शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी||

आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!!

कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!!

सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो.

मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची.

लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपलं थोडं आयुष्य रात्रीला दिलेले. त्यामुळे रात्र  ही थोराड होत गेलेली.

त्या दिवसांत हा मकरसंक्रांतीचा सण हळूच येतो. बोरं,पेरू,ऊस,हुरडा,गाठं,वाल,

गाजर अश्या अस्सल रानमेवांनी घराची पराळं भरून गेलेली असतं.कुणी यावं जे आपल्या नाही ते न्यावं.समृध्दी अशी दारादारातून खळाळून वाहत असे.सुवासिनी नटून थटून वाणं लुटत असतं.घराच्या मालकीण बाईच़ ना त्या  ? काय तो रूबाब ?काय तो तोरा ?सुगडची सुगड भरून वाण दिला जायचा. घेतला जायचा.

घरातलं सारं सौंदर्य, ऐश्वर्य, औदार्य आणि सौभाग्य

घेऊन त्या गावभर फिरत राहयच्या.हळदी कुंकवांने माखलेले सौभाग्यवतीचे कपाळ,भांगं म्हणजे कोण भाग्य असे.आताच्या सारखी घडीघडीला फोटो काढून ठेवायची  सोय नव्हती पण अंतःकरणात आपलं खानदानी सौंदर्य कोरून ठेवलं जायचं.लेकी सूनांना डोळं भरून पाहिलं की मन ही भरून यायचं.आपल्या सुरकुत्या चेह-यावरून समाधानचा पाझर ओसंडून वाहायचा.

तिळाचे गुळाचे लाडू  घरोघर वाटले जायचे.गोड गोड बोलण्याचा आग्रह धरला जाई.नाती,लोभ,मैत्री अधिक स्निग्ध केली जाईत.स्नेहाद्रता वाढली जाई.वाणाच्या वस्तू बरोबरचं माणसांच्या मनामधील प्रेमाचं,आपुलकीचं वाणं ही भरभरून लुटलं जाई.प्रेम आपुलकी  लुटण्याची संधी हा सण देई.

अनेक जणांची जुनी भांडणं थोरं मोठी लोक तीळाचे लाडू भरून मिटवत असतं. सलोख्याचं चांदण असं मुद्दाम होऊन पसरलं जाई.

आता सारंच हरवतं गेलं.

आता वाणांची दुकानं थाटतात.वाणं  ही विकले जातात. वाणोळा कुणीचं कुणाला देत नाही.

खरेदी विक्रीला आपणं वाणं लुटणं म्हणू शकत नाहीत.आपण वाण विकत  आणतो.मालकीणीचा  जो वाण देताना तोरा असतो तो वाण विकत  घेताना कसा असेल? आवं पांघरूणच सण साजरा करावा लागतो.

तेव्हा गोड बोलण्याचा आग्रह असे.लोक कठोर बोलतं.खरं खरं बोलत.ते कडू लागे.काही दुरावलेली मनं जवळ आणण्यासाठी तिळगुळ असे.

आमचा तीळगूळ सांडू नका

आमच्या संगे भांडू नका.

आता माणसं सरार्स गोड बोलतात. हे बरंयं.गोड बोलण्यानं मधुमेह होत नाही.नाहीतर मधूमेहाच प्रमाण वाढलं असतं. किती गोड बोलतात माणसं? भांडत नाहीत पण गेमचं करतात.अबोला धरतात.छोटया छोट्या भांडणातून माणसंचं मन मोकळं होई.रागाचा निचरा होई.राग मनात कोंडून ठेवला की त्यांचं कपटं  होतं.सूडाची भावना   वाढू लागते. सुटाने पेटलेली मनं तीळगूळ घ्या गोडव्यांनं निव्वळत नाहीत.सोशल मिडियावरच्या शुभेच्छा संदेशनं हे कितपत घडतं असेल? जुनी भांडणं विसरून एखाद्याला बोला.फक्त बोलणं आवश्यक आहे.संवाद सुरू राहतो. दुरावलेले संवाद सुरू करू जमलं तर आज.

मकरसंक्रांतीसाठी मेकअप करून मिळेल असे बोर्ड ही हल्ली असतात.मक्ररसंक्रांतीला स्पेशल शुटं ही केलं जातं.

 आता जी साधन उपलब्ध आहेत त्याचा वापर होणारं.त्यांचा वापर करून सण उत्सव साजरे होणार. आंनदाचे कण कण गोळा केले जाणारं.ती खरी  माणसाची गरज आहे.सण साजरा करा पण उत्साहाने.त्या उत्साहातचं आनंदाचं चिमूटभर चांदण घरभर पसरेल.दुसरं काय ?

मकरसंक्रांतीच्या खुप शुभेच्छा...!!

         परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...