता सुंदर, बलवान,दयाळू,क्षमाशील, पराक्रमीचं  असतात.कुठलीचं देवता -देव कुरूप नाहीत.आपणं सुंदर असावा ही माणसाची उपजतचंं इच्छा राहिलेली आहे. त्यामुळे माणसाचे देव-देवता सुंदर  व आकर्षक असतात.राक्षस कुरूप आणि दूष्टं असतात.

 कल्पना करा की इतर प्राण्यांनी ही धर्म स्थापन केले असते तर?  गायीचा धर्म वेगळा,सिंहाचंं धर्म वेगळा.... गायींनी जर तत्वज्ञान मांडलं असतं तर या सृष्टीतले सारे देव गायीसारखे बैलासारखे शिंगे आणि शेपटी असलेले असते.

 माणूस सोडून इतर प्राणी देव मानत असतील का? मानत असले तरी ते आपल्याला कळणार नाही कारणं पशूपक्ष्यांची भाषा आपल्याला कळतं नाही.आपण जसे रेडया़ना वेद बोलायला लावले तसा प्रयत्न कोणत्याचं प्राण्याने अद्याप केलेला नाही.आपलं तत्वज्ञान दुस-याच्या गळी उतरवण्याचा  साधा प्रयत्न ही अजून तरी केलेला नाही.

  देव ही या जगाची भौतिक गरजा कधीच राहिलेली नाही.देव ही माणसाची मानसिक गरज राहिलेली आहे.आपलं सारं ऐकुन घेणारा, संकट काळी मदतीला येणारा.मानवी मर्यादा संपल्या की आपण पुढील सारे प्रश्न देवाच्या हवाली करतो. सुख - दु:ख देवाची देणं म्हणून पदरात घेत राहतो.

      संतानी देवाला मानवी नात्यात गूंफून घेतलं आहे.कुणी त्याला सखा मानतं.कुणी सखी,कुणी सांगाती.कुणी माता,कुणी पिता, जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा देवा समोर  व्यक्त  होण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. एकंदरीत काय तर ? आपल्याला माणसासारखा देव हवा असतो.तिचं तर आपली गरज आहे.देवासारखी काही माणसं ही आपल्या भवती असतातच की.

     आता हे तर आपल्याला ठरवावं लागेल की माणसा सारखा देव शोधत बसायचं की देवा सारखी माणसं?

हा शोध प्रवास सोपा नाही पण सुरूवात तर करूया आज. या सकाळी.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

       ||Youtuber||Blogger||

रविवार, १ जानेवारी, २०२३

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळले; वैजापूर तालुक्यातील घटना; दहा जण जखमी



सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच  पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल?  मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं  कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा  रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना?  असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.

          गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.डीजे वाजला की झाले सुरू.

  लावणी ही सभ्य  व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल  जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी  समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण  बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही  लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी  हे गीत सादर करताना ओलेचिंब  ललना  पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.

 मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.

 गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का  आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत  ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.

  हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला  होणारा  विरोध  हा पारंपारिकच आहे.त्यात  नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.



      गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.

     ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.

       परशुराम सोंडगे

       बीड



नविन वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष २०२२ गेलं.वर्ष २०२३ आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.

उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

           फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. काही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत. एक एक  क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण ही रोखू शकत नाहीत.

 या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं. काहीचं बदलणारं नसतंं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात. ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग अभासाच्या हिंदोळयवरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.

     खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे.


 गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.

हे वर्ष ही जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं. बाय -बाय २०२२ व वेल कम २०२३ अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल कमी असं घसाफोड सुरुच असते. घराघरावर केलेली रोषणाई. चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात  सारी माणसं.

 नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं. नवं वर्ष आलं की एकच जल्लोष.

     नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही. कसूर करायचा पण नसतो.

       रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते म्हणून असतं पण पितो. आपल्याला नाचायचं असतं म्हणून आपण नाचतो. आंनद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने  सिलेब्रेशन करत असतो.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मित च आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?

      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात. ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.


आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?काळाच्या लाटेत सारं  अथांग सागराला मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं. दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?

आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू. आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

         परशुराम सोंडगे

     ||Youtube||Blogger||

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...